15 August 2020

News Flash

स्वाभिमानी, कणखर उमा

माझ्या एकतीस नाटकांपैकी विनोदी नाटकं वगळता वीसएक नाटकं स्त्रीभूमिकाप्रधान आहेत.

श्रीकांत मोघे आणि विजया मेहता

माझ्या एकतीस नाटकांपैकी विनोदी नाटकं वगळता वीसएक नाटकं स्त्रीभूमिकाप्रधान आहेत. पुरुषप्रधान सामाजिक व्यवस्थेमध्ये पुरुषांनी सर्व स्तरांवर स्त्रीचं शोषण केलं आहे. वडील, नवरा, भाऊ नातं कोणतंही असो. स्त्रीचं नेहमीच शोषण झालं आहे. मी ज्या कालखंडात नाटकं लिहिली त्या कालखंडात स्त्री जरी हळूहळू मुक्त होत होती तरी त्याचं प्रमाण फारच कमी होतं. बहुसंख्य स्त्रिया घुसमटलेल्या वातावरणात होत्या. स्त्रीच्या बाबतीत अनेक गोष्टी गृहीत धरल्या जात होत्या. त्यात प्रामुख्यानं १) कुटुंबासाठी त्याग करणं हे स्त्रीचं (फक्त स्त्रीचं) आद्य कर्तव्य आहे. २) तिच्या स्वत:च्या आवडीनिवडी, आकांक्षा, स्वप्नं तिनं गुंडाळून ठेवावीत. ३) तिला वेगळं अस्तित्व, व्यक्तिमत्त्व, स्वतंत्र ओळख असण्याची गरज नाही. ४) परिस्थिती निमूटपणे स्वीकारून आयुष्यभर सहन करणं, सोसत राहणं हा तिच्या आयुष्याचा भाग आहे, या गोष्टी अंतर्भूत होत्या. एकविसाव्या शतकात हे ऐकताना आपल्याला विचित्र वाटेल. पण पन्नास वर्षांपूर्वी माझ्या आजूबाजूला अशा घडणाऱ्या गोष्टी मी पाहत होतो. आणि या वातावरणात गुदमरलेली स्त्री मला दिसत होती.

अशा घटना मला अस्वस्थ करीत. त्या अस्वस्थतेमुळे स्त्रियांच्या समस्या आणि त्यांचं पावलोपावली होणारं शोषण हे माझ्या नाटकांचे विषय झाले. हे ठरवून नाही झालं. आपोआप झालं. माझ्या नाटकांचे विषय माझ्याकडे चालत आले. मला ते शोधत फिरावे नाही लागले. कुठं तरी काही तरी घडत असे, कानावर येत असे आणि त्या घटना मला बेचैन करीत. आणि लक्षात येत असे, ‘अरे हा नाटकाचा विषय आहे.’ माझ्या ‘एका घरात होती’ या नाटकाच्या बाबतीत असंच घडलं. त्याचं असं झालं..

माझ्या एका मित्राची मोठी बहीण मला एक दिवस अचानक रस्त्यात भेटली. त्याच्या घरी माझं जाणं-येणं होतं. त्याच्या घरचं वातावरण खूपच छान होतं. एकदम मोकळं. त्यांच्याकडे मी घरच्यासारखा वावरत असे. कुणाशीही माझ्या गप्पा रंगायच्या. माझ्या मित्राची बहीण बोलायला खूप चांगली होती. दिसायला स्मार्ट, हुशार, साहित्याची आवड, कविता-बिविता करायची. आवाजही चांगला होता तिचा. गाणं छान म्हणायची. आमच्या दिलखुलास गप्पा व्हायच्या. तिच्या लग्नाला मी मित्राबरोबर पुण्यालाही गेलो होतो. त्यानंतर बऱ्याच वर्षांत तिची गाठभेट झाली नव्हती. अनेक वर्षांनंतर ती रस्त्यात भेटली. आधी मी तिला ओळखलंच नाही. बारीक झाली होती. चेहऱ्यावरची रया गेली होती. तिनं मात्र मला पटकन ओळखलं. माझ्यात फारसा बदल झाला नव्हता. तिनं मला हाक मारली. मी थांबलो. मीही ओळखलं. ‘हॅलो,’ ती म्हणाली. कसनुसं हसली आणि क्षणभरही न थांबता घाईघाईनं निघून गेली. मी जागच्या जागी खिळून उभा राहिलो. मला काही समजेना. हीच का ती दिलखुलास, हसतमुख मुलगी? ओळखलं पण अशी तुटक का वागली?  ही इतकी कशी बदलली? हसल्यासारखं केलं. पण मग थांबली का नाही? बोलली का नाही? काही कळेना. संभ्रमावस्थेतच मी घरी आलो. काही केल्या तिचा विचार डोक्यातून जाईना. दुसऱ्या दिवशी अचानक तिचा फोन आला. ‘‘हॅलो.. मी बोलतेय. काल भेटला होतास.. ओळखलंस ना?’’ ‘‘आवाजावरून ओळखलं. बाकी कितीही बदलली असलीस तरी आवाज तसाच आहे तुझा,’’ मी नको ते बोलून गेलो. तिच्या ते लक्षात आलं.

