आधारवाडी क्षेपणभूमीवरील कचरा जाळला जात असून त्याचा धूर परिसरात पसरत आहे. या क्षेपणभूमीच्या बाजूला असलेल्या सोनवणे महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांना या धुराचा सामना करीत उत्तरपत्रिका सोडवाव्या लागत आहेत. पालिका प्रशासन याविषयी करते काय, असा प्रश्न नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित केला.
आधारवाडी क्षेपणभूमीवर हजारो टन कचरा पडला आहे. हा कचरा जाळला जातो. जळल्यानंतर त्यामधून लोखंड, इतर धातूच्या वस्तू ते मिळवतात. सध्या उन्हाचे दिवस असल्याने कचरा वेगाने पेटून आधारवाडी, उंबर्डे, सापार्डे, दुर्गाडी परिसरात या धुराचे लोट पसरत आहेत. त्यामुळे या भागातील लोकांनाधुराचा खूप त्रास होत आहे. क्षेपणभूमीच्या बाजूला असलेल्या सोनवणे महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. या धुराचा सामना करीत विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका सोडवाव्या लागतात.
नगरसेवक विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे यांनी विद्यार्थी, शिक्षक, लोकांना या धुरामुळे जो त्रास होतो त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न केला. पालिकेचा घनकचरा विभाग कोणाकडे आहे. याविषयी प्रशासन अंधारात असल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.