पूर्वीपेक्षा लोक खूप संवादतायत. आभासी माध्यमातून का होईना एकमेकांशी जास्तच संपर्क ठेवतायत. व्हॉट्स अ‍ॅपवरचे ग्रुप्स वाढतायत. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक  भल्या-बुऱ्या-निर्थक घटनेला विस्तृत प्रमाणावर शेअर करतायत. ‘चमको’ फॉरवर्डेड मेसेज, पोस्टना अधिक चमकण्यासाठी आणखी फॉरवर्ड होतायत. संवादांची तुडुंब गर्दी भूतलावर झाली आहे. मात्र मूळ भाषांचे अस्तित्व नष्ट होत आहे, जी कधी भाषिक वैशिष्टय़े होती अशी संवादाची बोली नष्ट होत आहे याच्याकडे कुणाचेच लक्ष नाही. जग सपाटीकरणाच्या प्रक्रियेत ज्या काही चांगल्या गोष्टी अस्तंगत होत आहेत, त्यात भाषांचे प्रमाण सर्वाधिक आहे. दर चौदा दिवसाला एक भाषा नष्ट होत आहे. हे प्रमाण प्रगतीची प्राथमिक फळे फळे उपभोगणाऱ्या या पिढीच्या अद्याप लक्षात आलेले नसले, तरी भाषिक व्यवहारांची गळपेची होऊ घातलेल्या आगामी पिढीला मात्र खूप जवळच्या, खूप उपलब्ध असलेल्या भाषेच्या मृत्यूचे साक्षीदार व्हावे लागणार आहे. आर्थिक सुबत्ता आणि भाषिक मृत्यूता यांच्याबाबत नवे संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. त्यानिमित्ताने अमरतेचे कुठलेच वरदान न लाभलेल्या आपल्याही भाषेविषयी, भाषाव्यवहाराविषयी चिंता करण्याची वेळ आली आहे म्हणून..

हे करता येऊ शकेल काय?
*आपली उरली सुरली भाषा, पोटभाषा, बोलीभाषा वाचविण्यासाठी शक्य तितक्या परिचितांमध्ये, आप्तांमध्ये त्या त्या भाषा-पोटभाषेमध्ये बोलण्याकडे अधिक कल ठेवावा.
*इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषेविषयी गोडी वाटावी, यासाठी पुस्तके, गाणी, चित्रपट यांचा आधार घेऊन, त्यांना आपल्या भाषिक व्यवहाराची आकलन क्षमता अधिक व्हावी यासाठी पालकांनी पुढे व्हावे.
*आपल्या पोटभाषेतील कालबाह्य होत असलेल्या म्हणी, वाक्प्रचारांना सोशल नेटवर्किंग साइट्सवरून जास्तीत जास्त प्रचारात ठेवावे. फॉरवर्डेड मॅसेज फिरवून चमको होण्यापेक्षा हे भाषिक उत्तरदायित्व प्रत्येकाने पार पाडावे.
*उरल्या सुरल्या प्रादेशिक साहित्यिक नियतकालिकांचे अधिकाधिक वाचन, चर्चा, आदान प्रदान करावे. जर हा साहित्य व्यवहारच सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला, तर कालांतराने तो संपुष्टात यायला वेळ लागणार नाही.
* शक्यतो समभाषिकांशी अधिकाधिक मराठीतूनच बोलण्याचा प्रयत्न करावा.
* मराठी आणि इंग्रजी या दोन्ही विषय शिकविणाऱ्या शिक्षक-प्राध्यापक मंडळींनी विद्यार्थ्यांची भाषिक भीती काढून टाकून, त्यांना अधिकाधिक भाषाप्रवीण करण्याकडे कल ठेवावा. भाषिक आकलनाचे महत्त्व, साहित्याचे जगण्याशी असलेले नाते उलगडून दाखविल्यास भाषिक अनास्थेच्या रडगाण्याचा वार्षिक सोहळा टाळता येईल.

