इन्फुलएन्झा म्हणजे सर्दीत श्वसनाचे विकार होतात. घटती प्रतिकारशक्ती व प्रदूषण ही त्याची कारणे आहेत. ‘जिनसेंग’ या चिनी वनौषधीने त्यावर चांगला परिणाम होतो. रिव्हायटल गोळ्यांमध्ये जिनसेंग वापरले जाते असे म्हणतात. त्यामुळे इन्फ्लुएंझा अँड रेस्पिरेटरी सायनॅसायटिकल व्हायरस(आरएसव्ही)चा संसर्ग हा फुप्फुसे व श्वासनलिकेत होत असतो. जिनसेंगमध्ये कर्करोगरोधी गुणधर्म असतात. त्यात वेदनाशामक, प्रतिकारशक्तिवर्धक गुणही असतात, असे संशोधकांचे मत आहे. जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीचे वैज्ञानिक सँग सू कांग यांनी केलेल्या संशोधनानुसार लाल जिनसेंगचा अर्क हा एन्फ्लुएंझा ‘ए’ विषाणूला काबूत ठेवतो. श्वसनमार्गातील एपिथेलिअल पेशी तांबडय़ा जिनसेंगच्या अर्कामुळे या विषाणूला तोंड देऊ शकतात. ज्यामुळे वेदना व सूज निर्माण होते. त्या जनुकांचे आविष्करण रोखले जाते. इन्फ्लुएंझा ‘ए’ विषाणूची लागण होताच उंदराला जिनसेंगचा अर्क तोंडावाटे दिला असता त्याच्या प्रतिकारशक्तीवर चांगला परिणाम दिसून आला. विषाणूविरोधी प्रथिनांमुळे प्रतिकारशक्ती वाढली व श्वासनलिका मार्गात वेदना कमी झाल्या.
सर्दी कमी झाली. दुसऱ्या अभ्यासात कँग यांनी असे दाखवून दिले की जिनसेंगमुळे एन्फ्लुएंझाचे विषाणू वेदनाकारक जनुकांचे आविष्करण माणसातही होऊ देत नाहीत. त्यासाठी त्यांनी कोरियन लाल जिनसेंगचा अर्क वापरून उंदरामध्ये विषाणूचे परिणाम कोरियन जिनसेंग अर्कामुळे कमी झाले.
‘जर्नल न्यूट्रीएंट अँड द इंटरनॅशनल जर्नल ऑफ पॉलीक्युलर मेडिसिन’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध
झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘तगडी मोटारसायकल’
अमेरिकी लष्कराने एक स्टील्थ मोटारसायकल तयार करण्यासाठी निधी मंजूर केला आहे. स्टील्थ याचा सर्वसामान्यांना समजून सांगता येईल असा अर्थ म्हणजे ‘तगडी मोटारसायकल’. या मोटारसायकलच्या इंजिनचा आवाज होणार नाही. शिवाय ती प्रदीर्घ काळ चालू शकेल. यूएस डिफेन्स अ‍ॅडव्हान्स्ड रीसर्च प्रोजेक्ट्स एजन्सी (दर्पा) या संस्थेने अलीकडेच व्हर्जिनियाच्या लॉस एंजलिस टेक्नॉलॉजिजला त्यासाठी अनुदान दिले आहे. यात सॅनफ्रान्सिस्कोची बीआरडी कंपनी भागीदार असणार असून, इलेक्ट्रिक मोटारसायकली तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. दोन चाकांची ही मोटारसायकल बहुइंधनांवर चालणार असल्याचे गिझमॅग’ या तंत्रज्ञान मासिकाने म्हटले आहे. अशा प्रकारची मोटारसायकल सैनिकांसाठी लवकरच तयार करण्यात येणार आहे. तिचा फट्फट् असा नेहमीच्या मोटारसायकलसारखा आवाज येणार नाही, असे लॉस एंजलिसच्या लोगॉस टेक्नॉलॉजीजचे म्हणणे आहे. अतिशय वाईट भूप्रदेशातही या मोटारसायकली चालू शकतील. शत्रूला त्यांचा आवाजही ऐकू येणार नाही. बरेच अंतर त्या सहज कापू शकतील. हायब्रिड म्हणजे इंधन आणि वीज यावर चालणाऱ्या या मोटारसायकली लष्कराला वरदानच ठरणार आहेत. मोटारसायकल चालू असताना त्यातून विजेची निर्मितीही होईल.

