पिझ्झा, बर्गर, पास्ता हे आजच्या तरुणाईचे खास आवडीचे पदार्थ. त्यातही पास्ता हा इटालियन पदार्थ आपली हटके अशी ओळख ठेवून आहे. इटलीचा हा पदार्थ मेक्सिकन चवीत खायचा असेल तर भाईंदर पश्चिम येथील ‘यारी’ या उपाहारगृहाला आवर्जून भेट द्या.
इटालियन पास्ता हा मसालेदार आणि काहीसा रसदार असतो; परंतु या पास्त्याला ‘यारी’मध्ये मेक्सिकन चव देण्यात आली आहे. मेक्सिकन पदार्थ तिखट नसतात, यात भरपूर चीज, बटर आणि फ्रेश क्रीमचा वापर केलेला असतो. याच धर्तीवर ‘यारी’मध्ये पास्ता तयार केला जातो. चीज आणि बटरचा वापर करून तयार केलेला पास्ता दाट स्वरूपात मिळतो. यातील बटर आणि चीज पास्त्याला वेगळीच चव देऊन जातो. यश भानुशाली आणि हर्ष भानुशाली यांनी सुरू केलेल्या ‘यारी’ या फूड जॉइंटमध्ये पाच ते सहा प्रकारच्या चवीचे पास्ता तयार केले जातात.
व्हाइट सॉस पास्ता हा मायोनिज आणि फ्रेश क्रीमचा वापर करून तयार केला जातो, तर रेड सॉस पास्त्यामध्ये उकडलेले टॉमेटो आणि खास यारीमध्ये तयार केलेल्या मसाल्याचा वापर केला जातो. मंगोलियन पास्ता हा इटालियन आणि चायनीज यांचे अनोखे मिश्रण आहे. यात कांदा, भोपळी मिरची, मेयोनिज, फ्रेश क्रीम यांच्यासोबतच चायनीज सॉसचाही वापर केला जातो. केजुअन पास्त्यामध्ये बटरचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो. इथला ‘पॅन विथ टोमॅटो क्रीम सॉस’ हा पास्ताही चांगलाच भाव खाऊन जातो. चेरीच्या आकाराचे टोमॅटो, ग्रिल्ड पनीर, मशरूम, बेसील, अस्पारगस अशा पदार्थाची रेलचेल या पास्त्यामध्ये असते.
‘इटालियन फुस्की’ हा एक वेगळाच पदार्थ आपल्याला फक्त ‘यारी’मध्येच मिळेल. सिमला मिरची, टोमॅटो, मक्याचे दाणे, कांदा यांचे मिश्रण करून ते शेव बटाटापुरीसाठी वापरण्यात येणाऱ्या पुरीवर स्टफ केले जाते, वरून किसलेल्या चीजची पेरणी केली जाते आणि मग ही पुरी ओव्हनमध्ये ठेवून बेक केली की तयार होते इटालियन फुस्की. मेल्टिंग चीज ग्रिल्ड सँडविच तर ‘यारी’ची खास विशेषता आहे. बोरिवली ते भाईंदर या पट्टय़ात अशा प्रकारचे सँडविच फक्त यारीमध्येच मिळते. उकडलेले बटाटे, काकडी, टोमॅटो, सिमला मिरची, मायोनिज आदी पदार्थाचा वापर करून सँडविच तयार केले जाते. त्यावर मेल्टिंग चीजचे आवरण देऊन मग सँडविच बेक केले जाते. याशिवाय चॉपर राइस, सिंगापूर राइस असे फ्राइड राइसचे प्रकारही ‘यारी’मध्ये उपलब्ध आहेत. हे पदार्थ तरुणाईची ओळख असले तरी आबालवृद्धांनीही त्याची चव घ्यायला हरकत नाही.
यारी रेस्टॉरंट
- पत्ता : शॉप क्र. ५, कैलास मानसरोवर, नारायणा ई स्कूलच्या समोर, स्वामी सत्यानंद मार्ग, भाईंदर पश्चिम
- संपर्क – ८८९८०००४४९, ९३२४३६१२५०
- वेळ – सकाळी ११.३० ते रात्री ११.३०