16 February 2019

News Flash

आत्मिक समाधान देणारी ‘सईदा’

‘‘संहितेच्या पातळीवर ‘हमिदाबाईची कोठी’ हे खूपच प्रभावी नाटक होतं

|| भारती आचरेकर

‘‘संहितेच्या पातळीवर ‘हमिदाबाईची कोठी’ हे खूपच प्रभावी नाटक होतं आणि विजयाबाई मेहतांनी ते दिग्दर्शित केल्यामुळे एकूणच त्या नाटकाला, माझ्या भूमिकेला एक ग्रेस आली. सईदाची भूमिका समजून घ्यायला मात्र मला वेळ लागला, कारण त्यासाठी वेश्या आणि तवायफ यातली अस्पष्ट रेषा समजून घेणं गरजेचं होतं. अशा प्रकारच्या व्यक्तिरेखा रंगमंचावर सादर करताना खूप अवघड असतं हे समजून घेणं. ते वेगळं आव्हान मला पेलता आलं आणि ‘सईदा’ आत्मिक समाधान देणारी ठरली.’’

ते वर्ष १९७८ असेल. मी निर्माता म्हणून तेव्हा ‘दूरदर्शन’वर काम करत होते. लग्न झाल्यानंतर तसं मी नाटक सोडलंच होतं. मुलगाही लहान होता तेव्हा, एक दिवस अचानक मला कोणी तरी सांगितलं की, विजया मेहता एक नाटक करतायत.. ‘हमीदाबाईची कोठी’. निळू फुले काम करत आहेत..फैयाज शेख काम करत होत्या, पण नंतर निळू फुले यांच्या जागी अशोक सराफ आला आणि अशोक समोर फैयाज मोठी वाटू लागली. मग त्यांनी सगळे कलाकार बदलण्याचा निर्णय घेतला.

माझं पहिलं नाटक ‘धन्य ते गायनीकळा’ यात गाणं होतं म्हणून मला विचारलं गेलं होतं. त्यात तानसेनच्या मुलीची भूमिका होती आणि ‘हमिदाबाईची कोठी’मध्येही गाणं होतं, मग कुणाला घ्यायचं याची चर्चा झाली असावी आणि  माझं नाव पुढे आलं असावं. विजयाबाईंबरोबर मी कधीच काम केलं नव्हतं, पण मला त्यांच्याविषयी खूप आकर्षण होतं. त्या वेळी ‘दूरदर्शन’वर सुहासिनी मुळगावकर होत्या. मी सुहासिनी मावशीला विचारलं, की मला विजयाबाईंच्या नाटकाची ऑफर आली आहे. तर ती लगेच म्हणाली, ‘‘टेलिव्हिजन सोड, आताच्या आता नोकरी सोड. नाटकात काम आलंय ना. तुझ्या करिअरला चांगली सुरुवात होईल.’’ मी म्हणाले, ‘‘नंतर कोणी विचारलं नाही, घेतलं नाही तर..’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘अगं, आम्ही त्यावेळी अशीच चूक केली आयुष्यात. नोकरी सोडली नाही. तू असं करू नकोस.’’ अर्थात मी ‘दूरदर्शन’ सोडलं नाही; पण नाटकात काम करण्याचा विचार मात्र केला. त्याआधी अशोकबरोबरही मी काम नव्हतं केलं, पण अशोकची नाटकं मी बघत आले होते. नानाही होता त्यात, पण तेव्हा तोही नवीन होता, म्हणजे तेव्हा ‘नाना पाटेकर’ म्हणून त्याची ओळख नव्हती लोकांना. नीना कुलकर्णी होती. तिची आणि माझी चांगलीच ओळख होती. म्हणून म्हटलं, चला एक छान अनुभव घेऊ! अनिल बर्वेची संहिता होती. मला आठवतंय, त्यांची संहिता माझ्या नवऱ्याला म्हणजे विजूला वाचायला दिली. वाचल्यावर तो इतका गडबडला.. म्हणाला, ‘‘भारती! अगं, यात किती शिव्या आहेत.’’ मी आणि माझा नवरा नंतर विजयाबाईंकडे गेलो, मी म्हटलं, ‘‘बाई, मला फारच आवडलं नाटक, पण तवायफची भूमिका आहे माझी. कशी काय करायची, त्यातून एवढय़ा शिव्या.’’ त्या म्हणाल्या, ‘‘अगं, तुला वाटतं का मी असं ठेवेन. तुला माझी पद्धत माहिती आहे ना!’’ मी मनात म्हटलं, ‘‘बाई मी कधीच तुमच्या दिग्दर्शनाखाली काम केलं नाही. मला नाही माहिती.’’ बाई माझ्या नवऱ्याला म्हणाल्या, ‘‘विजू, माझ्यावर विश्वास ठेव.’’ तशी माझ्या घरातल्यांची नाटकाला कधी आडकाठी नव्हतीच. भूमिका खूप प्रभावी होती. पुन्हा अशी भूमिका कधी मिळेल हे माहीत नव्हतं. म्हणून मग मी निर्णय घेतला, भूमिका स्वीकारली आणि माझा सईदाच्या भूमिकेचा प्रवास सुरू झाला..