क्षणभर थांबून ती बोलायला लागली, ‘‘तुला काय म्हणायचंय ते लक्षात आलं माझ्या. मी काल तुझ्याशी तुटकपणे वागले. थांबलेपण नाही. त्यामुळे बोलायचा प्रश्नच नव्हता. माझ्या पुढेच दहा पावलांवर माझा नवरा होता.’’

‘‘अगं पण म्हणून..’’

‘‘माझं ऐकून घे. त्यानं मला तुझ्याशी बोलताना पाहिलं असतं तर त्याने मला सतराशे साठ प्रश्न विचारून हैराण केलं असतं. भयंकर संशयी माणूस आहे तो. परपुरुषाशी मी नुसतं बोलले तरी त्याला संशय येतो. त्याला वाटतं प्रत्येकाचा त्याच्या बायकोवर डोळा आहे.’’

‘‘काय सांगतेस काय?’’

‘‘खरं ते सांगतेय. तुझा विश्वास बसणार नाही. पण माझी खासगी कंपनीतली आरामाची नोकरी त्यानं मला सोडायला लावली. केवळ माझं बॉसशी अेफअर असेल या संशयानं. त्याचा पगार संसाराला पुरत नाहीये. चाललेय परवड.. माझी रडकथा मरू दे. तुझं कसं चाललंलय?..’’

ती आणखी भडभडा खूप बोलत होती. पण मन सुन्न झालं. तिच्याविषयी मला आपुलकी होती, जिव्हाळा होता. जीव गलबलून गेला. काही कळत नव्हतं. माणसं अशी का वागतात? संशयाला ‘पिशाच्च’ म्हणतात ते म्हणूनच का? की एकदा मानगुटीवर बसल्यावर पाठ सोडत नाही. तिनं आता आयुष्यभर असंच सोसत राहायचं का? कशासाठी? मग तिनं काय करायला हवं? कसं वागायला हवं? असंख्य प्रश्नांनी डोक्यात फेर धरला. आणि नाटकाला विषय मिळाला. विषय मिळाला म्हणजे ‘जर्म’ मिळाला. या प्रश्नांना खूप उत्तरं होती, खूप पदर होते. ते उलगडायला हवे होते. एकदा मनात विचार आला, शेक्सपिअरपासून गोविंद बल्लाळ देवलांपर्यंत आणि पुढेही अनेकांनी ‘संशय’ कल्पनेवर नाटकं लिहिली आहेत. मग सुरेश खरेने कशाला लिहायला हवं? पण म्हटलं, लिहायला हवं. माझं नाटक वेगळं असेल. निदान माझा तसा प्रयत्न असेल. मी त्याला वेगळं परिमाण देईन. मी मनाशी काही गोष्टी निश्चित केल्या. पतीनं पत्नीच्या चारित्र्याचा घेतलेला संशय हा जरी त्याचा पाया असला तरी पुरुषाची मानसिकता, स्त्रीचं शोषण आणि तिनं परिस्थितीशी केलेला सामना केंद्रस्थानी असेल. माझ्या नाटकातील नायिका सोशिक, दुबळी असणार नाही. ती खवळून उठेल. तिच्या चारित्र्यावर संशय घेतलेल्यांना ती कदापि क्षमा करणार नाही. ती लाचार होणार नाही, अगतिक होणार नाही. कोणत्याही आव्हानाला सामोरं जायची, परिस्थितीशी सामना करण्याची जिद्द तिच्यापाशी असेल. माझ्या नाटकातल्या नायिकेचं ‘कॅरेक्टर’ माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट उभं राहिल्यावर कथानक तयार व्हायला लागलं. नाटय़मय घटना आणि पात्रं त्या दिशेनं वाटचाल करायला लागली. संपूर्ण नाटकाचा आराखडा डोक्यात तयार झाला.