स्कंदपेशीपासून बुलेटप्रूफ जॅकेट
बुलेटप्रूफ जॅकेट म्हटलं की आठवतो तो मुंबई हल्ला. त्यानंतरही त्याच्या खरेदीतील काळंबेरं बाहेर आलं. वैज्ञानिकांनी आता मूलपेशी म्हणजे स्कंदपेशीपासून बंदुकीच्या गोळीला रोखणारे जॅकेट तयार करण्याची कल्पना मांडली आहे. केम्ब्रिज विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी ही कल्पना मांडली असून, गर्भाच्या पेशींमध्ये एक नवीन गुणधर्म असतो त्यानुसार पुढच्या पिढीची ‘जन नेक्स्ट’ बुलेटप्रूफ जॅकेट्स त्यापासून तयार करता येतील. मूलपेशी या शरीरात इतर अवयव तयार करण्याचे काम करतात. पेशी पातळीवर त्या वेगळे गुणधर्म दाखवतात. या मूलपेशींमध्ये ऑक्सेटिसिटी नावाचा  गुणधर्म असतो त्यामुळे या पेशी ध्वनिरोधक असतात. त्यामुळे त्यांचा उपयोग बुलेटप्रूफ जॅकेटसाठी होऊ शकेल असे वैज्ञानिकांना वाटते. जेव्हा काही पदार्थ ताणले असता आकुंचन पावतात तेव्हा ते पिळल्यास त्यांचे प्रसरण होते. वैज्ञानिकांनी ऑक्सेटिसिटीचा गुणधर्म वापरून ‘पिळून प्रसरण’ करण्याचा गुणधर्म मिळवला. नंतर तो पदार्थ पुन्हा आकुंचन पावतो. पुन्हा प्रसरण पावतो. याचा अर्थ ऑक्झेटिक गुणधर्म असलेले पदार्थ शॉक अ‍ॅबसॉर्बर (धक्कारोधक) असतात. स्पंजसारखे काम ते करतात. आतापर्यंत ऑक्सेटिसिटी ही मानवनिर्मित पदार्थात आढळत होती व निसर्गात तसा गुण असलेले फार कमी पदार्थ आहेत. केंब्रिजच्या संशोधकांनी म्हटले आहे की, गर्भातील मूलपेशी दुसऱ्या पेशीत परिवर्तित होतात. मूलपेशीचे जे केंद्रक असते त्यात ऑक्सेटिक गुण असतात. त्यामुळे ते आजूबाजूच्या पदार्थाकडून स्पंजसारखे दाबले जाते, असे डॉ. केव्हिन चालूट यांचे म्हणणे आहे. ब्रिटनच्या प्रसिद्ध वेलकम ट्रस्टमध्ये ते संशोधन करतात. मूलपेशीच्या केंद्रकाचा हा गुणधर्म यापूर्वी कधी अभ्यासला गेला होता असे वाटत नसल्याचे ते सांगतात. अवस्थांतर मूलपेशींच्या केंद्रकात हे गुणधर्म आढळतात. गर्भपेशी ही अविशिष्ट मूलपेशीत बदलून ऊती विशिष्ट पेशी बनवता येते. त्याला ऊती पेशी (टिश्यू सेल) म्हणतात. जर्नल नेचरमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

श्वेतबटू ताऱ्याच्या रूपात अवकाशामध्ये पृथ्वीच्या आकाराचा महाकाय हिरा
