काही भागांत चार दिवसांपासून पुरवठा विस्कळीत

डोंबिवली : डोंबिवलीत गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागात पुरेशा प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नसल्यामुळे रहिवाशांचे हाल होत आहेत. शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे भरली आहेत. असे असताना पाणीपुरवठा पंपात तांत्रिक बिघाड झाल्याने पुरवठा विस्कळीत झाल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. गेल्या चार दिवसांपासून नागरिकांना टँकर मागवून पाण्याची गरज भागवावी लागत आहे.

महापालिकेच्या जलकुंभांवरून काही सोसायटी पदाधिकाऱ्यांनी टँकर मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, शुक्रवारपासून नोंदणी असलेल्या सोसायटय़ांनाही अजूनही पाण्याचा पुरवठा झालेला नाही अशा तक्रारी आहेत. टँकरमार्फत पाणीपुरवठा होणाऱ्या डोंबिवलीतील रामचंद्र, पश्चिमेतील जयहिंद वसाहत येथील जलकुंभांवर टँकर मिळविण्यासाठी रहिवाशांची झुंबड उडाली होती.

मोहेली येथील पाणीपुरवठा करणाऱ्या केंद्रातील दुरुस्तीचे काम असल्याने शहराचा पाणीपुरवठा शुक्रवारी दिवसभर अधिकृतपणे बंद ठेवण्यात आला होता. नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी पाणी येईल असे रहिवाशांना वाटले. दुसऱ्या दिवशीही पाणी आले नाही. त्यात बाजीप्रभू चौकात शनिवारी महावितरणचे विजेचे काम सुरू असताना अपघात झाला. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम भागाचा वीजपुरवठा सकाळी साडे अकरा ते साडे तीन वाजेपर्यंत बंद होता. या कालावधीत काही भागात पाणीपुरवठा करण्यात महापालिकेस यश मिळाले. मात्र ज्या भागात विजेचा पुरवठा सुरळीत झाला नाही तेथील जलकुंभांमध्ये पाणी चढले नाही. ‘पाणीपुरवठा केंद्रांवरील दुरुस्तीचे काम शुक्रवारी पूर्ण करण्यात आले होते. मात्र शनिवारी पाणीपुरवठा पंपांमध्ये तांत्रिक अडचणी आल्या. हे अडथळे शनिवारी दुपारी दूर करण्यात आले. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. खंडित प्रवाहानंतर पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी काही तास जातात. त्यामुळे पाण्याचा तुटवडा दिसतो. ही परिस्थिती सुधारेल’, असे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी सांगितले.