आपण सगळेच भाषिक मारेकरी
भाषा दिनाच्या आगेमागे माध्यमे भाषांविषयी भरपूर चिंता व्यक्त करण्याचा कार्यक्रम पार पाडतात. जगभरात हे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाप्रमाणेच (वन डे मातर‘म’) साजरे होते. प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मात्र वर्षभर आपण सारे भाषिक मारेकरी बनत धेडगुजरी संवादांचे नवनवे पूल तयार करतो. इंग्रजीमध्ये शिव्या देणेही सोपे समजतो आणि कुठल्याही भावनेत व्यक्त व्हायला प्रादेशिक भाषेत अवघडतो. हिंदूी मालिका वा चित्रपटांच्या प्रभावात असलो तर हिंम्राठी (हिंदूी व मराठी) नाही, तर मग हिंग्लिश, मिंग्लिश अशा फ्यूजन वा ‘क’न्फ्यूजन करणाऱ्या नव्या संवादपुलांना तयार करतो. सोशल नेटवर्किंगच्या सगळ्याच संवादांकडे बारकाईने लक्ष दिले, तर समोर येणाऱ्या कीटक-झुरळांना आपण ज्या क्रूरतेने चिरडून टाकतो, त्याहून अधिक सहजपणे आपल्या मूल भाषिक विचारांची कत्तल करीत चालल्याचे दिसून येते. नव्या संशोधनानुसार आर्थिक सुबत्तेमुळे उत्तर अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अल्पसंख्य प्रमाणावर असलेल्या भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सुबत्तेमुळे अल्पसंख्य असलेली विशिष्ट भाषा बोलणारे गट बहुसंख्यांची भाषा कवटाळत आहेत. एकीकडे जगावर इंग्रजीची बीजे पेरणाऱ्या ब्रिटनमधील मूळ इंग्रजच आता अल्पसंख्य होण्याच्या वाटेवर असताना अमेरिकी इंग्रजीचा प्रभाव जगभर होतो आहे. मात्र डायनॉसॉरी ताकद असलेली ही इंग्रजी कैक अल्पसंख्य भाषांना गारद करून बसली आहे. आर्थिक स्थैर्याचा मुद्दा हा जागतिक प्रमाणावर परिणाम करणारा आहे. नव्वदच्या दशकात आर्थिक सुबत्तेमुळे मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण घेण्याचे प्रमाण घसरायला लागले. दोन हजारोत्तर कालावधीत आर्थिक सुबत्ता नसली तरी मातृभाषेऐवजी इंग्रजी भाषिक शिक्षणाचा कल शहरांमध्ये वाढला. आज देशातल्याच नव्हे, तर राज्याराज्यांतील छोटय़ा गावांतदेखील सुरू झालेल्या इंग्रजी शाळा पुढच्या दशकांमध्ये प्रादेशिक भाषा संपवून टाकण्यात खारीचा वाटा उचलत आहेत. गावांमध्ये भाषिक आक्रमणातून म्हणी, शिव्यांच्या जुन्या पद्धती, भांडणातून राग व्यक्त होताना तयार होणाऱ्या वाक्प्रचारांवर सध्या मोठय़ा प्रमाणावर गदा आली आहे. पुढील दशकांत ते बोलणारे आणि समजणारे जेव्हा नसतील, तेव्हा त्यांचा वापरही संपलेला असेल. इंग्रजी भाषेतून शिक्षण घेण्याबाबत इथे आक्षेप नाही. फक्त ती शिकविण्याच्या पद्धती, आत्मसात करण्याच्या पद्धती यांमध्ये तफावत असल्यामुळे धड कोणत्याच भाषेमध्ये शिक्षण यशस्वी होत नाही. आकलन क्षमता गुंतागुंतीची बनते. दोन्ही भाषांची धेडगुजरी समज मात्र पक्की होते. गेल्या दोन दशकांमध्ये शाळा-कॉलेजांमध्ये शिक्षणाचे माध्यम इंग्रजी, घरातील-परिसरातील व्यवहार भाषा प्रादेशिक असल्यामुळे दोन्ही भाषांच्या संमिलनाच्या विचित्र आवृत्त्या तयार होऊ लागल्या आहेत. याचा परिणाम सर्वात मोठा प्रादेशिक साहित्यावर होऊ लागला आहे. अर्धमृत झालेले साहित्य जगत धेडगुजऱ्या भाषिक व्यवहारावर याच दशकात सर्वाधिक ओरड करीत आहे. व्याकरण नसलेली संकरित भाषा मात्र विस्तारत चालली आहे.