खगोल वैज्ञानिकांना अवकाशात ९०० प्रकाशवर्षे दूर पृथ्वीच्या आकाराचा हिरा सापडला असून तो प्रत्यक्षात थंड झालेला श्वेतबटू तारा असावा. तो एका प्राचीन ताऱ्याचा अवशेष असावा व थंड होऊन त्यातील कार्बनचे स्फटिकीकरण झाले असावे, त्यामुळे हा पृथ्वीच्या आकाराचा हिरा तयार झाला असावा. त्याचे वय आपल्या आकाशगंगेइतकेच म्हणजेच ११ अब्ज वर्षे असावे. विस्कॉन्सिन- मिलवावुकी विद्यापीठाचे प्राध्यापक डेव्हिड काप्लान यांनी सांगितले की, निश्चितच हा वेगळा पदार्थ आहे. अशा गोष्टी अवकाशात असू शकतात ,फक्त अंधुक असल्याने दिसू शकत नाहीत. काप्लान व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा तारकीय हिरा नॅशनल रेडिओ अ‍ॅस्ट्रॉनॉमी ऑब्झर्वेटरी , ग्रीन बँक टेलिस्कोप, व्हेरी लाँग बेसलाइन अ‍ॅरे या वेधशाळांच्या मदतीने शोधून काढला आहे. श्वेतबटू तारे हे कमालीचे घन अवस्थेत असतात, सूर्यासारख्या ताऱ्यांची ती अखेरची अवस्था असते. त्यामुळे असा पदार्थ तयार होऊ शकतो ज्यात कार्बन, ऑक्सिजन हे घटक असतात. श्वेतबटू हा हळूहळू थंड होत जातो व अब्जावधी वर्षांनी अंधूक होत जातो.पल्सार हे वेगाने स्वत:भोवती फिरणारे न्यूट्रॉन तारे असतात व या जास्त वस्तुमानाच्या ताऱ्यांचा स्फोट होतो तेव्हा घन अवशेष मागे उरतात. न्यूट्रॉन तारे प्रकाशस्तंभासारखे रेडिओ लहरी बाहेर टाकतात. ते त्यांच्या चुंबकीय ध्रुवापासून बाहेर पडतात व अवकाशात पसरतात. जेव्हा यातील एखादा किरण पृथ्वीवर येतो तेव्हा रेडिओ दुर्बिणी त्या रेडिओ लहरी पकडतात. आताच्या श्वेतबटू ताऱ्याचा सहकारी पल्सार तारा पीएसआर जे २२२२-०१३७ आहे. जीबीटीच्या मदतीने पश्चिम व्हर्जिनियातील मॉर्गनटाऊन विद्यापीठातील विद्यार्थी जॅसन बॉइल्स याने त्याचा शोध लावला होता. त्याचा मागोवा दोन वर्षे नेदरलँडस इन्स्टिटय़ूट फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रॉनॉमीचे अ‍ॅडम डेलर यांनी घेतला होता. हा पल्सार तारा सेकंदाला ३० गिरक्या घेत असून सहकारी ताऱ्याशी गुरूत्वाकर्षणाने बद्ध आहे.  ते दोघे एकमेकांना २.४५ दिवसात एक प्रदक्षिणा घालतात. अवकाशाच्या वक्रतेने पल्सार ताऱ्यातून बाहेर पडणाऱ्या रेडिओ लहरी पृथ्वीपर्यंत येण्यास विलंब लागतो, असे आईनस्टाइनच्या सिद्धांतानुसार म्हटले आहे. आताच्या या पल्सारचे वस्तुमान सूर्याच्या १.२ पट असून त्याच्या सहकारी ताऱ्याचे वस्तुमान सूर्याच्या १.०५ पट आहे. अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

मराठीतील सर्व Thats इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ginseng plants useful increasing resistance power
First published on: 28-06-2014 at 04:10 IST