अंबरनाथ येथील महालक्ष्मीनगर येथे राहणाऱ्या निहारिका साळुंखे या २३ वर्षीय तरुणीच्या हत्येचा छडा लावण्यात अखेर ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. चोरीच्या उद्देशातून तिची हत्या झाल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या उल्हासनगर शाखेने दोघा महिलांसह तिघांना अटक केली आहे. मृत तरुणीच्या नातेवाइकाने दिलेल्या माहितीच्या आधारे चोरीचा कट रचण्यात आला होता. पण, त्यावेळी निहारिका घरात असल्याने तिघांनी तिची हत्या केली, अशी धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे.
विनयकुमार ऊर्फ बाबू राजकुमार मेहरा (२५), ज्योती अविनाश साळुंखे (२९) आणि नसीम अब्दुल शेख (३०) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे असून त्यापैकी ज्योती साळुंखे ही निहारिकाची सख्खी मावस बहीण आहे.
ज्योतीच्या स्वभावामुळे तिचा कुटुंबाशी फारसा संबंध नव्हता. तिची यापूर्वी दोन लग्ने झाली असून सध्या ती दुसऱ्या नवऱ्यासोबत राहते. विनयकुमार हा घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार आहे. विनयकुमार आणि नसीम हे दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतात. ज्योती साळुंखे राहत असलेल्या इमारतीमध्येच हे दोघे राहतात. त्यामुळे त्यांची एकमेकांशी ओळख होती. ज्योतीला पैशांची चणचण भासत होती आणि याविषयी तिने दोघांना सांगितले होते. यातूनच दोघांनी तिला चोरीतून पैसे मिळविण्याचा सल्ला दिला. तसेच चोरीसाठी पैसेवाल्या नातेवाइकाविषयी माहिती पुरविण्यास सांगितले.
यामुळे तिने मावशीच्या मालमत्तेविषयी माहिती देऊन तिच्या घरात चोरी करण्यासाठी कट रचला. त्यानुसार तिघेजण अंबरनाथमध्ये मावशीच्या घरी गेले. त्यावेळी निहारिका घरात एकटीच होती. मावसबहीण असल्यामुळे निहारिकाने तिघांनाही घरात घेतले. पण, निहारिका घरात असल्याने चोरीत अडसर ठरत होता.
यामुळे तिघांनी तिची हत्या केली आणि घरातून साडे तीन लाखांचा ऐवज लुटून नेला. त्यामध्ये सोन्याचे दागिने, एलसीडी टीव्ही तसेच मोबाइलचा समावेश होता. उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांच्या पथकाने तपास करून या गुन्ह्यात तिघांना अटक केली.
तसेच त्यांच्याकडून दीड लाखांचा ऐवज जप्त केला असून त्यामध्ये सोन्याचे दागिने आणि टीव्हीचा समावेश आहे, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरा यांनी दिली.