आकडय़ांतून सारे काही
गेल्या पन्नास वर्षांमध्ये आपल्या देशातील हिंदी भाषकांची संख्या देशात २६ कोटींवरून ४२ कोटींमध्ये गेली आहे. त्याचबरोबर इंग्रजी भाषकांची संख्या ३३ कोटींवरून ४९ कोटींमध्ये गेली आहे. मराठी भाषकांची संख्याही ८ ते १० कोटींमध्ये आहे. मात्र हिंदीच्या तुलनेमध्ये मराठीतील सारेच भाषिक व्यवहार हे नकारात्मक अवस्थेत दिसत आहेत. हिंदी भाषिक राज्य अधिक असल्यामुळे त्यात प्रसिद्ध होणाऱ्या साहित्याची, लेखन- वाचन व्यवहाराची, नियतकालिकांची आणि भाषिक अभिमानाची तुलना मराठीशी किंवा इतर कुठल्याही प्रादेशिक भाषेशी होऊ शकत नाही. सध्या मराठी भाषेचा फुकाचा अभिमान हा राजकारण पुरस्कृत दिसतो. साहित्य व्यवहार अपवादात्मक स्थितीत षंढावस्थेमध्ये परावर्तित होत आहे. वाचन-आकलन, भाषिक व्यवहारण यांच्यामध्ये मराठी समृद्ध करण्यासाठी निष्क्रिय महोत्सव शिल्लक राहिलेले आहेत, ज्यांच्याद्वारे पुढील काही वर्षांत या भाषिक व्यवहाराला टिकवून ठेवण्यासाठी ठोस कृती न केल्याचा पस्तावा करण्याची वेळ येणार आहे. शालेय पातळीपासून मराठीला मारण्याची प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे.

संशोधनाच्या चष्म्यातून..
ब्रिटिशांइतकी भारतीय भाषांबाबत उत्सुकता खुद्द भारतीय राजकीय व्यवस्थेनेही दाखविली नाही. भाषा अभ्यासक गणेश देवी यांनी ७०० प्रचलित भाषांचे सर्वेक्षण केले आहे. १९६१ च्या जनगणनेनुसार भारतीय लोकभाषांची संख्या १६५२ होती. ती संख्या १९७१ मध्ये १०८ वर गेली होती. दशकभरात १५४४ भाषा कमी झाल्या होत्या. त्यांचा वापर थांबला होता. ज्या बोली भाषकांची संख्या १० हजारांपेक्षा कमी आहे, त्याची नोंद या जनगणनेत झाली नव्हती. त्यामुळे त्यांनी अल्पसंख्यांत बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या नोंदणीचे महत्त्वपूर्ण काम करून ठेवले आहे. त्यांच्या अनुमानाप्रमाणे दीडशे ते दोनशे भाषा विलुप्त झालेल्या आहेत. जागतिक संशोधनामध्ये असे आढळून आले की, मानवी इतिहासाच्या ७० हजार वर्षांमध्ये टिकून राहिलेल्या भाषा काही विशिष्ट काळामध्ये संपुष्टात आल्या. त्यात किनारी भागातील लोकांच्या शहरी स्थलांतरामुळे त्यांनी स्वीकारलेल्या दुसऱ्या भाषिक व्यवहारामुळे मूळ भाषा व्यवहार पूर्णपणे आटला. कायम अस्थिर जीवन जगणाऱ्या काही समुदायांनी स्थिर होऊन प्राबल्य असलेल्या समाजातील घटकाचा स्वीकार केल्याने आणखी बोली भाषांची मृत रूपांतरे झाली. केंब्रिज विद्यापीठाने केलेल्या ताज्या संशोधनानुसार आर्थिक सुबत्तेमुळे उत्तर अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियामधील मृतावस्थेकडे जाणाऱ्या अल्पसंख्य भाषा वाचविण्यासाठी तातडीने प्रयत्न करायला हवेत. अन्यथा दशकभरात त्यांच्या खुणाही शिल्लक राहणार नाहीत. आर्थिक, राजकीय आणि सामाजिकदृष्टय़ा आपण मागे पडत जाऊ, या भावनेने जगभरामध्ये प्राबल्य असलेल्या भाषांचे अंगीकारण होत असून, मूल भाषांना तिलांजली दिली जात आहे, असे केंब्रिज विद्यापीठाच्या तात्सुया अमानो यांचे म्हणणे आहे. त्यांनी जगभरातील २५ टक्के भाषा मृत्युशय्येवर असल्याचेही नमूद केले आहे.