किन्नरी जाधव

वनविभाग, ठाणे महापालिकेत समन्वयाचा अभाव

देशविदेशीच्या पर्यटकांना जंगलाची आणि आदिवासी संस्कृतीची माहिती मिळावी, यासाठी ठाणे महापालिकेने वन विभागाच्या सहकार्याने येऊरमध्ये पर्यटन केंद्र उभारण्यासाठी आखलेला प्रस्ताव अजून कागदावरही व्यवस्थित उमटलेला नाही. ठाणे शहरातील पर्यटनाला नवी ओळख मिळवून देणारा हा प्रकल्प वेगाने अस्तित्वात यावा, यासाठी वन विभाग गेल्या दोन वर्षांपासून पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. या संदर्भातील आवश्यक परवानग्याही वनविभागाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र, या प्रकल्पाचा सविस्तर आराखडाही अद्याप तयार झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

येऊर परिसर हा ठाणे शहराच्या निसर्गसौंदर्याला लाभलेले कोंदण आहे. ठाण्यासारख्या गजबजलेल्या शहरात असतानाही अतिशय शांत असलेला हा परिसर पर्यटकांचे नेहमीच आकर्षण केंद्र राहिला आहे. या पाश्र्वभूमीवर पर्यटकांना येऊरच्या जंगलाची आणि तेथील आदिवासी संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी पर्यटन केंद्र उभारण्याचा निर्णय पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. यासाठी वनविभागाची परवानगीदेखील मिळवण्यात आली. येऊर परिक्षेत्रातील ८ हजार ९६२ चौरस मीटर जागेत हे पर्यटन केंद्र उभारण्याचे निश्चित करण्यात आले. याकरिता चार कोटी ८६ लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. या पर्यटन केंद्राचा एक भाग म्हणून येथील दुर्लक्षित तलावांचे नैसर्गिक पद्धतीने पुनरुज्जीवन करण्याचे ठरले व हे काम तीन महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचनाही पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्या. मात्र, या घडामोडींना आता दोन वर्षे उलटल्यानंतरही या प्रकल्पाचे काम तसूभरही पुढे सरकलेले नाही.

वनविभागाकडून महापालिका प्रशासनाकडे या प्रकल्पाचा प्रस्ताव यापूर्वीच पाठवण्यात आला असला तरी महापालिका प्रशासनाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नसल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि ओवळा माजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी हा प्रकल्प प्रतिष्ठेचा केला होता. परंतु, आता कमालीची गुप्तता पाळली जात आहे. यासंदर्भात महापालिकेचे मुख्य शहर अभियंता राजन खांडपेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकल्पाविषयी आपल्याला काही माहिती नाही, असे उत्तर दिले. उद्यान विभागाचे प्रमुख उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनीही यासंबंधी बोलण्यास नकार दिला तर जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनी माहिती घेऊन सांगतो असे सांगितले.

येऊरच्या पर्यटन केंद्रात प्रवेश व स्वागत कक्ष, प्रशासकीय क्षेत्र व प्रदर्शन केंद्र, सेमिनार हॉल, प्रदर्शन केंद्र व निवास व्यवस्था, निवारा अशा गोष्टींचा समावेश करण्यात येणार आहे. परिसरात माहितीफलक, मातीच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, जंगलातील विविध शोभेच्या वस्तू, आसन व्यवस्था, नाल्यावरील लाकडी पूल इत्यादींचाही समावेश असेल.

येऊरमध्ये पर्यटन केंद्र उभारण्यासाठीचा प्रस्ताव वनविभागाकडून महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या संदर्भात महापालिकेकडून उत्तर मिळाल्यास कामाची दिशा ठरवण्यात येईल.

-राजेंद्र पवार, परिक्षेत्र वनअधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

ठाणे शहरातील पर्यटनाच्या दृष्टीने येऊरच्या पर्यटन केंद्राचा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. अनेक उपक्रम या पर्यटन केंद्रात साकारण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. डिसेंबर अखेपर्यंत या प्रकल्पाचा प्रस्ताव सर्वससाधारण सभेत मांडला जाईल, अशी आशा आहे.

-प्रताप सरनाईक, आमदार