डोंबिवली – चोळेगाव तलाव ते ९० फुटी रस्त्यावर सोमवारी सकाळी सहा वाजता दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांनी पायी चाललेल्या एका महिलेला पत्ता विचारण्याचे कारण सांगून थांबिवले. ही महिला पत्ता सांगत असताना अचानक तिच्या गळ्यावर थाप मारून तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून चोरटे पळून गेले.
साठ हजार रूपये किमतीची सोन्याची साखळी चोरीला गेल्याने महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. डोंबिवली जवळील चोळेगाव तलाव, ९० फुटी रस्ता हा फिरण्यासाठी मोकळा परिसर असल्याने सकाळ, संध्याकाळ डोंबिवली शहरातील ठाकुर्ली, खंंबाळपाडा, एमआयडीसीतील रहिवासी या भागात फिरण्यासाठी येतात. या वेळेत गळ्यात सोन्याचा ऐवज असलेल्या महिला किंवा पुरुषावर पाळत ठेऊन त्याला एकटे गाठून त्याच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटून नेण्याचे प्रकार मागील दोन वर्षापासून ठाकुर्ली चोळेगाव, ९० फुटी रस्ता भागात वाढले आहेत. या भागात हमखास चोरी करता येते. पळायला मुबलक जागा आहे. त्यामुळे चोरट्यांचा या भागात दुचाकीवरून सतत वावर असतो. शाळा सुरू झाल्या की अनेक महिला आपल्याला मुलाला शाळेत सोडल्यानंतर घरी पायी निघतात. अशा महिलांना एकटे गाठून त्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज चोरण्याचे प्रकार यापूर्वी या भागात घडले आहेत.
त्रिमूर्तीनगर झोपडपट्टी भागात राहणाऱ्या रेखा कांबळे या गृहसेविका म्हणून काम करतात. त्या सोमवारी सकाळी सहा वाजता आपल्या कामाच्या ठिकाणी पायी निघाल्या होत्या. त्या चोळेगाव तलाव ते ९० फुटी रस्त्यावरील श्री कृष्ण प्लाझा इमारतीजवळून जात असताना अचानक दोन चोरटे त्यांच्या समोरील भागात दुचाकीवरून आले. त्यांनी रेखा कांबळे यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबविले. अनोळखी वाहन चालक या भागातून जात आहेत म्हणून दुचाकीवरून २० ते २५ वयोगटातील तरूणांनी विचारलेला पत्ता त्या विचार करून सांगत होत्या. पत्ता सांगत असतानाच रेखा कांबळे यांच्या गळ्यावर दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या इसमाने जोराने थाप मारून कांबळे यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली आणि दुचाकीवरून पळ काढला.
रेखा कांबळे यांनी चोर म्हणून ओरडा केला. पण तोपर्यंत चोरटे पळून गेले होते. सकाळच्या वेळेत चोळेगाव तलाव परिसरात शांतता असते. त्यामुळे बचावासाठी कोणीही पुढे आले नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलीस उपनिरीक्षक पी. एन. देसाई याप्रकरणाचा तपास करत आहेत.