04 December 2020

News Flash

पर्यटकांच्या स्वप्नपूर्तीसाठी

मूळच्या मुंबईकर असलेल्या शिबानी यांना लहानपणापासून भटकंतीची आवड.

भटकायला कुणाला आवडत नाही आणि तेही जगातल्या विविध देशांमध्ये. पण हे भटकणंच जर नोकरीचा, व्यवसायाचा भाग बनलं तर? शिबानी फडकर यांच्याबाबतीत तेच म्हणता येईल. ‘थॉमस कूक’च्या त्या वरिष्ठ उपाध्यक्ष. आंतरराष्ट्रीय पर्यटनातलं त्यांचं संशोधन, या क्षेत्रातील योगदान पुढे कंपनीसाठी ‘युनिकनेस’ ठरलं. त्यांच्याविषयी..

मूळच्या मुंबईकर असलेल्या शिबानी यांना लहानपणापासून भटकंतीची आवड. वडील खासगी शिपिंग क्षेत्रात नोकरीला असल्यामुळे त्यांच्या बदलीच्या निमित्ताने, त्यांच्याबरोबर बोटीवर जाणं होई. त्यामुळे अनेक ठिकाणं पाहता आली. विविध ठिकाणांबाबतची उत्सुकता त्या वयात काही अंशी पूर्ण झाली होती. आपण जे पाहू शकलो, फिरू शकलो, अनुभवू शकलो हे सारं अन्य एखाद्याला विनासायास कसं शक्य होईल, हा प्रश्न त्यांना लहानपणी सतावत असे. मग करिअर करण्याच्या वयात पुढे हेच प्रश्न, त्यासंबंधीची आवड त्यांच्या नोकरीचं कारण बनलं.

शिबानी यांना सतावणाऱ्या प्रश्नांच्या माध्यमातून सुलभ पर्यटन आखणीवर त्यांना काम करता आलं. क्लायंट, कस्टमर म्हणून पर्यटकांना हव्या असलेल्या गोष्टींवर संशोधन याही क्षेत्रात असू शकतं, हे शिबानींच्या कार्याने सिद्ध केलंय.
मराठमोळ्या मुंबई उपनगरात राहात असल्यामुळे शिबानी यांचं लहानपण वेगवेगळ्या सांस्कृतिक वातावरणात घडलं. वाचन, नाटक यांची त्यांना शालेय वयापासून आवड. दत्तजयंतीसारखे विविध धार्मिक सणही त्या सांस्कृतिक कार्यक्रमांची जोड देऊन साजरे करत. पर्यटनातील नेतृत्व गुणांचा विकास त्याच वयात झाला असल्याचं त्या सांगतात.
शिबानीचं माहेर म्हणजे चौकोनी कुटुंब. आई-वडील आणि मोठा भाऊ आणि त्या. शालेय शिक्षण चेंबूर परिसरातल्या कॉन्व्हेंटमधून झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या पोद्दार महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. यानंतर आदरातिथ्य सेवा क्षेत्रातील प्रसिद्ध व नावाजलेला ‘आयटा’चा पूर्ण वेळ अभ्यासक्रम केला. पर्यटन क्षेत्रातील प्रवासी व सेवा पुरवठादार यांच्या मानसिकतेचा व ते सारं आर्थिक चौकटीत कसं बांधायचं हा त्यांचा संशोधनाचा विषय. ‘थॉमस कूक’मध्ये त्यांनी यावरच अधिक भर दिला.

पर्यटन क्षेत्रातील ‘थॉमस कूक’च्या रूपातील त्यांची ही पहिली नोकरी. कार्यकारी प्रशिक्षणार्थी म्हणून दीड दशकांपूर्वी सुरू झालेला शिबानी यांचा ‘थॉमस कूक’मधील प्रवास त्यांना त्यांच्या आंतरराष्ट्रीय पर्यटनातील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर वरिष्ठ उपाध्यक्षपदापर्यंत घेऊन गेला. इथं सुरुवातीला त्यांनी पर्यटक, पर्यटनांशी संबंधित हवाई प्रवासी विभागाचा कार्यभारही हाताळला. पर्यटकांसाठी महत्त्वाचं, उपयुक्त ठरणाऱ्या उत्पादन/ पॅकेजची आखणी, त्यांच्या किमती ठरवणं हेही कालांतरानं त्यांच्याकडे आलं. प्रवाशांना नेमकं काय हवं आणि ते देण्यासाठी आवश्यक म्हणून टूरवर, टूर ऑपरेटर मॅनेजरच्या कार्यपद्धतीवर त्यांनी नंतर लक्ष केंद्रित केलं. ‘थॉमस कूक’चा प्रशिक्षणासाठीचा स्वतंत्र भागही आहे.

शिबानी यांच्याकडे ‘थॉमस कूक’च्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाचा (लेसर ट्रॅव्हल- आऊटबाऊंड) कार्यभार आहे. यासाठीचे पर्यटन उत्पादन-पॅकेज तयार करणं, त्याचं परिचलन करणं आदी, तसंच विदेशी टूरचे संपूर्ण व्यवस्थापन त्यांच्या अखत्यारीत तयार होतं. या क्षेत्रातील आव्हानं नमूद करताना पर्यटकांचं स्वप्न हेरून ते विनासायास पूर्ण करणं महत्त्वाचं असतं, असं शिबानी म्हणतात. पर्यटनासारख्या ठिकाणी तर तुम्हाला पर्यटकांनी पाहिलेली स्वप्न ओळखायची असतात आणि ती त्यानुरूपच सहलींद्वारे पूर्ण करून द्यायची असतात. गैरसोय म्हणता येणार नाही पण थोडंसं पर्यटकांच्या अंदाजाबाहेर गेल्यास त्यांची नाराजी ओळखून सेवेतील बदल, भविष्यातील त्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या लागतात. विदेशी सफरींबाबत तर हे खूपच महत्त्वाचं ठरतं, असं त्या सांगतात.

