scorecardresearch

घोडबंदर भागात पाणीटंचाई

महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा योजनेच्या पुनर्नियोजनाबरोबरच वाढीव पाणीपुरवठय़ासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी घोडबंदर भागातील मोठय़ा वसाहतींना पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत असल्याची बाब समोर आली आहे.

टँकर पाणीखरेदीमुळे गृहसंकुलांच्या आर्थिक गणितावर परिणाम

ठाणे : महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा योजनेच्या पुनर्नियोजनाबरोबरच वाढीव पाणीपुरवठय़ासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी घोडबंदर भागातील मोठय़ा वसाहतींना पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत असल्याची बाब समोर आली आहे. या पट्टय़ातील बहुतांश गृहसंकुलांना दररोज एका टँकरसाठी हजार रुपये मोजावे लागत असून मोठय़ा संकुलांना दिवसाला १५ ते १७ टँकरमार्फत पाणी विकत घ्यावे लागत आहे. यामुळे आर्थिक गणित बिघडल्याने संकुलातील रहिवासी मेटाकुटीला आले आहेत.

घोडबंदर भागात महापालिकेमार्फत दररोज १०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येत आहे. स्टेम आणि पालिकेच्या स्वत:च्या योजनेतून हा पाणीपुरवठा केला जातो. स्टेमचा पाणीपुरवठा दुरुस्ती कामासाठी अनेकदा बंद ठेवला जातो. त्या वेळेस पालिकेच्या स्वत:च्या योजनेतील पाण्याचे विभागवार नियोजन करून त्याचा पुरवठा केला जातो. यामुळे तात्पुरता दिलासा मिळतो; परंतु पाणीपुरवठा बंदनंतर पुढील काही दिवस पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. तसेच वाढत्या गृहसंकुलांच्या तुलनेत पाणीपुरवठय़ात फारशी वाढ झालेली नाही. परिणामी घोडबंदर भागातील मोठय़ा वसाहतींना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत.

पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे गृहसंकुलांना टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे. या संदर्भात कावेसर येथील विजय विलास गृहसंकुलातील रहिवासी मधु नारायनन उन्नी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या गृहसंकुलात ३३५ सदनिका आहेत. या संकुलाला दररोज २ लाख लिटर इतक्या पाण्याची आवश्यकता आहे; परंतु पालिकेकडून ७५ ते ८० हजार लिटर  पाणीपुरवठा उपलब्ध होतो. टंचाईमुळे दररोज १७ टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत असून त्यासाठी प्रत्येक टँकरमागे एक हजार रुपये खर्च करावे लागतात. यामुळे रहिवाशांकडून इमारतीच्या मासिक देखभाल व दुरुस्ती खर्चाव्यतिरिक्त महिन्याला एक हजार रुपये जास्त द्यावे लागत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन

 २०१६ मध्ये घोडबंदर भागातील रहिवासी वकील मंगेश शेलार यांनी पाणीटंचाईसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या अंतिम सुनावणीत नवीन प्रकल्पांना परवानगी देण्यापूर्वी ठाणे महापालिकेने समिती स्थापन करून ही समिती बैठक घेऊन सामान्य नागरिकांचे घरगुती पाणीपुरवठय़ाबाबत तक्रारी ऐकून समस्येचे समाधान करेल, अशी प्रमुख अट होती; परंतु महानगरपालिकेने कोणतीही समिती स्थापन केली नाही आणि नवीन प्रकल्पांना परवानगी दिली. यामुळे घोडबंदर भागातील पाणीसमस्या गंभीर बनत आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांना नोटीस बजावून येत्या सात दिवसांत पाणीपुरवठय़ात सुधारणा करण्याची मागणी केली आहे. तसे झाले नाही तर न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करू, असे भाजपचे ठाणे शहर चिटणीस दत्ता घाडगे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Water scarcity ghodbunder area ysh

ताज्या बातम्या