बाईंच्या तालमीही फार वेगळ्या असतात. बाईंच्या तालमीला आम्ही सर्व जण वेळेवर हजर असायचो. त्यामुळे सगळ्यांना नाटकाचा आवाका काय आहे हे कळायचं आणि सगळ्यांची ओळखही नीट व्हायची, पण माझ्या मनात तवायफच्या भूमिकेविषयी खूपच साशंकता होती. तेव्हा बाईंनी मला समजावून सांगितलं की, ‘‘तवायफ ही फक्त गाणारी असते, वेश्या नसते.’’ अर्थात माझ्यासाठी हे नवीन होतं. त्या म्हणाल्या, ‘‘तुला काम करायला लागेल त्यावर, चित्रपट बघ, काहीही कर. अभ्यास कर.’’ मग मी माझ्या वडिलांशी बोलले. माझे वडील उत्तर प्रदेशातले होते. ते उत्तम शायरी लिहीत असत. त्यामुळे त्यांना बनारसमधल्या तवायफच्या कोठय़ा वगैरे माहिती होत्या.. त्यावेळी ‘अप्सरा टॉकीज’च्या मागे तवायफच्या कोठय़ा होत्या. त्या गाणाऱ्या तवायफ होत्या. माझे पप्पा म्हणाले, ‘‘तुला नुसतं पाहायचंय ना! चल मी तुला घेऊन जातो.’’ ते फिल्म्स डिव्हिजनमध्ये असल्याने त्यांच्या ओळखी होत्या. म्हणून ते एक दिवस संध्याकाळी मला कोठीवर घेऊन गेले. इतर कोणी आलंच नव्हतं तेव्हा. दोन-तीन जण बसले होते. मी बसून राहिले तिथे साधारण अर्धा तास. बघितलं त्या कशा बसतात, कशा वावरतात. सगळं निरीक्षण केलं. माझ्या भूमिकेसाठी ते आवश्यक होतं. आणि म्हणूनच माझे वडील मला अशा ठिकाणी घेऊन गेले होते.. किती छान!

त्या कोठय़ा म्हणजे चित्रपटातल्या कोठय़ांसारख्या नव्हत्या. एकच छोटी खोली होती. इकडेतिकडे कपडे वाळत घातलेले. एक बाई गात होती. मी सगळ्याचं फक्त निरीक्षण केलं, त्यांना काहीच विचारलं नाही. मला एक अंदाज आला ते पुरेसं होतं. दुसऱ्या दिवशी विजयाबाईंना हे सांगितलं. बाईंना फार कौतुक वाटलं होतं. मग नाटक सुरू झालं.

भास्कर चंदावरकर याचं अतिशय सुंदर संगीत. पुण्याला जाऊन आम्ही तालमी करायचो. रियाज करायचो. ठुमऱ्या होत्या.. गजल होत्या, फार वेगळं संगीत होतं. त्यामुळे मज्जा आली. विजयाबाईंच्या गाण्यांसाठी माधुरी पुरंदरे गायल्या होत्या, पण मी सगळी गाणी लाइव्ह गायले. ४ ते ५ गाणी होती. फक्त हमिदाबाईच्या मृत्यूनंतर माझं जे गाणं होतं ते गाणं रेकॉर्ड केलेलं होतं. कारण बाईंच्या, हमिदाबाईच्या मरणाचा तो प्रसंग असायचा. त्यामुळे आवंढा दाटून यायचा. गाता येत नसे. तेव्हा तंबोरा नव्हता. त्यामुळे सूर नसताना गायला लागायचं. मग ते गाणं रेकॉर्ड केलं. मला सगळ्यात आवडलेली ती गझल. त्याचे शब्दही फार सुंदर होते..

