उल्हासनगरमध्ये तिघांवर गुन्हा

कल्याण : उल्हासनगर शहरात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. प्रशासन करोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न करत असताना दोन कुटुंबीयांनी घरातील विवाह सोहळा ८० वऱ्हाडींच्या उपस्थितीत पार पाडला. करोना संसर्गाचे सर्व नियम झुगारून, पोलीस, पालिकेला अंधारात ठेवून वधू-वराच्या नातेवाईकांनी, सभागृह मालकाने हा सोहळा पार पाडल्याने त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राजू नरसिंघानी, मोहनालाल पिरवानी, नासिर शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या यजमानांची नावे आहेत. उल्हासनगरमध्ये करोना रुग्णांची संख्या एक हजार पार गेली आहे. शहराचे विविध भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून पालिकेने घोषित केले आहेत. अशी परिस्थिती असताना उल्हासनगर कॅम्प एकमधील हेमराज दूध डेअरीजवळ पंचायत सभागृह येथे बुधवारी दुपारी साडे तीन वाजता एका विवाह सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात ८० वऱ्हाडी सहभागी झाले होते. ५० जणांच्या उपस्थिीत करोना संसर्गाचे नियम पाळून विवाह सोहळ्याला शासनाने परवानगी दिली आहे. पण या सोहळ्यात ८० वऱ्हाडी करोना संसर्गाचे नियम न पाळता सहभागी झाले होते. ही माहिती पोलिसांना मिळताच उपनिरीक्षक सचिन शिंदे, बी. बी. आव्हाड यांचे पथक विवाह सोहळ्याच्या ठिकाणी हजर झाले. या सोहळ्यासाठी पोलिसांची परवानगी घेतली नव्हती. एखादा करोना सकारात्मक रुग्ण या कार्यक्रमात असेल तर त्याची बाधा इतरांना होईल हे माहिती असुनही करोना संसर्गाचे नियम न पाळल्याने पोलिसांनी संयोजकांवर राष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्याने गुन्हे दाखल केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिकेतर्फे सामाजिक अंतराचे पालन करू आणि ५० जणांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडेल या हमीपत्रावर संयोजकांना विवाहाला परवानगी दिली जाते. पंचायत सभागृहातील सोहळ्यात करोनाची लक्षणे असणारा वऱ्हाडी आढळला तर इतरांच्या चाचणी केल्या जातील, असे पालिका साहाय्यक आयुक्त अजय एडके यांनी सांगितले. दीड महिन्यापूर्वी उल्हासनगरमध्ये करोनाने मयत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिलेल्या सुमारे ५० हून अधिक जणांना विलगीकरणात जाण्याची घटना घडली होती.