एक सुखी कुटुंब. श्रीधर, त्याची पत्नी उमा आणि छोटी मुलगी मिनी, श्रीधरचे दोन भाऊ अशोक आणि बाळ असं एकत्र कुटुंब. एकमेकांबद्दल जिव्हाळा असलेलं. रस्ता ओलांडणाऱ्या एका लहान मुलीला वाचवताना श्रीधरला अपघात होतो. त्यात त्याला दोन्ही पाय गमवावे लागतात. नोकरी सुटते. उमा नोकरी करायला लागते आणि घर चालवते. अशोकला नोकरी असली तरी ती त्याच्यावर अवलंबून राहत नाही. बाळ बेकार असतो. उमाला बॉसची सेक्रेटरी म्हणून कधी कधी त्याच्याबरोबर क्लायंट्सना भेटायला जावं लागतं. तिच्याविषयी बाहेर प्रवाद उठतात. पण तिला त्याची पर्वा नाही.  तिचं मन स्वच्छ असतं. अशोक एकदा उमाला बॉसबरोबर थिएटरपाशी पाहतो, तो श्रीधरला हे सांगतो आणि वहिनीला थांबवायला हवं, असा सल्ला देतो. अशोकच्या सांगण्यामुळे त्याच्या मनात संशयाचं भूत शिरतं.

उमाचे बॉस प्रधान म्हणजे ‘स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे आणि ती थोडय़ा प्रयत्नाने सहज उपलब्ध होऊ शकते’ यावर ठाम विश्वास असलेला पुरुष, विशेषत: गरजू स्त्रियांना या पद्धतीने वश करणं यात पारंगत. येनकेनप्रकारेण बायका पटवणारा. ‘खुशीच्या व्यवहारात पाप नाही. त्यांची गरज माझा पैसा’ हे त्याचं तत्त्वज्ञान. एकदा उशीर झाल्यामुळे उमाला सोडायला प्रधान घरी आलेले असताना श्रीधर घरी नसतो. प्रधान ही संधी साधून उमाला ऑफर देतात. ‘इफ यू वॉन्ट प्रमोशन, यू विल हॅव टू सॅटिसफाय मी, नॉट नाऊ एनी टाइम.’ उमा संतापते. त्यांची निर्भर्त्सना करते. ते म्हणतात, ‘विचार करा. माय ऑफर स्टँडस्!’ याच वेळी नेमका श्रीधर परत येतो. प्रधान गेल्यावर श्रीधर उमाला पुन्हा पुन्हा विचारतो, ‘ऑफर कसली होती?’ उमा सांगू शकत नाही. त्याचा संशय बळावतो. तिरमिरीत तो उमाला नोकरीचा राजीनामा द्यायला सांगतो. उमा त्याला परोपरीनं समजावयचा प्रयत्न करते. पण तो हट्टाला पेटतो. तिला राजीनामा द्यायला भाग पाडतो. ‘तुम्ही माझ्या चारित्र्यावर संशय घेतलात. मी राजीनामा देईन. पण पुन्हा कधी नोकरी करणार नाही,’ असं उमानं सांगूनही श्रीधर बदलत नाही. तो सांगतो, ‘मी टायपिंगवर पैसे मिळवून घर चालवीन, पण तू नोकरी करायची नाहीस.’

