करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर निर्णय

ठाणे : कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन जिल्ह्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या आणि प्रशासनातर्फे लागू करण्यात आलेल्या नव्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला असल्याचे कोमसापचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी सांगितले. ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात ११ आणि १२ जानेवारी २०२२ रोजी हे संमेलन होणार होते. या दोन दिवसीय साहित्य संमेलनाची नवी तारीख आणि अन्य तपशील जानेवारीच्या अखेरीस जाहीर करण्यात येणार आहेत. विविध साहित्यिक तसेच सामाजिक-सांस्कृतिक विषयांवरील कार्यक्रम, परिसंवाद, मैफिली अशा विविध कार्यक्रमांचे या दोन दिवसीय संमेलनात आयोजन करण्यात आले होते. साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहीर झालेले प्रणव सखदेव यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. तर स्वागताध्यक्षपद ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के भूषविणार होते.

गेल्या महिनाभरापासून या संमेलनाची जोरदार तयारी कोमसापकडून सुरू होती. संमेलनाचे नियोजन अंतिम टप्प्यात आले असताना करोना संक्रमणाचा वेग वाढू लागल्याने सरकारी यंत्रणांकडून करोनाविषयक नवे सार्वजनिक निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी, १ जानेवारी रोजी आनंद विश्व गुरुकुल येथील संमेलन केंद्रात साहित्य संमेलनाच्या नियोजनाबाबत कोमसापची बैठक घेण्यात आली. करोनाप्रसाराचा वेग पाहता, दक्षता म्हणून संमेलन तूर्त स्थगित करून ते करोनाचे मळभ दूर झाल्यानंतर घेण्यात येणार असल्याचे या बैठकीत ठरवले असल्याचे, कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी नुकतेच स्पष्ट केले. संमेलन पुढे ढकलण्यात आले असले, तरी संमेलनाची तयारी करण्यास आणखी वेळ मिळाला असल्याचे मत  कोमसापच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. तसेच संमेलनाच्या नव्या तारखांनिशी उत्तम नियोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.