कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील विविध भागांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुध्दीकरण केंद्रांमधील यांत्रिक, विद्युत, देखभाल दुरुस्तीचे काम २६ एप्रिल रोजी हाती घेतले जाणार आहे. या कामासाठी कल्याण, डोंबिवली, टिट‌वाळा शहरांचा पाणी पुरवठा मंगळवारी सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत बंद राहणार आहे, अशी माहिती पालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी दिली आहे.

“कल्याण पूर्व, पश्चिम, कल्याण ग्रामीण, डोंबिवली पूर्व, पश्चिम, टिटवाळा-मांडा शहरांना पालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा येथील जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा केला जातो. पावसाळा तोंडावर आल्याने या केंद्राची पावसाळ्यापूर्वीची यांत्रिक, तांत्रिक, विद्युत कामे करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात अशी दुरुस्तीची कामे हाती घेता येत नसल्याने ही कामे आता केली जाणार आहेत,” असे कार्यकारी अभियंता मोरे यांनी सांगितले.

मंगळवारी या भागांचा पाणी पुरवठा १२ तास बंद राहणार असल्याने रहिवाशांनी एक दिवस पुरेल एवढा पाणी साठा करून ठेवावा. एक दिवसाच्या बंदमुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.