‘हा किल्ला म्हणजे चहूबाजूने उभा तुटलेला एक कडा आहे. जिथे शत्रूचा तोफखानाही चालत नाही. गडावर जाणारी वाट उभ्या कातळातून शिडीसारखी वर चढते. खोबण्याचा मार्ग व त्यावरील दीड फूट उंचीच्या २४० पायऱ्या चढण्यास कठीण आहेत. वायव्येस किल्ल्यापासून अलग झालेला निमुळता सुळका असून, इथे समोर भयंकर खोल दरी दिसते. किल्ल्याच्या नैर्ऋत्येच्या कडय़ावरून जर एखादा दगड खाली टाकला तर तो थेट दोन हजार फूट खाली तळकोकणात जाऊन पडतो.’’
गेल्या शतकातील बॉम्बे कुरिअर या वृत्तपत्राच्या १६ मे १८१८च्या अंकात इंग्रज पलटणीतील मेजर एल्ड्रीज या अधिकाऱ्याने जीवधन किल्ल्याचे केलेले हे वर्णन! मराठे-इंग्रजांमधील शेवटच्या युद्धानंतर जीवधन ताब्यात घेतल्यावर एल्ड्रीजने तो पहिल्यांदा पाहिला. या वेळी भारावून गेलेल्या या गोऱ्या अधिकाऱ्याने जीवधनवर स्वतंत्र लेख लिहीत त्याचे असे कौतुक केले. या गोष्टीला एवढी वर्षे होऊन गेली, पण आजही इथे आलो, की या वर्णनामध्ये तसूभरही अतिशयोक्ती नसल्याचे जाणवते.
जीवधन! मागच्या वेळी पाहिलेल्या चावंड किल्ल्याचा हा सख्खा शेजारी! पुणे जिल्हय़ातील जुन्नरपासून २७ किलोमीटरवर, प्राचीन नाणेघाटाच्या तोंडाशी आणि घाटघर गावाच्या हद्दीत. उंची समुद्रसपाटीपासून ११४५ मीटर! इथे येण्यासाठी जुन्नरहून सुटणारी घाटघर एसटी बस सोयीची. मुंबई-ठाण्याकडून येणाऱ्यांनी कल्याणहून माळशेज घाटाच्या दिशेने धावणाऱ्या एसटी बसने वैशाखरे थांब्यावर उतरावे आणि नाणेघाट चढून जीवधनला पोहोचते व्हावे. गडावर जाण्यासाठी या पायथ्याच्या घाटघर गावातूनच निघावे लागते. पश्चिम व पूर्वेकडून असे दोन मार्ग! यातील पश्चिमेकडील राजमार्ग पूर्वी सोयीचा होता, पण इंग्रजांनी सुरुंग लावून ही वाट तोडून टाकली. या मार्गावरील उभ्या कातळात खोदलेला दरवाजाही मोठमोठे दगड पडून बुजला होता. नुकताच तो मोकळा करण्यात आला आहे. त्या मानाने पूर्वेकडची घाटघर गावातून गडावर चढणारी वाट अवघड असली तरी सध्या तीच वाहती आहे. एल्ड्रीजने वर्णन केलेली हीच ती वाट. खडकात खोदलेल्या पायऱ्यांचा हा मार्ग! पण ब्रिटिशांनी आमच्या अनेक किल्ल्यांच्या वाटांची जी वाट लावली त्यामध्ये जीवधनच्या या दोन्ही मार्गानाही त्यांनी सुरुंग लावले. याच्या खुणा आजही दिसतात. यामुळे हा पायऱ्यांचा मार्ग एक-दोन ठिकाणी तुटला आहे. या तुटलेल्या भागात उभ्या कातळातील टप्पे आडवे येतात. या वेळी त्यामध्ये असलेल्या खोबण्यांचा आधार घेतच वर सरकावे लागते. प्रस्तरारोहणाचे हे दोन टप्पे पार पडले, की आपण गडाच्या पहिल्या दरवाजात पोहोचतो. पूर्वेकडील या दरवाजाच्या उद्ध्वस्त कमानीतून आपण आत प्रवेश करतो. या दारालगतच एकात एक गुंफलेल्या पाच पाण्याच्या टाक्या दिसतात. यातील काही पहारेक ऱ्यांच्या खोल्या वाटतात. गडात प्रवेश करताच फोफावलेल्या गवतातून अनेक उद्ध्वस्त अवशेष माना वर काढतात. मध्यभागी बालेकिल्ल्याची टेकडी आणि तिच्या भोवताली हा वास्तू परिसर! सुरुवातीलाच लक्ष जाते ते या टेकडीलगत दडलेल्या एका बांधकामाकडे! एखादे लेणे वाटावे अशी ही वास्तू! दर्शनी भागात बांधकाम तर पाठीमागे खोदकाम! मुखमंडपवजा प्रवेशद्वार, त्यावर ते संपन्नतेचे प्रतीक असलेले गजान्तलक्ष्मीचे शिल्प! दोन्ही बाजूने जलधारा सोडणारे हत्ती, तर मध्यभागी ती लक्ष्मीदेवता! या शिल्पाच्या खाली पुन्हा चंद्र-सूर्याची शुभप्रतीके! एकूणच प्रवेशावेळीच महत्त्व सांगणारी ही वास्तू महत्त्वाची, ऐश्वर्य साठवणारी असावी!
