प्रशासकीय अनास्थेमुळे प्रवासी सुरक्षा बोट रखडली; रहिवाशांची तीव्र नाराजी
भाईंदर आणि नायगाव यांदरम्यान असलेल्या पाणजू बेटावर जाणारी बोट नायगाव खाडीत कलंडून झालेल्या अपघातामुळे पाणजूवासीयांच्या असुरक्षित प्रवासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पाणजूवासीयांना जलमार्गाशिवाय प्रवासाचा दुसरा कोणताही पर्याय नसल्याने त्यांना फेरीबोटीतूनच प्रवास करावा लागतो. पण या फेरीबोटीही तकलादू आणि असुरक्षित असतात. या दुर्घटना टाळण्यासाठी मंजूर झालेली सुरक्षा प्रवासी बोट प्रशासकीय अनास्थामुळे मंजूर होऊनही पाण्यात उतरलीच नाही. त्यामुळे आजही पाणजूवासीयांना धोकादायक फेरीबोटीतून जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे.
रविवारी सकाळी पाणजू येथे लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी बोट नायगाव खाडी किनाऱ्यावर कलंडली. या अपघातात एक जण ठार तर २१ प्रवासी जखमी झाले होते. या बेटावर जाण्यासाठी येथील नागरिकांना करावा लागणारा प्रवास किती असुरक्षित आहे, त्याची प्रचीती पुन्हा या घटनेच्या निमित्ताने आली. २०१०मध्ये देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या खोचिवडे गावातील रहिवाशांच्या बोटीला समुद्रात जलसमाधी मिळाली होती. या दुर्घटनेत खोचिवडे गावातील नऊ जणांचा बळी गेला होता. त्यानंतर सरकारने प्रवासी बोटींच्या सुरक्षेचे नियम कडक केले होते. ठाणे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती विजय पाटील यांनी प्रवासी सुरक्षा बोट मंजूर केली होती. त्याच्या निविदाही निघाल्या होत्या; परंतु ठाणे जिल्ह्याचे विभाजनामुळे या बोटीचे काम रखडले होते. ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी प्रवासी सुरक्षा बोट योजनेचा नंतर पाठपुरावाच झाला नाही. प्रवासी सुरक्षा बोट असती तर दुर्घटना टळू शकली असती, असे विजय पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, बोट कलंडली तेव्हा अनेक महिलांचे दागिने पाण्यात पडले होते. ते शोधण्याचे काम सोमवारी सुरू होते. त्यातील काही दागिने सापडले. या दुर्घटनेनंतर निशा भोईर आणि दिपेश पाटील यांनी पाणजू ऐवजी बऱ्हामपूर गावातील मंदिरात साधेपणाने लग्न केले.
पूल होणार कधी?
नायगावच्या पाणजू बेटाची लोकसंख्या तीन हजारांहून अधिक आहे. या लोकांना दररोज बोटीने नायगाव किनाऱ्यावर यावे लागते. एकच प्रवासी बोट असल्याने लोकांना त्याच्यासाठी वाट पाहावी लागते. पावसाळ्यात तर अधिकच हाल होत असतात. पावसाळ्यात फेरी बोटी बंद असतात. अशा वेळी ग्रामस्थांना जुन्या पुलावरून चार किलोमीटर पायपीट करत नायगाव स्थानकावर यावे लागते. रेल्वे पुलावरून चालणे धोकायदायक असते. रात्रीच्या वेळी पुलावरून चालत जाताना अपघात घडले आहेत.
पूर्वी नवीन रेल्वे पूल नसताना या पुलावरून जाणाऱ्या अनेक ग्रामस्थांना प्राण गमवावे लागले होते. एमएमआरडी मार्फत नवीन पूल बांधला जाणार आहे. किमान आता तरी या नव्या पुलाचे काम तात्काळ हाती घ्यावे, अशी मागणी पाणजूचे उपसरपंच विलास भोईर यांनी केली.

नेत्रदानाची इच्छा अपूर्णच
पाणजू दुर्घटनेत मृत झालेल्या रामचंद्र म्हात्रे (५२) यांची मरणोत्तर नेत्रदान करण्याची इच्छा अपूर्णच राहिली. म्हात्रे हे वसईतील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. रविवारी ते पाणजू येथे लग्नास जाण्यास निघाले असता ही दुर्घटना घडली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. म्हात्रे यांचे नेत्रदान करावे, अशी इच्छा त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. त्यांनी वसईतील देहमुक्ती चळवळीचे प्रणेते पुरुषोत्तम पवार यांच्याकडे ही इच्छा व्यक्त केली होती. मात्र बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे अवयवदान करता येत नाही, अशी माहिती पुरुषोत्तम पवार यांनी दिली असल्याने त्यांचे नेत्रदान करता आले नाही.

..तर मृतांचा आकडा वाढला असता
या फेरी बोटींवर सुरक्षेच्या कुठल्याच उपाययोजना नाहीत. या बोटी चालविण्याचा ठेका पंचायत समितीच्या सभापती चेतना मेहेर यांना मिळालेला आहे. रविवारी पाणजू गावात दोन लग्न आणि क्रिकेटचे सामने होते. त्यामुळे गावात येणारे वऱ्हाडी आणि सामन्यासाठी येणारे प्रेक्षक तसेच खेळाडू यांची गर्दी झाली होती. वधूपित्याने येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींसाठी रेती वाहून नेणाऱ्या बोटींची व्यवस्था केली होती. या बोटी दुय्यम दर्जाच्या होत्या. बोट किनाऱ्यावरच कलंडली आणि मोठी जीवितहानी टळली. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.