एएलएस आइस बकेट चॅलेंज सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून पसरत असताना भारतीय नेटकरांनी त्यांच्या आपापल्या पसंतीनुसार नव्या आवृत्त्या तयार केल्या आहेत.  दानशूरता घरापासून सुरू होते असे म्हणतात, या उक्तीनुसार राइस बकेट चॅलेंज हे मंजू लता कलानिधी या हैदराबादच्या पत्रकाराने सुरू केले. पाणी वाचवा व भुकेल्या लोकांना अन्न द्या या उद्देशाने त्यांनी हे सुरू केले आहे. यात गरजू लोकांना तांदूळ दिला जातो. एक बादलीभर भात किंवा बिर्याणी शिजवून तुमच्या परिसरातील गरीब लोकांना देण्याची ही योजना आहे. तुम्ही हे आव्हान स्वीकारू शकत नसाल तर जवळच्या सरकारी संस्थेला शंभर रुपयांची औषधे दान द्या, अशीही कल्पना आहे.
कलानिधी यांनी सांगितले की, ही योजना पोस्ट केल्यानंतर २४ तासांत आपण इडली विकणाऱ्या व रोजंदारीवर काम करणाऱ्या शांतीबाबू या नोकराला तांदूळ  दिला.
त्यानंतर अनेकांनी भात देत असल्याच्या व्हिडीओ टाकल्या. आइस बकेट चॅलेंजनंतर ही नवी भारतीय आवृत्ती तयार झाली आहे. आतापर्यंत यात कॉलेजच्या २००० मुलांनी २२०० किलो तांदूळ दान करण्याची प्रतिज्ञा फेसबुक पोस्टवर केली आहे, असे कलानिधी यांनी सांगितले. दिव्या दास यांनी राइस बकेट चॅलेंज स्वीकारून हे आव्हान एएलएस आइस बकेट चॅलेंजपेक्षा जास्त व्यवहार्य व योग्य असल्याचे स्पष्ट केले. दिव्या यांनी एका भटक्या कुत्र्याला खाऊ घातले तसेच एक मुलीला तांदूळ दिला.
गरजू लोकांना अन्न मिळावे हा त्यामागचा हेतू आहेच, पण प्राण्यांनाही अन्न मिळावे असे वाटल्याने
आपण भटक्या कुत्र्यास अन्न दिले, असे त्यांनी सांगितले.