उमा नोकरीचा राजीनामा देऊन घरी बसते. श्रीधरला टायपिंगवर पैसे मिळवून घर चालवणं कठीण जातं. घराची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत जाते. एक दिवस प्रधानांचं पत्र घरी येतं. उमाच्या गैरहजेरीत श्रीधर ते पत्र फोडतो आणि वाचतो. त्यांनी उमाला सन्मानानं नोकरीवर बोलावलेलं असतं. त्या पत्रात त्यांनी लिहिलेलं असतं, ‘माझ्या ऑफरला तुम्ही दिलेला नकार हा माझ्या आयुष्यातला पहिला अनुभव होता. यू आर ग्रेट. मी तुमची क्षमा मागतो. तुम्ही प्लीज पुन्हा नोकरीवर या.’ आपलं पत्र फोडून वाचलं म्हणून उमा चिडते. श्रीधर तिला सांगतो, ‘त्यांनी आता बोलावलंय तर तुला नोकरी करायला हरकत नाही.’ उमा स्पष्ट नकार देते. तिच्या संतापाचा उद्रेक होतो. ती त्याला सुनावते, ‘एक परका पुरुष, ज्याच्यामुळे तुम्ही माझ्या चारित्र्यावर संशय घेतलात, तो माझ्या चारित्र्याविषयी सर्टिफिकेट देणार. आणि त्यावर विश्वास ठेवणार तुम्ही. आणि मी तुम्हाला परोपरीनं जीव तोडून सांगत होते, मी तशी नाही, माझ्या मर्यादा मी कधीच ओलांडल्या नाहीत, तेव्हा का नाही विश्वास ठेवलात माझ्यावर?  जपायचं त्याला काच जपता येते, जपायचं नाही त्याला दगडही जपता येत नाही. संसार सांभाळता सांभाळता मी  सारं जपत होते. पण त्याचा अर्थ तुम्ही अनर्थाला लावलात. केवळ संशयानं! आता माझा तुमच्यावर विश्वास नाही. तुम्ही माझ्यावर केव्हाही अविश्वास दाखवाल, संशय घ्याल. आणि मी तुम्हाला ती संधी देणार नाही. माझ्यावर संशय घेण्याची संधी मी तुम्हाला नाकारीत आहे. मी पुन्हा नोकरी करणार नाही.’ श्रीधर हतबल!

याच वेळेला नवीन पेचप्रसंग उभा राहतो. फी बाकी राहिल्यामुळे मिनीला शाळेतून काढून टाकण्याची वेळ येते. अशोक मदतीचा हात पुढे करतो. स्वाभिमानी उमा नकार देते. ‘माझ्यावर अविश्वास दाखवणाऱ्यांची मदत मला नको.’ पण जेव्हा अशोक सांगतो की, गेले कित्येक दिवस मी अशी मदत करतोय, तेव्हा उमाला जबरदस्त धक्का बसतो. तिची अस्मिता दुखावते. ती पुन्हा नोकरी करण्याचा निर्णय घेते. श्रीधर तिनं क्षमा केल्याबद्दल आभार मानतो. तेव्हा ती त्याला खुलासा करते. ‘मी विसरले नाही आणि कधी विसरणारही नाही. आणि क्षमाही करणार नाही. मी नोकरी तुमच्यासाठी करणार नाही. तर माझ्या मुलीचं भवितव्य माझ्या हाती आहे म्हणून. तिच्यासाठी.’ ‘एका घरात होती’ या नाटकातली उमा ही माझी सर्वात आवडती  नायिका. एका स्वाभिमानी, जिद्दी, अन्याय सहन न करणाऱ्या, परिस्थितीला शरण न जाणाऱ्या आणि प्रत्येक आव्हानाला सामोरं जाणाऱ्या स्त्रीचं प्रातिनिधिक रूप. स्त्रीविषयीच्या माझ्या अपेक्षांचं मूर्त स्वरूप म्हणजे उमा, असं तर नाही? असेलही कदाचित.

या माझ्या उमाला रंगमंचावर सादर केलं विजया मेहतांनी. विजयांनी ही भूमिका इतक्या सहजतेनं केली की जणू काही ती भूमिका त्यांच्याकरिताच लिहिली होती. ‘भूमिकेला न्याय दिला’ वगैरे शब्द अपुरे आहेत.

कल्पनेत रंगवलेलं चित्र जेव्हा शब्दांचं रूप घेतं तेव्हा प्रत्येक वेळी ते मनासारखं उतरतंच असं नाही. पण उमानं मात्र हे समाधान दिलं. म्हणूनही असेल कदाचित उमा ही माझी सर्वात आवडती नायिका आहे.

सुरेश खरे

khare.suresh@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2018 4:59 am

Web Title: suresh khare articles in marathi on old marathi natak
Just Now!
X