किन्नरी जाधव

ठाणे जिल्ह्य़ात आठवडय़ातून दोनदा पाणीकपातीचा विचार; जलसाठय़ातील तूट कमी करण्यासाठी हालचाली

पुढील पावसाळय़ापर्यंत ठाणे जिल्ह्य़ातील पाणीपुरवठय़ाचे योग्य नियोजन व्हावे, यासाठी जलसंपदा विभागाने मुख्य शहरांमध्ये आठडय़ातून एक दिवस पाणीकपात लागू केली आहे. मात्र जिल्ह्य़ातील वेगवेगळय़ा प्राधिकरणांनी मंजुरीपेक्षा अतिरिक्त पाण्याचा उपसा सुरू केल्याने जलसाठय़ातील तूट वाढू लागली आहे. या पाश्र्वभूमीवर उपसा कमी न झाल्यास या शहरांमध्ये आठवडय़ातून दोन दिवस पाणीकपात करावी लागेल, असा इशाराच जलसंपदा विभागाने दिला आहे.

पावसाळ्यापर्यंत नागरिकांना पाणीटंचाई भेडसावू नये यासाठी जलसंपदा विभागातर्फे दर महिन्याला पाणीपुरवठय़ाचा आढावा घेतला जातो. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात केलेल्या पाहणीत ठाणे जिल्ह्य़ाला होणाऱ्या उपलब्ध आणि आवश्यक असणाऱ्या पाणीपुरवठय़ात २२ टक्क्यांची तूट असल्याचे आढळून आले आहे. यानुसार पाणीपुरवठय़ाचे नियोजन सुरळीत होण्यासाठी महिनाभरापासून जिल्ह्य़ातील महापालिका क्षेत्रांत आठवडय़ातून एक दिवस पाणीकपात सुरू करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाकडून प्रत्येक महापालिकेला पाणी उपसा करण्याचे प्रमाण निश्चित करून देण्यात आले आहे. मात्र त्या त्या विभागांकडून पाणीपुरवठा होणाऱ्या क्षेत्रातील लोकसंख्येची जलगरज अधिक असल्याने परवानगीपेक्षा अधिक पाण्याचा उपसा केला जात आहे. हा अतिरिक्त उपसा सुरू राहिल्यास काही महिन्यांत आठवडय़ातून दोनदा पाणी कपात करावी लागेल, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

पाणीकपातीचा परिणाम अंतर्गत भागात जाणवू लागला आहे. एक दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने नेहमीपेक्षा कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे इमारतींच्या टाकीतच काही प्रमाणात कमी पाणीपुरवठा होत असल्याने हे पाणी घराघरात जाईपर्यंत एरवीपेक्षा त्याचे प्रमाण कमी असते. एक दिवस पाणी नसल्यावर रिकामी झालेली टाकी पुन्हा भरण्यासाठी निश्चितच जास्त कालावधी लागतो. त्यामुळे आताच काही प्रमाणात पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे, असे लोकमान्यनगर परिसरात राहणाऱ्या अर्चना चव्हाण यांनी सांगितले.

पाणीकपात कुठे, कधी?

* एमआयडीसी क्षेत्रात दर शुक्रवारी

* महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या हद्दीत दर सोमवारी

* कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत दर मंगळवारी

* स्टेम प्राधिकरणाला दर बुधवारी आणि शुक्रवारी

जलसंपदा विभागाला १५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करावे लागते. गेल्या दोन महिन्यांत केलेल्या पाहणीनुसार सध्या पाणीपुरवठय़ात २२ टक्क्यांची तूट आहे. पाण्याचा अतिरिक्त वापर सुरूच राहिल्यास येत्या काही महिन्यांत आठवडय़ातून दोनदा पाणीकपात करावी लागेल.

– उमेशचंद्र पवार, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, ठाणे