scorecardresearch

डोंबिवली एमआयडीसीमध्ये पाण्याचा ठणठणाट

डोंबिवली येथील औद्योगिक क्षेत्रातील निवासी भागात काही महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. गुरुवारी सकाळी मिलापनगर, सुदर्शननगर मधील अनेक सोसायट्या, बंगल्यांना पाणी न आल्याने रहिवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

Residents march for water at Dombivli MIDC office

डोंबिवली येथील औद्योगिक क्षेत्रातील निवासी भागात काही महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. गुरुवारी सकाळी मिलापनगर, सुदर्शननगर मधील अनेक सोसायट्या, बंगल्यांना पाणी न आल्याने रहिवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. गेल्या आठवड्यापासून रिजेन्सी अनंतम, रिजेन्सी संकुल, दावडी भागात तीव्र पाणी टंचाई सुरू आहे.गेल्या आठवड्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २७ गाव हद्दीला मुबलक पाणी पुरवठा झाला पाहिजे, असे आदेश एमआयडीसी, पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले होते. पाणी वाटपातील त्रृटी आणि चोऱ्या पकडण्यासाठी उद्योगमंत्री सामंत यांनी गेल्या सप्ताहात २७ गाव हद्दीतील संदप आणि अन्य भागात रात्रीच्या वेळेत धाड टाकून पाणी चोरीचे प्रकार उघड केले होते. या घटनेनंतर एमआयडीसी अधिकाऱ्यांनी १५ हून अधिक पाणी चोऱांवर गुन्हे दाखल केले आहेत.

हेही वाचा >>>ठाणे : जीएसटी गैरव्यवहारप्रकरणी ओप्पो कंपनीच्या व्यवस्थापकाला अटक

हा सगळा प्रकार घडुनही २७ गावांसह एमआयडीसी, या भागातील मोठी गृहसंकुलांमध्ये पुन्हा पाणी टंचाई सुरू झाल्याने रहिवाशांमध्ये अस्वस्थता आहे. दिवसभर पुरेल इतके पाणी घरात येत होते मग अचानक काही महिन्यांपासून हे पाणी गेले कुठे, असे प्रश्न रहिवासी उपस्थित करत आहेत. एमआयडीसी, दावडी भागातील रहिवाशांनी दोन दिवसापूर्वी एमआयडीसीच्या डोंबिवली कार्यालयावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना पाणी टंचाईवरुन जाब विचारला होता. गुरुवारी सकाळी एमआयडीसीतील खासदार बंगला ते आर. आर. रुग्णालय भागातील एकाही बंगल्यात पाण्याचा थेंब आला नसल्याची माहिती रहिवाशांनी दिली.रिजेन्सी अनंतम संकुलाच्या रहिवाशांनी पाणी टंचाईवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून या महत्वपूर्ण विषयात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या वादाचे हे पडसाद असल्याचा सूर रहिवाशांकडून काढला जात आहे.

हेही वाचा >>>महेश आहेर यांची ठाणे पोलिसांकडून चौकशी

टँकर समुह सक्रिय

२७ गाव हद्दीत पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर माफियांचा एक समुह सक्रिय आहे. या समुहाकडून या भागात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात असल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात येते. एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीला छिद्र पाडून ते पाणी घराजवळ खोदलेल्या विहिरीत किंवा कुपनलिकेत काढून घ्यायचे. ते पाणी टँकरव्दारे परिसराला चढया दराने विकायचे. असा पाणी विक्रीचा धंदा दोन वर्षापासून २७ गाव हद्दीत सुरू झाला आहे. हे टँकर माफिया मोठ्या गृहसंकुलांना होणाऱ्या पाणी पुरवठा जलवाहिनीत दगड, सिमेंटच्या गोणी टाकून पाणी पुरवठ्यात व्यत्यय येईल अशी व्यवस्था करतात. पाणी टंचाई सुरू झाली की रहिवाशांना पाण्याची गरज असल्याने दोन हजार रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत लिटरपणे पाण्याचे टँकर विकतात, असे रहिवाशांनी सांगितले.काटई-बदलापूर जलवाहिनीवरुन वाहन धुलाई केंद्रे पाणी चोरांनी पुन्हा सुरू केली आहेत. या चोरांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसही बघ्याची भूमिका घेत असल्याने पोलिकांच्या भूमिकेविषयी आता संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा >>>स्वागत यात्रेत कल्याण डोंबिवली पालिकेचा स्वच्छतेचा जागर

दोन महिन्यात सुरळीत

काटईकडून एमआयडीसीच्या दिशेने नवीन वाहिन्या टाकण्याची कामे सुरू आहेत. येत्या दोन महिन्यात हे काम पूर्ण होईल. टंचाईला भागाला सुरळीत पाणी पुरवठा होईल, अशी माहिती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता शंकर आव्हाड यांनी एमआयडीसीच्या शिष्टमंडळाला दिली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 11:10 IST

संबंधित बातम्या