आतमध्ये सर्वत्र अंधाराचे साम्राज्य, तेव्हा टॉर्च घेऊनच प्रवेश करावा लागतो. एकामागे एक अशी तीन टप्प्यांतील वास्तू! यातील मधल्या भागास डाव्या-उजव्या हातास आणखी एकेक दालन! या साऱ्यांच्या मिळून पाच खोल्या तयार झालेल्या आहेत. या सर्वाच्या छतावर कमळाची झुंबरे कोरलेली आहेत. कोपऱ्यावरील खांबांच्या दंडांवर फणा काढलेले नाग आहेत. भिंतीत कमानीच्या खिडक्या आहेत, तळाशी बसण्यासाठी ओटे आहेत. त्या धूसर प्रकाशात हे सारे पाहात असताना गूढ वाटू लागते.
यातील अर्धा भाग बांधीव तर अर्धा खोदलेला. तिसऱ्या दालनाच्या डोक्यावर बालेकिल्ल्याचा सारा डोंगर आहे. या कल्पनेनेच घाम फुटायला होते.  जीवधनच्या पोटातील हे लेणे कधी, कोणी आणि कशासाठी कोरले याची माहिती उपलब्ध होत नाही. पण हे खोदकाम गडाच्या निर्मितीवेळेचे म्हणजेच सातवाहन काळातीलच असावे असे वाटते. गजान्तलक्ष्मीचे शिल्प भाळी मिरवणाऱ्या या वास्तूची ओळख धान्याची कोठी म्हणून येते. अगदी १८१८ मध्ये झालेल्या शेवटच्या युद्धावेळी या कोठीत मोठय़ा प्रमाणात धान्यसाठा करून ठेवलेला होता. हा साठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला किंवा त्याला हेतूत: आग लावली गेली. पण त्या राखेच्या ढिगात आजही आपले पाऊल बुडते. पायाखालची ही राख आणि काजळी चढलेल्या छत-भिंती हे सारेच दर्शन त्या प्राचीन इतिहासात बुडवून टाकते. या कोठीच्या पाठीमागे दक्षिण अंगाला एकात एक गुंफलेली पाण्याची पाच टाकी दिसतात. शिबंदीची घरेही दिसतात. गडाच्या उत्तर माचीतही चवदार पाण्याचे एक विस्तीर्ण तळे आहे. याच्या अलीकडेच काही स्मारके आणि अन्य अवशेष दिसतात. या भागातील तटबंदीही अद्याप शाबूत आहे. हे सारे पाहात पश्चिम अंगाला येत असतानाच वाट अचानक तुटते आणि त्या तुटलेल्या धारेवर काही क्षण काळजात धस्स होते. एल्ड्रीजने व्यक्त केलेली ती मृत्यूची खोल दरी पुढय़ात उभी असते. तर तिला तितक्याच ताकदीने वर उसळलेला वानरलिंगीचा सुळका आव्हान देत उभा राहतो. दोनएक हजार फुटांचा हा कडा आणि त्याच्या एका अंगावर विसावलेला हा तीन-चारशे फुटांचा सुळका! त्याच्या पहिल्या दर्शनानेच काळजात धडकी भरायला होते. सहय़ाद्रीचे हे अक्राळविक्राळ रूप जमिनीवर आडवे होतच पाहायचे, डोळय़ांत साठवायचे. एल्ड्रीजने सांगितल्याप्रमाणे या कडय़ावरून छोटासा दगड सोडावा आणि तो थेट दोन हजार फूट खोल त्या पाताळात जाऊन पडल्याचे जीव मुठीत धरून पाहावे..जीवन-मृत्यूच्या सीमारेषेवरचाच हा खेळ! सहय़ाद्रीत फिरताना ही अशी त्याची अजस्र रूपे अनेकदा काळजात धस्स करतच अचानकपणे समोर येतात.
