कल्याण-डोंबिवली शहराच्या अनेक भागांत रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे भूमिगत जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे पाण्याची बेसुमार अशी नासाडी होत असून दुसरीकडे डोंबिवली शहराचा भाग असलेल्या नांदिवली परिसरात तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या भागांत अनेक ठिकाणी पाण्यासाठी टँकर मागविले जात आहेत.
डोंबिवली पूर्व भागातील स्वामी समर्थ मठाकडील नांदिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत धनश्री प्रथमा कॉम्प्लेक्स आहे. या संकुलात पाच इमारती आहेत. त्यामध्ये सुमारे १२०० कुटुंबांचे वास्तव्य आहे. गेल्या दोन वर्षांपासून या संकुलात तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई निर्माण झाल्याची तक्रार येथील रहिवासी करू लागले आहेत. नांदिवली ग्रामपंचायत प्रशासन लाखो रुपयांचा कर वसूल करते. पण पाण्याची सुविधा देण्यास टाळाटाळ करते. मुबलक पाणीपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी रहिवाशांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. गुळमुळीत उत्तरे देण्यापलीकडे ग्रामसेवक काहीही करीत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
सागाव, सोनारपाडा, नांदिवली, गांधीनगर, भोपर, पी अ‍ॅण्ड टी कॉलनी भागात मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर इमारती, चाळी उभारण्यात आल्या आहेत. या संकुलांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलवाहिन्यांवरून चोरून पाणीपुरवठा केला जातो. भूमाफियांची दहशत असल्याने एमआयडीसी, ग्रामसेवक या अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्यास कचरतात.  ग्रामपंचायतीला नियमित कराचा भरणा करणाऱ्या, अधिकृत संकुलात राहणाऱ्या रहिवाशांना मात्र चोरून पाणी वापरणाऱ्या संकुलांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
लालबाग, परळ, दादर परिसरातील अनेक कुटुंबे या भागात वास्तव्यासाठी आली आहेत. कल्याणमधील आधारवाडी चौक, रामबाग, मुरबाड रोड, बिर्ला शाळेजवळ, आरटीओ कार्यालयाजवळ, वायलेनगर भागात रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. या रस्ते कामांच्या ठिकाणी जलवाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या फुटल्याने पाणी रस्त्यांवरून वाहून जात आहे. त्यामुळे एका भागात पाण्याची नासाडी होत आहे, तर दुसरीकडे टंचाई निर्माण झाल्याचे
चित्र आहे.