या मालिकेत आपण मागे रेवदंडय़ाची सफर केली. रेवदंडा हा अलिबागच्या अष्टागरमधील शेवटचा थांबा! नारळी-पोफळीत झाकलेल्या या अष्टागरमधून बाहेर पडावे तो पाण्याने भरलेली सशक्त अशी कुंडलिका खाडी समोर येते. पल्याड मुरूड, तर अल्याड अलिबाग तालुका! गेली कित्येक शतके या दोन तीरांमध्ये नावा-बोटींचा संवाद सुरू होता. पुढे १९८६ मध्ये या खाडीवर साळावचा तो भलामोठा पूल झाला आणि हे दोन्ही भूभाग एकमेकांना जोडले गेले. साळावच्या या पुलावर आलो, की उजव्या हाताचे समुद्रात शिरलेले भूशीर त्याच्या माथ्यावरील एका गडाच्या तट-बुरुजांच्या शेला-पागोटय़ासह लक्ष वेधून घेते. आजची आपली वाट समुद्रातून डोके वर काढलेल्या या जलदुर्गावरच चढणार आहे. नाव कोर्लई!
अथांग सिंधुसागर आणि त्याला खेटून असलेल्या कोकणाच्या या चिंचोळी पट्टीवर राज्य करणाऱ्या राजसत्तांच्या अनेक जलदुर्गापैकी हा एक महत्त्वाचा दुर्ग! कुंडलिका खाडीच्या मुखाशी एका अंगाला हा कोर्लई तर दुसऱ्या रेवदंडा! जणू कुंडलिकेचे हे दोन्ही द्वारपाल! त्यांना विचारल्याशिवाय या खाडीत प्रवेश मिळणार नाही.
पंडित महादेवशास्त्री जोशी त्यांच्या ‘महाराष्ट्राची धारातीर्थे’ या पुस्तकात लिहितात, ‘..कुंडलिकेने सिंधुसागराला आलिंगन दिले, त्या प्रीतिसंगमावरचा हा तीर्थोपाध्याय! पश्चिमेच्या डोंगराला नांगराच्या फाळासारखी जी एक तिरकस सोंड फुटली आहे, तिच्या टोकावर कोर्लई किल्ल्याची उभारणी झाली आहे. त्या बाजूला तोच एक डोळय़ांत भरतो. श्रीमंतीने किंवा डामडौलाने नव्हे, तर नि:संग निरासक्त वृत्तीने. त्यावर झाडांची हिरवळ नाही, की दगडांची अडगळ नाही. भगवी छाटी पांघरून अनंताचे ध्यान धरून बसलेला जणू तो एक ज्ञानभिक्षूच!’
साळावच्या त्या पुलावरून समोरचा देखावा पाहात हे वर्णन आठवावे आणि कोर्लईचे कौतुक करत त्याच्याकडे मार्गस्थ व्हावे. पुलापलीकडे आलो, की आपण रोहय़ातून मुरूडकडे गेलेल्या रस्त्यावर येऊन पोहोचतो. या रस्त्यावरच उजवीकडे हा कोर्लई किल्ला आणि पायाशी कोर्लई गाव! कोळी लोकांची ही वस्ती, पण गावात शिरण्यापूर्वीच त्याची ‘गंधवार्ता’ नाकापर्यंत पोहोचते. साऱ्या गावभर प्रत्येकाच्या अंगणात उन्हाळी पापड वाळत घालावेत त्याप्रमाणे सुके मासे वाळत घातलेले असतात. पण या कोर्लई गावाचे या व्यतिरिक्तही आणखी एक वैशिष्टय़!