शिबानी म्हणतात, कम्युनिकेशन किंवा संवाद हा तर या क्षेत्रात खूपच आवश्यक ठरतो. म्हणजे पर्यटकांची सफरीआधीची प्रश्नसरबत्ती, ऐन प्रवासादरम्यानच्या त्यांच्या शंका यांना शांतपणे तोंड देण्याचं सामथ्र्य सहलीतील प्रत्येक टूर ऑपरेटर, मॅनेजरला अंगी बाळगावं लागतं. एवढंच नव्हे तर प्रत्यक्ष सहलीसाठी होणाऱ्या विचारणेनुसार उत्पादन, पॅकेज तयार करणं आणि ते पर्यटकांच्या अपेक्षेस उतरणं ही तर तारेवरची कसरतच असते.

कामाच्या ठिकाणी असलेला ‘जेंटर बायस’चा मुद्दा शिबानी फेटाळून लावतात. पर्यटन, हॉटेल आदी आदरातिथ्य सेवा क्षेत्रात तर अहोरात्र सेवा अपेक्षित असते; तेव्हा इथे लागणाऱ्या मनुष्यबळामध्ये स्त्री-पुरुष असा भेद करून चालत नाही. अनेक आघाडीच्या कंपन्या आता स्त्रियांच्या सोयीनुरूप कामाच्या वेळा निश्चित करतात, कामाच्या ठिकाणी त्यासाठी आवश्यक अशा उपाययोजना करतात, याकडे त्या लक्ष वेधतात.

कष्टकरी स्त्रियांना कौटुंबिक आधार तर कायमच अपेक्षित असतो, हे स्पष्ट करताना शिबानी सांगतात, घर आणि नोकरी सांभाळायची म्हणजे कुटुंबाकडून भावनिक आधारही खूप मोठा ठरतो. या दोन्ही गोष्टी करताना त्यात समतोल साधणं हे तर कोणत्याही स्त्रीसाठी आव्हानात्मकच आहे. शिबानी यांना हा कौटुंबिक आधार मिळतो, असं त्या सांगताता. पतीचा रसायननिर्मिती क्षेत्रातील स्वत:चा व्यवसाय आहे. त्यांचे सासरेही याच व्यवसायात आहेत. त्यांची दोन मुले शाळेत जातात. या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळेच शिबानी यांची वाटचाल सुरू आहे.

शिबानी फडकर :
अनेक आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळं स्वत: पाहिलेली, अनुभवलेली असल्यानं तेथील वैशिष्टय़े खास पॅकेजमध्ये अंतर्भूत करून केवळ ‘थॉमस कूक’च्या पर्यटकांसाठी ती उपलब्ध करून देण्यातील ‘युनिकनेस’ शिबानी यांनी जोपासला. युरोपातील आणि स्वित्र्झलडमधील काही पर्यटनस्थळे ही फक्त ‘थॉमस कूक’च्या पर्यटकांनाच पाहता येतात. शिबानी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत असलेल्या सहल सेवा उत्पादनांमुळे कंपनीकडे पुन:पुन्हा येणाऱ्या पर्यटकांचं प्रमाण ‘थॉमस कूक’च्या इतिहासात प्रथमच ६५ टक्क्यांवर नोंदलं गेलं आहे.

थॉमस कूक :
थॉमस कूक हे पर्यटन क्षेत्रातील मोठं नाव. काही वर्षांपूर्वी एक आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा पुरवठादार कंपनी म्हणून प्रतिमा असलेल्या या कंपनीनं भारतात, देशांतर्गत पर्यटन क्षेत्रातही स्थान मिळविलं. भारतीय व्यवसायाला साजेसं म्हणून कंपनीच्या ताफ्यातही वरच्या पदांवर अनेक बदल करण्यात आले. १८४१ची स्थापना असलेली एक आंतरराष्ट्रीय कंपनी असलेला मूळचा ‘थॉमस कूक’ समूह वर्षभरात २ कोटी ३० लाखांहून अधिक पर्यटकांना सफर घडवतो.

व्यवसायाचा मूलमंत्र :
तरुण नेतृत्वाला हेरून त्यानुसार संधी देणारं व्यासपीठ तुम्हाला कामाच्या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे, हे मान्य. पण तुम्ही जे काम घेतलंय ते करायचं म्हणून करण्यापेक्षा आनंदानं करा. आपलं जीवन आपल्या कामामुळे अधिक सुसह्य़ कसं होईल, हे खरं तर आपल्याच हातात आहे.

आयुष्याचा मूलमंत्र :
व्यवसायाप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यासाठी तुम्ही जे स्वीकारलंय त्याचा आनंदाने उपभोग घ्या. एक तर काय करायचं याचा शांतपणाने निर्णय घ्या आणि मग जे कराल त्यात जीव ओता. स्वत:शी, इतरांशी प्रामाणिक राहा. समोरच्यालाही समजून घ्या. संवाद साधा. त्यातून बऱ्याच गोष्टी सुलभ होतात.

 

– वीरेंद्र तळेगावकर
veerendra.talegaonkar@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2016 1:05 am

Web Title: woman entrepreneur thomas cook shibani phadkar success story
Next Stories
1 ‘कृति’शील व्यक्तिमत्त्व
2 पारंपरिक कलेला व्यावसायिक कोंदण
3 टेलिशॉपिंग क्षेत्रातली वेगवान भरारी
Just Now!
X