अंजली मंगेश हाडवळे
महिला व मुलांसाठी विशेष साहाय्यता कक्ष – समुपदेशक  
व्यसनाधीन नवरा, आर्थिक विवंचना, चारित्र्यावरील संशयामुळे होणारा छळ, मुलगा होत नाही, हुंडा दिला नाही तसेच छोटय़ा-मोठय़ा कौटुंबिक कुरबुरीतून होणारे वाद अशा अनेक कारणांवरून घटस्फोटापर्यंत गेलेली अनेक प्रकरणे समाजामध्ये पाहायला मिळतात. अशा वेळी पती-पत्नीमध्ये सुसंवाद घडवून त्यांची संसारवेल नव्याने फुलविण्याचे काम राज्यातील जिल्हा परिषदेचे समुपदेश व मदतकेंद्रे करीत आहेत. ठाणे जिल्हा परिषदेतही अशा प्रकारचे समुपदेश व मदतकेंद्र कार्यरत आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने ही समुपदेशन केंद्रे चालवली जातात. ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाअंतर्गत महिला व मुलांसाठी विशेष साहाय्यता कक्षामध्ये अंजली हाडवळे या समुपदेशनाचे काम करतात. त्यांची कार्यपद्धती तसेच अनुभवांविषयी..
* ठाणे समुपदेशन केंद्राची स्थापना कशी आणि कधी झाली?
कौटुंबिक वाद हे कोणत्याही कायद्यात न अडकता केवळ समुपदेशनाने सोडवता यावेत, यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली. तसेच बाल गुन्हेगारी व बाल अत्याचारामधील बालकांसाठी कक्षाचा उपयोग केला जातो. जिल्हा महिला बाल कल्याण विभागाअंतर्गत महिला व मुलांसाठी २००५ मध्ये विशेष कक्ष स्थापन करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्य़ात एका कक्षास मान्यता देण्यात आली. ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा विशेष साहाय्यता कक्ष कार्यरत आहे. भारतीय स्त्री शक्ती या सेवाभावी संस्थेचे समुपदेशक येथे पीडित महिला व मुलांना मार्गदर्शन करतात, आधार देतात.  
* समुपदेशन केंद्राचे काम कसे चालते?
विवाहितांना भेडसाविणाऱ्या समस्या, त्यांचे प्रश्न तसेच अडचणी सोडवण्यासाठी भारतात राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर महिला आयोगाची अनेक कार्यालये उपलब्ध आहेत. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर मोफत कायदेशीर सल्ला देण्यासाठी विधिमंडळाची जिल्हा पातळीवरही कार्यालये उपलब्ध आहेत. अशा कार्यालयातून आवश्यक ती मदत मिळू शकते. अनेक खासगी संस्था आणि सेवाभावी संस्था अशा प्रकारच्या कामामध्ये कार्यरत आहेत. ठाणे शहरातील पोलीस ठाण्यामध्ये येणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी या कक्षामध्ये पाठविल्या जातात. अशा वेळी दोन्ही पक्षांची बाजू ऐकून त्यामधून मध्यमार्ग काढण्याचे काम समुपदेशक करत असतात. नवरा- बायको, कौटुंबिक वाद अशा अनेक तक्रारी येत असतात. तसेच लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांची प्रकरणेही कक्षापुढे येत असतात. अशा वेळी समुपदेशकांचे काम सर्वात महत्त्वाचे मानले जाते. लहान मुले पोलिसांना आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कबुली देण्यास घाबरतात. अशा वेळी त्यांना त्यांच्या कलेने समजावून त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम समुपदेशक करत असतात.
*  ठाण्यात कशा प्रकारच्या तक्रारी अधिक आहेत?
‘घरोघरी मातीच्या चुली’ तसे सर्वसाधारणपणे तक्रारींचे स्वरूप सर्वसाधारणपणे सारखेच असते. मात्र ठाणे ग्रामीण विभागात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण अधिक आहे. चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला मारहाण करण्याचे प्रमाण अधिक आहे. हल्ली तर व्हॉटस्अ‍ॅप आणि फेसबुक आदी सोशल नेटवर्किंग साइट्समुळे लोक जितके जवळ आले त्याहून अधिक दुरावल्याचे चित्र समोर येत आहे. या अशा सोशल नेटवर्किंग साइट्समुळे कित्येक संसार तुटताना पाहिले आहेत. त्याचप्रमाणे ‘विवाहबाहय़ संबधां’च्या तक्रारी दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. लहान मुलांवर होणारे अत्याचार, बाल गुन्हेगार अशा अनेक तक्रारी आम्ही हाताळत असतो.