या अंगालाच एका नाळेत गडाची पश्चिम वाट दडलेली आहे. जवळ जाईपर्यंत ती दिसत नाही. ऐन खडकात खोदून काढलेला हा दरवाजा! हडसर किल्ल्याची आठवण करून देणारा. खडकातच खोदलेल्या पायऱ्या, त्यावर त्याच कातळात कोरलेला दरवाजा, त्याच्या कमानीवर कोरलेल्या चंद्र-सूर्याच्या प्रतिमा, बाजूचे बुरूज असे सारे ऐन कडय़ावरचे दुर्गम शिल्प! गडाचा हा खरा तर राजमार्ग, पण हा मार्ग ब्रिटिशांनी सुरुंग लावून उद्ध्वस्त केला. हा दरवाजा मोठमोठय़ा शिळांनी चिणून गेला होता. नुकताच तो मोकळा केल्याने त्याचे आता दर्शन होते आणि पश्चिमेकडील राजमार्गावरही उतरता येते. पण या मार्गावरही एक-दोन ठिकाणी कडय़ाला बिलगावे लागते. ही वाट थेट नाणेघाटावर नजर ठेवतच उतरते. यातूनच तिचे इतिहासातील महत्त्व कळते.
आपण ती पाहात पुन्हा परत बालेकिल्ल्यावर निघावे. जीवधनचा बालेकिल्ला म्हणजे एक छोटीशी टेकडी आहे. या टेकडीवर एका उंच जोत्यावर गडदेवता जीवाबाईचे वृंदावन आहे. या देवीच्या नावावरूनच गडाला ‘जीवधन’ असे नाव पडले. या गडातील लेण्या व खोदीव टाक्या यावरून या गडाची निर्मिती सातवाहन काळातील वाटते. सातवाहनांनी खोदलेल्या नाणेघाटाच्या संरक्षणाची जबाबदारी या गडावर असावी. त्याच्याकडे तोंड करून असलेला राजमार्ग तेच सुचवतो आहे. सातवाहनानंतर थेट इसवी सन १४९० मध्ये निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद याने जीवधन ताब्यात घेतल्याचा उल्लेख मिळतो. दरम्यान, पुढे १७ जून १६३३ मध्ये निजामशाही बुडाली आहे, याच वेळी जीवधनच्या साक्षीने हिंदवी स्वराज्याचा एक ‘मिनी ट्रेलर’ इथे पार पडला.
या गडावर त्या वेळी निजामशाहीचा शेवटचा वंशज मूर्तझा निजामशाह कैदेत होता. निजामशाहीचे सरदार शहाजीराजे भोसले यांनी मूर्तझाची सुटका करून संगमनेरजवळच्या पेमगिरी किल्ल्यावर एका छोटय़ा समारंभाद्वारे त्याला निजामशाह म्हणून घोषित केले. निजामशाही टिकविण्याच्या निमित्ताने शहाजीराजांची ही स्वतंत्र स्वराज्यनिर्मितीचीच धडपड सुरू होती. या कामी त्यांना विजापूरचे सरदार मुरार जगदेव यांचीही मदत होती. कुकडी खोऱ्यातील शिवनेरी, हडसर, चावंड आणि जीवधन या किल्ल्यांच्या मदतीने त्यांनी योजलेली ही चाल मोगलांच्या लक्षात आली आणि मग हे आव्हान मोडण्यासाठी स्वत: शाहजहान दक्षिणेत उतरला. महमद आदिलशाहकरवी मुरार जगदेवची हत्या करण्यात आली. शेवटी उत्तरेच्या या प्रचंड फौजांपुढे निभाव लागणे कठीण दिसताच शहाजीराजांनी हे पाचही किल्ले मोगलांना दिले. त्यांचे भंगलेले हे स्वप्न पुढे त्यांच्याच मुलाने, शिवरायांनी सत्यात उतरवले.
जीवाबाईच्या टेकडीवर उभे राहिले की या प्रसंगातील शिवनेरी, चावंड, हडसर ही सारी पात्रे दिसतात. शहाजीराजांच्या पराक्रमाने ढवळलेले कुकडीचे खोरे दिसते आणि मग इतिहासातील हे स्वराज्याचे एकअंकी नाटय़ अधिक जिवंत वाटू लागते.