विहीर’ ही वास्तू एखादे पर्यटन स्थळ असू शकते का? सातारा जिल्ह्य़ातील लिंब नावाच्या गावात जाऊन तिथल्या पंधरा मोटेच्या विहिरीवर उभे राहिले, की याचे उत्तर हो असे मिळते. वृक्षांच्या गर्दीत बुडालेली ही जलवास्तू तन, मन हरपायला लावते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शांतता, सावली आणि पाणी या तीन गोष्टींमध्ये कुठला समान धागा, नातेसंबंध असेल का? घरात बसून याचे उत्तर बहुधा सापडणार नाही. पण तेच आग ओकणाऱ्या उन्हातून, जिवाची लाही-लाही करणाऱ्या तापातून अचानकपणे एखाद्या शांत, शीतल आणि पाण्याचा सहवास असलेल्या स्थळी गेला तर या शब्दांचे धागेदोरे तुम्ही नक्कीच अनुभवाल! हे सांगायचे कारण असे, की साताऱ्याजवळच्या लिंब नावाच्या एका छोटय़ाशा गावामध्ये असाच एकदा भर दुपारी ऊन खात गेलो आणि तिथल्या एका वनराईत लपलेल्या त्या ऐतिहासिक, कलात्मक विहिरीने न भिजवताही ओलेचिंब व्हायला झाले.
विहीर! हा केवळ शब्द जरी उच्चारला तरी डोळय़ांपुढे पाणी आणि तिचा गारवा उभा राहतो. लिंब गावातील ही विहीरही अशीच. पण तिचे नाते पाण्याबरोबरच तिला लाभलेल्या कला आणि स्थापत्यात जास्त! तिच्या या सुंदर रूपाचीच गोष्ट खूप दिवस ऐकत होतो. ती पाहण्यासाठी इथे आलो आणि तिच्या सौंदर्यात हरवून गेलो.
आड, विहीर, बारव, तळी, टाकी, पुष्करणी असे जलसिंचनाचे नाना वास्तुप्रकार इतिहासकाळापासून आपल्या या सृष्टीचा हा भूगोल फुलवत आहेत. या प्रत्येकाचे स्वत:चे असे स्थापत्य, कलावैशिष्टय़. कर्ताकरवित्याच्या कुवतीनुसार ते जागोजागी बहरत गेले. लिंबची विहीरही अशीच सातारच्या गादीच्या आश्रयाने निर्माण झाली.
पुण्याहून साताऱ्याकडे जाताना साताऱ्याच्या अलीकडे १३ किलोमीटरवर नागेवाडी नावाचे गाव आहे. या थांब्यावरूनच लिंब गावासाठी फाटा फुटतो. दोन किलोमीटरचे हे अंतर. साताऱ्याहून या गावापर्यंत एस.टी. बसही येते. खरे तर या गावाची ओळख लिंब गोवे अशी आहे. कृष्णेच्या काठावरील या गावात पेशवेकालीन मंदिरे, नदीकाठचे घाट असे बरेच काही पाहण्यासारखे आहे. या गावचा कृष्णामाईचा उत्सवही मोठा असतो. पण या गावात याहून विलक्षण असे एक स्थळ दडलेले आहे ते म्हणजे, ‘पंधरा मोटेची विहीर’!
या गावाचीच एक वस्ती लिंब शेरी! ‘शेरी’ म्हणजे राजे-संस्थानिकांचे खासगी बागायती-आवडते क्षेत्र. इथे या गावातही ते आहे. सातारच्या छत्रपतींनी ही जागा फुलवली, आमराई निर्माण केली आणि मग अशा या राईतच त्यांनी या साऱ्यांसाठी म्हणून एक विहीरही खोदली, अगदी त्यांच्या दिमाखाला साजेशी, एखाद्या राजवाडय़ासारखी!
कधीकाळी लावलेल्या वृक्षांची सावली पांघरत इथे आलो, की समोरच्या या जलमंदिराने भारावून जायला होते. शिवपिंडीच्या आकाराची विहीर. पाठीमागे अष्टकोनी मुख्य विहीर, त्याला जोडूनच पुढे चौकोनी भाग आणि त्याही पुढे निमुळत्या झालेल्या भागातून पायऱ्यांचा मार्ग अशी ही रचना. भव्यदिव्य अशा या रचनेत काय नाही? पायऱ्या, पूल, कमानी, सज्जा, मंडप, खोल्या, कोरीव खांब, त्यावर शिल्पांकन, शिलालेख, मोटांचे धक्के, पाणी जाण्यासाठी दगडी पन्हाळी आणि मुख्य म्हणजे या साऱ्याच्या सोबतीला स्वच्छ-नितळ पाणी! अगदी आरशासारखे! ..जणू हा एखादा पाणी महालच!!
उत्तरेकडच्या निमुळत्या भागातून एक पायरी मार्ग या आगळय़ावेगळय़ा विहिरीत उतरतो. किल्ल्याला असावे त्याप्रमाणे या विहिरीला तळाशी एक मोठा दरवाजा-कमान! त्याच्या भाळी एक आडवा शिलालेख. या विहिरीची जन्मकुंडली सांगणारा ‘‘श्री भवानी शंकर प्रसन्न! श्रीमंत सौभाग्यवती वीरुबाईसाहेब यांनी…’’ थोडक्यात अर्थ असा, की सातारच्या गादीचे संस्थापक शाहूमहाराज यांच्या राणीसाहेब श्रीमंत सौभाग्यवती वीरुबाईसाहेब यांनी शके १६४१ ते १६४६ म्हणजेच इसवी सन १७१९ ते १७२४ या दरम्यान ही सुंदर विहीर आकारास आणली. या दरवाजावर या लेखाशिवाय कमळ, चक्र, मध्यभागी पोपटासारखा पक्षी कोरलेला आहे. मागच्या बाजूस दोन्ही हातास शरभाची शिल्पं आहेत. हा एक काल्पनिक पशू.. वाघ, कुत्रा, मगर अशा अनेक प्राण्यांचे एकत्रित रूप!
