शिवसेनेकडून राष्ट्रवादीची कोंडी करण्याचा प्रयत्न

ठाणे : मुंब्रा भागात गेल्या तीन महिन्यांपासून पाणी मिळत नसल्याचा आरोप करत महापालिका विरोधी पक्षनेते शानु पठाण यांनी बुधवारच्या सर्वसाधारण सभेत आंदोलन केले. हाच धागा पकडत मुंब्य्रातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कोटय़वधी रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता देऊनही या ठिकाणी पाणीटंचाई समस्या कायम असेल तर निधी जातो कुठे असा प्रश्न उपस्थित होताच महापौर नरेश म्हस्के यांनी या कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंब्रा आणि दिवा भागात गेल्या काही वर्षांपासून जुन्या जीर्ण वाहिन्या आणि वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे पाणीटंचाईची समस्या जाणवत होती. त्यावर तोडगा म्हणून राष्ट्रवादीने पाणीपुरवठा पुनर्नियोजन प्रकल्प राबविण्याची मागणी केली होती. त्याआधारे पालिकेने तीन वर्षांपूर्वी या ठिकाणी पाणीपुरवठा पुनर्नियोजन प्रकल्प राबविण्याचे काम हाती घेतले. या प्रकल्पामध्ये वितरण व्यवस्थेतील जलवाहिन्या बदलण्याची कामे बऱ्यापैकी पूर्ण झाली आहेत. तरीही मुंब्रा भागात पाणीटंचाईची समस्या असल्याची ओरड राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून केली जात आहे. याच मुद्दय़ावरून महापालिका विरोधी पक्षनेते शानु पठाण यांनी बुधवारच्या सर्वसाधारण सभेत आंदोलन केले.

तीन महिन्यांपासून मुंब्य्रात पाणी मिळत नसल्याचा आरोप त्यांनी या वेळी करताच महापौर नरेश म्हस्के यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत या विषयावर चर्चा करण्यास परवानगी दिली. या चर्चेदरम्यान मुंब्य्रातील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी सर्वसाधारण सभेने यापूर्वी कोटय़वधी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली असून त्यात पाणीपुरवठा पुनर्नियोजन प्रकल्पाचा समावेश आहे. हे प्रकल्प राबविल्यानंतरही मुंब्य्रात पाणीटंचाई कायम असेल तर निधी जातो कुठे असा प्रश्न शिवसेनेचे नगरसेवक विकास रेपाळे यांनी उपस्थित करत या प्रकल्पांची पाहणी करण्याची मागणी केली.  शिवसेना नगरसेवक योगेश जानकर यांनी या प्रकल्पाची चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर मुंब्र्यात २१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता, तो आता दोन टँकरवर आला आहे. यावरून मुंब्य्रात पाणीपुरवठा होत असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच कैलाशनगर, गावदेवी आणि अमृतनगर या भागांत प्रकल्पाचे काम थांबविण्यात आले होते, असे स्पष्टीकरण पालिकेचे कार्यकारी अभियंता विकास ढोले यांनी दिले. अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाणी दौरा करण्यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा करून आयोजित केला जाईल, असे स्पष्ट केले.

पाणीपुरवठय़ाची सद्यस्थिती

कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील पाणीपुरवठा समस्या सोडविण्यासाठी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रयत्न केले. यामुळे दिव्याला २९ ते ३० दशलक्ष लिटर, मुंब्य्राला ४८ ते ५०, कळव्याला ४३ दशलक्ष लिटर  पाणीपुरवठा एमआयडीसीकडून होत आहे. कळवा भागात २४ दशलक्ष लिटर आणि मुंब्रा भागात २० दशलक्ष लिटर स्टेममार्फत पुरवठा होत आहे.

प्रकल्प असा..

 ठाणे महापालिकेने २१२ कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल तयार केला होता. १५ मे २०१९ मध्ये पालिकेने प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली होती. हे काम पूर्ण करण्यासाठी पालिकेने संबंधित ठेकेदाराला ३६ महिन्यांची मुदत दिली होती. करोना संकटामुळे वर्षभर प्रकल्पाची कामे ठप्प होती. या प्रकल्पामध्ये वितरण व्यवस्थेसह अतिरिक्त अशा ९३ किमी लांबीपर्यंत जलवाहिन्या टाकण्यात येणार असून त्यापैकी ४० किमी लांबीच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर, मुख्य वाहिनीपासून जलकुंभापर्यंत १२ किमीपर्यंतच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम करण्यात येणार असून त्यापैकी ५.३७ किमीपर्यंत जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.  तसेच १७ जलकुंभ बांधणे अशी कामेही करण्यात येणार आहेत.