इत्र संदल कफन सब मंगाया गया,

जब जनाजे को मेरे सजाया गया

कौन करता है गम जब निकलता है दम,

हो चला इंतजाम आखरी आखरी

या नाटकातले काही काही प्रसंग तर अगदी विसरता येणार नाही असे होते. पडदा उघडताना.. मी रियाज करत असते. दिलीप कोल्हटकर तबला वाजवायचा माझ्या सोबत. मग अशोक सराफची, मवाली लुख्खा दादाची एन्ट्री होत असे.. रियाज झाल्यावर मी अडकित्त्यावर सुपारी फोडत लुख्खादादा सोबत बोलत बसलेली असते. त्यात पहिलंच वाक्य आहे. ‘ऐ लुख्खा, बस हा अभी..’ तर मी एक पाय दुमडून उभा ठेवून त्याच्याकडे फक्त हात तिथल्या तिथेच दाखवून हे वाक्य म्हटलं. तेव्हा बाई म्हणाल्या, ‘‘हे असं नाही चालणार. खांद्यापासून हात वर घे आणि मग बघ आवाजातही एक जोर येईल. आणि मग म्हण, ‘ए, लुख्खा दादा..’’ मी तसं केलं आणि एका वेगळ्याच जोशात ते वाक्य आलं माझ्याकडून.. शरीरभाषा महत्त्वाची. सगळ्या हालचाली खूप लाऊड होत्या.. मोठय़ा आवाजात बोलणं हे सगळंच खूप कठीण होतं माझ्यासाठी, पण बाईंनी करून घेतलं. यातला फोनोचा सीन तर कोणीच विसरू शकत नाही. म्हणजे मला आठवतं, जेव्हा जेव्हा नाटक ‘शिवाजी मंदिर’ला असायचं तेव्हा माझा नवरा फक्त हा सीन बघायचा आणि निघायचा आणि असे बरेच जण होते. माझा आणि नानाचा सीन होता. नाना सत्तारची भूमिका करत होता. तो माझ्यासाठी म्हणजेच सईदासाठी फोनो आणतो. तर मी म्हणते की, ‘‘अरे का आणलास तू, हमिदाबाईला बेजान आवाज चालत नाही कोठीवर.’’ तर तो म्हणतो, ‘‘अगं जाऊ देना, मी एक रेकॉर्ड लावतो तू ही गा ना’’ आणि मला त्यावर तो अदा करायला सांगतो ती रेकॉर्ड म्हणजे ‘‘मिलके बिछड गयी अखिया, हाय राम’’ मी अदा करत असते आणि तेवढय़ात विजयाबाईंचा अर्थात हमिदाबाईचा प्रवेश होतो. हा प्रसंग खूपच रंगायचा..

एकूणच या भूमिकेमुळे खूप वेगळं काम करायला मिळालं. मला नाही वाटत अशी भूमिका कोणाच्या वाटय़ाला आली असेल. द. ग. गोडसे यांचे सेट होते. नाटकाची भव्यता खूप होती. १९४२ चा काळ दाखवला होता.तेव्हाचं सगळं. फारच निराळं होतं.. दुसरा एक अत्यंत प्रभावी प्रसंग होता. मी हमिदाबाईला सांगते की, आता फिल्मी रेकॉर्डस् यायला लागल्या आहेत कोठय़ांवर. नुसती गाणी, ठुमरी ऐकायला आपल्याकडे कोणी येत नाही. त्यामुळे पैसाही मिळत नाही. आपण नाचगाण्याची कोठी सुरू करू.. अदा करू..’’ हमिदाबाई म्हणते, ‘‘नाही.’’ तेव्हा सईदा म्हणते की, ‘‘मग मला जर कुणी वेश्या म्हणून बोलवलं तर मी जाईन, कारण माझीही स्वप्न आहेत..मला घर बनवायचं.. आयुष्य बघायचंय.. हिच्या डोक्यात बस एकच रिकॉर्ड बजती है, तवायफ का धरम, तवायफ का उसूल, पब्लिक को पागल कुत्तेने नही काटा जो आपल्या कोठीवर येईल? थेटर मे ५ आना फैंक के १० गाने सुनती हैं पब्लिक..’’ असे संवाद होते माझे. तो एक भांडणाचा सूर होता आणि थेट बाईंसोबत असायचा. हा प्रसंग खूप ताकदीचा असल्यामुळे तो करताना खूप दडपण यायचं.

