मुरबाडच्या भांगवाडीत लोकसहभागातून जलसंधारण

उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई भेडसावणाऱ्या मुरबाड तालुक्यातील भांगवाडी या आदिवासी गावाने यंदा पागोळ्यांचे पाणी जमिनीत मुरवून जलसंधारणाचा मार्ग पत्करला आहे. गावातील साठहून अधिक घरांनी त्यांच्या छपरांवर पडणारे पाणी पत्र्यांच्या पन्हळ्यांद्वारे थेट जमिनीत सोडण्याची व्यवस्था केली आहे. त्यासाठी प्रत्येक घरासमोर शोषखड्डा खोदण्यात आला आहे. या जलसंधारणामुळे एरवी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात आटणाऱ्या गावातील विहिरीत अधिक काळ पाणी राहू शकेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

ठाणे जिल्ह्य़ात दरवर्षी सर्वसाधारणपणे मुसळधार पाऊस पडतो. मात्र भौगोलिक परिस्थिती आणि जलव्यवस्थापन प्रकल्पांचा अभाव यामुळे ग्रामीण भागात उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई भेडसावते. सुमारे तीनशे लोकवस्तीची भांगवाडी त्यापैकी एक. गावातील विहीर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात आटते. मग त्यानंतरच्या काळात गावातील महिलांना दोन किलोमीटर अंतरावरून पाणी वाहून आणावे लागते. गेल्या उन्हाळ्यात ‘नाम’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी हे दृश्य पाहिले. त्यांनी ग्रामस्थांची भेट घेतली. लोकसहभाग असेल तर भांगवाडीची पाणी समस्या सोडविण्यासाठी ‘नाम’ संस्था मदत करील, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानुसार ग्रामस्थांनी यंदा पागोळ्यांचे पाणी जमिनीत मुरविण्याचा प्रकल्प राबविला आहे. गावातील साठहून अधिक घरांनी त्यांच्या दर्शनी भागातील छतावर पत्र्याच्या पन्हळी बसविल्या आहेत. घराच्या एका बाजूला शोषखड्डा खोदून त्यात पन्हळीद्वारे संकलित झालेले पागोळ्यांचे पाणी सोडण्यात आले आहे. जलसंधारणाची ही एक साधीसोपी पद्धत आहे. त्यामुळे भूजलसाठा वाढून गावातील विहिरीतील जलस्रोत अधिक काळ टिकेल, असा विश्वास भांगवाडीतील हरी धर्मा वाख यांनी व्यक्त केला आहे. जलसंचयनाचा हा प्रयोग यापूर्वी तालुक्यातील फांगणे ग्रामस्थांनी केला असून टंचाईची तीव्रता कमी होण्यासाठी ते उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आले आहे. तालुक्यातील इतर टंचाईग्रस्त गावपाडय़ांनीही हा प्रयोग करावा, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती तहसीलदार सचिन चौधर यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हा प्रशासनाने ‘सीएसआर’ उपक्रमातून वीजपुरवठय़ासाठी २ लाख ७५ हजार रुपयांची व्यवस्था केली आहे. तो निधी आमच्याकडे जमाही झाला आहे. पावसाळा सरताच ऑक्टोबर महिन्यात विजेसाठी खांब टाकले जातील. त्यानंतर पाणी योजनेची उर्वरित कामे होतील.

– सचिन चौधर, तहसीलदार, मुरबाड.