मुरबाड येथील मुरबाडी नदीवर असलेल्या बंधाऱ्याची दारेच चोरून नेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही दारे कुणी चोरली याविषयी सध्या उलटसुलट चर्चा असून काही ग्रामस्थांकडून हा प्रकार घडल्याचा शासकीय यंत्रणांना संशय आहे.
कल्याण आणि मुरबाड तालुक्याच्या सीमेवर पोटगावातून मुरबाडी नदी वाहते. उन्हाळ्यात या नदीस पाणी कमी असले तरी पावसाळ्यात ती दुथडी भरून वाहत असते. तसेच पुढे ही नदी बारवी नदीच्या प्रवाहाला येऊन मिळते. त्यानंतर या दोन्ही नद्या पुढे उल्हास नदीला येऊ न मिळतात. या नदीमुळे आसपासच्या विहिरींच्या पाण्याची पातळीही चांगली राहत होती. या नदीवर एक बंधारा बांधण्यात आला आहे. त्याला शासनातर्फे चौदा लोखंडी दारे बसवण्यात आली होती. या दारांची चोरी झाली आहे. याबाबत पोटगावचे ग्रामसेवक सुनील कोर यांच्याशी संपर्क केला असता, गेल्या वर्षीपासूनच ही दारे चोरीला गेली आहेत. नव्या दारांची उपलब्धता करण्यासाठी निवेदन दिले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यंदा पाणी पातळी वाढणे कठीण असल्याचेही त्यांनी सांगितले. वीटभट्टी आणि फळभाजी पिकवणारे शेतकरी मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा उपसा करतात. त्यामुळे नदीने मार्च महिन्यातच तळ गाठल्याचेही त्यांनी नमूद केले. पावसाळ्यापूर्वी येथे नव्याने लोखंडी दारे बसवली नाहीत, तर नदीतील पाणी अडविणे शक्य होणार नाही. सध्या गावासाठी नदीच्या जवळच असलेल्या विहिरीतून गावाला पाणीपुरवठा केला जातो. मात्र या भागातील पाणीपातळी आता कमी झाली असून पावसाचे आगमन लांबल्यास गावात पाणी प्रश्न उद्भवण्याची चिन्हे आहेत. मुरबाड लघुपाटबंधारे विभागाशी याबाबत संपर्क केला असता, अधिकारी प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाही.
वीटभट्टी मालकांनी पाणी पळवले
नदीच्या किनारी अनेक वीटभट्टीचे उद्योग चालतात. या उद्योगांसाठी नदीच्या पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर उपसा केला जात असल्याने मे महिन्यांपर्यंत टिकणारे पाणी मार्चअखेरीसच संपुष्टात आले आहे. पाणी संपल्याने आता तेथे रेती उपसा करण्यासही सुरुवात झाली आहे. त्यामुळे बेकायदा पाणी उपसा हेतुपुरस्सर केल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.