सईदाचं म्हणणं असं असतं की, कोठीवर आपण ‘फिल्म म्युझिक’ आणलं पाहिजे. नुसतं गाणं आता चालणार नाही. बाकीच्या कोठय़ांमध्ये बघ सगळ्या प्रकारचं संगीत वाजतंय. त्यामुळे आपण चित्रपट संगीत आणू त्यावर अदा करू, पण हमिदाबाईला ते पटत नव्हतं. याच संघर्षांत हमिदाबाईचा मृत्यू होतो. सईदा घर सोडून जाते. नीना कुलकर्णीने तिच्या मुलीचं, शब्बोचं काम केलंय. तिला हमिदाबाईने मुद्दाम या सगळ्या वातावरणापासून दूर ठेवलेलं असतं. तीही घरी येते. सईदावर हमिदाबाईचं विशेष प्रेम असतं. तिला लहानपणापासून तिने वाढवलेलं असत. सत्तारला तिने कचऱ्याच्या डब्यातून उचलून आणलेलं असतं. हमिदाबाईच्या मृत्यूनंतर सगळ्यांचीच वाताहत होते. सत्तारचा मृत्यू होतो. शब्बो कोठी वाचवण्यासाठी लुख्खादादाबरोबर लग्न करते. मग तो लुख्खा दादा तिथे दारूची भट्टी लावतो. अशा सगळ्या बदलत्या वातावरणाला कंटाळून एक दिवस शब्बो कोठीत जाते आणि कोठी सकट स्वत:ला जाळून घेते आणि नाटक संपतं.

एकंदरीत संहितेच्या पातळीवरही खूपच प्रभावी नाटक होतं ते. आणि विजयाबाईंनी ते नाटक दिग्दर्शित केल्यामुळे एकूणच त्या नाटकाला, माझ्या भूमिकेला एक ग्रेस आली. आणि मुळात तवायफला एक ग्रेस असते, ती फक्त गाणारी असते, नाचणारी नसते आणि ती एका पुरुषाशी एकनिष्ठ असते. सईदाची भूमिका समजून घ्यायला मला वेळ लागला, कारण त्यासाठी वेश्या आणि तवायफ यातली अस्पष्ट रेषा समजून घेणं गरजेचं होतं. अशा प्रकारच्या व्यक्तिरेखा रंगमंचावर सादर करताना खूप अवघड असतं. शिवाय त्या भूमिकेची शरीरभाषा, त्या हालचाली, त्या भूमिकेचा बाज समजणं, तो आव आणणं या सगळ्यासाठीही मला खूप दिवस तयारी करायला लागली. एकूण स्टेजचा वावरच या भूमिकेचा वेगळा होता. एक वेगळं आव्हान या भूमिकेत होतं ती भूमिका मला पेलता आली याचा आनंद आहे.

ही भूमिका लोकांनीही खूप लक्षात ठेवली. त्याचं अगदी अलीकडंच उदाहरण म्हणजे सहा महिन्यांपूर्वी मी जपानला गेले होते. जाताना एअर पोर्टवर विशाल आणि रेखा भारद्वाज भेटले. मला रेखाजींचा आवाज खूप आवडतो. तसं मी त्यांना सांगितलं, तर उलट त्या मला म्हणाल्या की, ‘‘मीच तुमची चाहती आहे. कारण ‘हमिदाबाईची कोठी’ हे नाटक मी पूर्वी पाहिलं होतं, त्यातली तुमची भूमिका आणि गाणं आजही माझ्या लक्षात आहे..’’ माझ्यासाठी ही खूप मोठी दाद होती. अशीच दाद जेव्हा नाटक चालू होतं तेव्हा अनेक दिग्गजांनी दिली होती. विशेषत: भीमसेन जोशी नाटक बघायला आले होते त्यांना हे नाटक खूप आवडलं. त्यांनी माझं खूप कौतुक केलं.

या भूमिकेचा सगळा अनुभवच वेगळा होता. अतिशय आव्हानात्मक आणि कलाकार म्हणून एक आत्मिक समाधान देऊन जाणारी! म्हणूनच कायम लक्षात रहाणारी!

bharuvarma@gmail.com

chaturang@expressindia.com

शब्दांकन : उत्तरा मोने

 

First Published on September 1, 2018 12:06 am

Web Title: spiritual solution to every problem