* तक्रारींचे निवारण कशा पद्धतीने केले जाते?
आम्ही दोन्ही बाजू नीटपणे ऐकून घेतो. केवळ महिलांची बाजू न ऐकता पुरुषांची बाजूही समजून घेतो. त्यानंतरच दोघांनाही सल्ला देतो, मार्गदर्शन करतो. तक्रारीचे निवारण करताना विवाह संबंध टिकून राहावेत, हा आमचा मुख्य उद्देश असतो. त्याच उद्देशाने दोघांचेही समुपदेशन करतो. लहान मुलांनाही त्याच्या कलेने प्रश्न विचारतो. त्यांनी असा गुन्हा का केला? त्याचे कारण काय? असे अनेक प्रश्न विचारतो. त्यांच्याकडून गुन्हा कबूल झाल्यावर त्यांची बाजू न्यायालयात मांडण्याचे कामही आम्ही करतो. पीडित महिलांना शेल्टरहोममध्ये पाठविण्याचे कामही आम्ही करतो. महिलांना योग्य तो न्याय मिळावा, हा यामागचा मुख्य उद्देश असतो.  
* काही प्रकरणे सोडविताना त्रास होतो का?
पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हा कक्ष असल्याने काही वेळा महिला घाबरतात. पोलिसांबद्दल त्यांच्या मनात भीती असते. ते दबाव टाकतील असे त्यांना वाटत असते. आम्ही प्रेमाने आणि आपुलकीने बोलून त्यांना मार्गदर्शन करतो. काही वेळा अतिशय अमानुषपणे महिलांवर अत्याचार होतात. अशा वेळी केवळ महिलेचे प्राण ही प्राथमिकता मानून गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. अशा प्रकरणात त्या महिलेच्या राहण्याची आणि उपजीविकेची सोय करून देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. अशा गोष्टींमध्ये पोलिसांची खूप मदत होते. लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणामध्ये पालक खूप घाबरलेले असतात. त्यांना समाज काय म्हणेल याची सर्वाधिक चिंता असते. अशा पालकांचे मतपरिवर्तन करणे थोडे कठीण असते. मात्र पीडित मुलीला न्याय मिळावा, हाच आमचा हेतू असतो. त्यामुळे अशा प्रकरणांचा नीट पाठपुरावा करावा लागतो.   
* या उपक्रमापुढील प्रमुख अडचणी कोणत्या?
ठाणे शहरामध्ये पीडित महिलांसाठी वसतिगृह नाही. अशा महिलांना आम्हाला भोईसर किंवा इतर ठिकाणी स्थलांतरित करावे लागते. प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये एक तरी समुपदेशक असावा, असे माझे मत आहे. त्यामुळे लवकरात लवकर तक्रार निवारणाला मदत होऊ शकते. पीडित बालकांचे पालक तक्रार करण्यास संकोच करत असतात. अशा वेळी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून गुन्हेगाराला कायदेशीर शिक्षा कशी मिळवून द्यायची याबाबतही आम्ही मार्गदर्शन करतो. समस्या निवारणानंतरही पुढे त्या दाम्पत्याचे काय झाले, त्यांच्यामध्ये पुन्हा वाद निर्माण झाला का किंवा लहान मुलांच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये काय सुधारणा झाली, समाजाकडून त्यांना काही वाईट वागणूक मिळतेय का, अशा अनेक गोष्टींचा मागोवा घ्यावा लागतो. एखादी केस पूर्णपणे मिटली आहे, याची कुणीही शाश्वती देऊ शकत नाही.
* हे क्षेत्र तुम्ही का निवडले?
मला समाजसेवेची आवड आहे. लोकांवर होणाऱ्या अत्याचाराला योग्य दिशेने वाचा फोडण्याचे काम या महिला व बाल कल्याण विशेष साहाय्यता कक्षामार्फत करायला मिळते. काही वर्षे मी महिला आयोगाअंतर्गत समुपदेशनाचे काम केले. समाजाची सेवा ही योग्य मार्गाने करता यावी यासाठी मास्टर्स ऑफ सोशल वर्कमध्ये पदवी घेतल्यानंतर या कक्षामध्ये काम करण्यास सुरुवात केली. समुपदेशनाच्या आधारे लोकांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो. प्रसंगी कायद्याच्या आधारे त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करतो. आपल्या देशामध्ये शाळा-महाविद्यालयांमध्ये समुपदेशक असावेत. तसेच विवाहपूर्व समुपदेशन असावे असे माझे स्पष्ट मत आहे. त्यामुळे कौटुंबिक वादांचे प्रमाण कमी होईल.
– शलाका सरफरे