ठाणे महापालिका मुख्यालय इमारतीवरील शिवशिल्प दुरुस्तीच्या कामावरून सत्ताधारी शिवसेना आणि मराठा मोर्चा पदाधिकारी यांच्यात झालेला वाद आता आणखी वाढला असून येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत राहणार नसल्याचे मराठा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले.
ठाणे महापालिका मुख्यालय इमारतीवरील शिवशिल्प दुरुस्तीच्या कामावरून सत्ताधारी शिवसेना आणि मराठा मोर्चा पदाधिकारी यांच्यात मंगळवारी वाद झाला होता. या वादानंतर मराठा मोर्चाची भूमिका मांडण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. त्या वेळेस समन्वयक कैलाश म्हापदी, रमेश आंब्रे, अॅड संतोष सुर्यराव, दत्ता चव्हाण, अजय सकपाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. शिवशिल्प दुरुस्तीच्या मागणीसाठी गेलेल्या मराठा समाजाला सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी ‘चिल्लर’ संबोधून धक्काबुक्की केल्याचा आरोप म्हापदी यांनी केला. हिम्मत असेल तर आयुक्तांकडे जा असे आव्हान म्हस्के यांनी आम्हाला दिले होते. त्यामुळे आम्ही आमची हिम्मत दाखवून शिवशिल्पासाठी दहा लाखांचा निधी मंजूर करून घेतला. पण त्या निमित्ताने शिवरायांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांची किंमत ठ़ाणेकरांनी पाहिली, असेही त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला साथ दिल्याचा आता आम्हाला पश्चात्ताप होतो आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मराठा मोर्चाच्या वेळेस मदत केली होती. त्यामुळे आम्ही लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत होतो. मात्र यापुढे शिवसेनेसोबत राहणार नसल्याचे शिंदे यांना कळविले आहे, असे म्हापदी यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेस बंदी
ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतनच्या आवारातील मोकळ्या जागेत पत्रकार परिषद घेतल्या जातात. याच ठिकाणी मराठा मोर्चाची पत्रकार परिषद होणार होती. मात्र महापालिकेने अचानकपणे या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यास बंदी घातली. त्यामुळे दुसरे ठिकाण शोधावे लागल्याचा आरोप मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.