आपण या दरवाजातून आत पाय ठेवतो तेच मुळी विहिरीपुढच्या चौकोनी भागात. या चौकोनी भागातही पाणी असल्याने विहिरीच्या पुढच्या भागात जाण्यासाठी एक छोटासा पूल बांधलेला आहे. हा चौक आणि पुढील विहीर या दरम्यान एक जाडजूड विहिरीच्या उंचीची भिंत आहे. या भिंतीतच एका महालाची रचना केलेली आहे. या महालात जाण्यासाठी या चौकापुढील कमानी खालून एक जिना आहे. तसे विहिरीच्या वरच्या बाजूनेदेखील एक रस्ता आहे. बऱ्याच वेळा विहिरीचे पाणी या पुलावरही येत असल्याने वरच्या मार्गानेच या महालात उतरावे लागते. कुठली एक विहिर..पण तिच्यातील हे कुतूहल पाहताना प्रत्येक पावलावर अचंबित व्हायला होत होते. महालात आलो, की आतील स्थापत्याविष्काराने आणखी उडायला होते. विहिरीच्या मधोमध असलेला हा मंडप. एकूण सोळा खांबांवर आधारित. यातील मधले दोन तेवढे स्वतंत्र, बाकीचे भोवतीच्या भिंती, कमानींमध्ये सामावलेले आहेत. या खांबांवर पुन्हा शिल्प-नक्षीकाम. गणपती, हनुमान, गोपिकांसह मुरलीधर, कुस्ती खेळणारे मल्ल, घोडेस्वार, हत्तीस्वार, पक्ष्यांच्या जोडय़ा, मोत्यांची माळ घेतलेला हंस अशी ही शिल्पं. या जोडीने विविध भौमितिक आकृत्यांची नक्षी, कमळे, चक्रही कोरलेली. खांबांच्या शिरोभागी काही ठिकाणी छताचा भार सावरल्याचा भाव दाखवणारे यक्ष, छताच्या मध्यभागी उमलती कमळे, असे बरेच काही. कधी काळी हा सारा महाल रंगवलेला होता. त्याचे अवशेष आजही दिसतात.
महालाच्या या खांबांना रेखीव दगडी कमानींची गवाक्षे आहेत. या गवाक्षातून बाहेर डोकावण्यासाठी दोन्ही बाजूस सज्जे ठेवलेले आहेत. या सज्जातून विहिरीत डोकवावे तो मुख्य विहिरीचे रेखीव बांधकाम पुढय़ात येते. या बांधकामावर पुन्हा जागोजागी शरभ, व्याल अशी शिल्पं विसावलेली. तीन माशांचे एकत्रित असेही एक शिल्प आहे. विहिरीच्या प्रत्येक कोनावर पुन्हा एकेक नागशिल्प. ही विहीर आहे, की एखादे जलमंदिर! हे सारे पाहता-पाहताच विहिरीतील ते स्वच्छ-नितळ पाणी आपले लक्ष वेधून घेते. एवढा वेळ पाहात असलेल्या या स्थापत्याविष्कारातील हा द्रव्यसाठा. जणू एखाद्या श्रीमंत कुपीतील मौल्यवान दागिनाच. ..मग या साऱ्या सौंदर्याची त्या अवकाशालादेखील मोहिनी न झाली तरच नवल! त्याने आपला स्वच्छ निळाभोर चेहरा या पाण्यात डोकावला आणि त्याच्या निळाईने या साऱ्या स्थापत्यालाच नवी झळाळी आली.
तब्बल ११० फूट खोल आणि पन्नास फूट व्यासाची ही विहीर! तिचा त्या अष्टकोनी आणि त्यापुढील चौकोनी भागातून तब्बल पंधरा ठिकाणी पाणी वर उपसण्यायाठी मोटेची सोय केलेली. या मोटांच्या दगडी तोटय़ा आजही शाबूत. हे सारे बांधकाम ज्यातून केले त्या चुन्याच्या घाणीची दगडी चाकेही इथेच रुतून बसलेली आहेत. अगदी सगळी वास्तू जागच्या जागी.. काळ तेवढा पुढे सरकलेला!
..असे वाटले, आता या साऱ्या मोटा पुन्हा सुरू होतील. खळखळ आवाज करत पाणी वाहू लागेल. बैलजोडय़ांच्या गळय़ातील त्या घुंगूरमाळा नाद करत वाजू लागतील. त्यांच्या मागे धावणारा मोटकरी एखादे लोकगीत गुणगुणू लागेल! ..केवळ एका वास्तूने केलेले हे स्वप्नरंजन! लिंबच्या एका विहिरीने जागवलेले हे स्वप्नरंजन तिच्या आरसपानी सौंदर्याबरोबरच मनावर कायमचे कोरले गेले.

मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ancient wells in maharashtra
First published on: 02-04-2015 at 07:51 IST