‘वाँ नॉम की?’ असा एखादा प्रश्न येतो आणि कोर्लईच्या या जगावेगळय़ा वैशिष्टय़ाला तोंड फुटते. संस्कृत, मराठी, पोर्तुगीज, बंगाली, तुळू आणि उर्दू अशा अनेक भाषांच्या संकरातून कोर्लईच्या या बेटावर एका अनोख्या भाषेचा जन्म झाला, ‘नी लींग’! ‘नी लींग’म्हणजे आमची बोलीभाषा! कोर्लईची ही खास वेगळी बोलीभाषा! पोर्तुगीज भाषेचा प्रभाव असलेली, पण अन्य अनेक भाषांचे, त्यातील शब्दांचे संदर्भ घेत ही फुललेली! यातले काही शब्द इंग्रजी, काही पोर्तुगीज, काही उर्दू तर काही चक्क आपल्या संस्कृत-मराठीतील! पण ही फक्त बोलीभाषा. यामुळे तिला स्वत:ची लिपी, व्याकरण असे काहीच नाही. गंमत अशी, की ही माणसे बाहेरच्या कुणाशी बोलू लागली की तुमच्या आमच्यासारखे मराठी बोलतात. पण त्यांच्यात एकमेकांशी बोलताना पुन्हा त्याची ही  ‘नी लींग’ सुरू. त्यांना काही विचारले तर ते म्हणतात, ‘आमचं भासा पुर्तुगीज!’ पण खरेतर हे अगदी पोर्तुगीजही नाही. या वस्तीतले बरेचसे लोक ख्रिश्चन आहेत. त्यांचे धागेदोरे या पोर्तुगीज किल्ल्याशी जोडलेले असावेत. बहुधा त्यांच्या मूळ भाषेवर पुढे अनेक शतके वेगवेगळय़ा भाषांचे आक्रमण आणि संक्रमण होत यातून ही नवी मिश्र बोलीभाषा तयार झाली असावी. याच्याविषयी सखोल संशोधन होणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस अनेक संवादबोली लुप्त होत असताना कोर्लई बेटावरच्या या भाषावैभवाने खरेच भुरळ पाडली. असो! तर आपण आपले मराठीत गडाचा मार्ग विचारावा आणि पुढील वाटेला भिडावे. कोर्लई, कोरलई, कोरले अशा अनेक नावांनी इतिहासापासून ओळख सांगत आलेला हा जलदुर्ग! तीन बाजूंनी पाणी आणि एका बाजूने जमीन! यातील उत्तर दिशेने कुंडलिका खाडी, तर दक्षिण आणि पश्चिम दिशेला सिंधुसागराचा वेढा! पाण्याच्या या अगाध डोहात सहय़ाद्रीचे हे चुकार भूशीर इथे मध्येच समुद्रातून आकाशाकडे झेपावले आहे. त्यावरच कोर्लईचा हा दुर्ग! कोर्लई गावातून गडाला वेढा मारत एक रस्ता दक्षिणेकडे समुद्रकाठावर कोर्लई दीपस्तंभाकडे येतो. अलिबागच्या या अष्टागरमध्ये खांदेरी आणि कोर्लई या दोन किल्ल्यावर दीपस्तंभ आहेत. समुद्रावर स्वार झालेल्यांना रात्री हे दीपस्तंभच त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण अशा प्रकाशझोतांनी दिशादर्शन करत असतात. हा प्रत्येक प्रकाशझोत विशिष्ट पद्धतीचा असतो आणि तोच त्याचा पत्ताही! यावरूनच दर्यावर्दी त्यांच्या दिशा, स्थळ, मार्ग ठरवतात. हे दीपस्तंभ आणि त्यांचे कार्य नाममात्र शुल्क भरून पाहता येते. इथे कोर्लईला ही सोय आहे. तेव्हा हा दीपस्तंभ जरूर पाहावा आणि मग गडाकडे निघावे.
उजव्या हाताला एका उंच टेकडीवर कोर्लई किल्ला, तर डावीकडे अथांग पसरलेला समुद्र! कोळीवाडय़ाची गजबज जाऊन एकदम आलेली शांतता या समुद्राच्या पुन्हा प्रेमात पाडते. या दीपस्तंभाकडून एक पायरीमार्ग गडावर चढतो. याशिवाय गडावर जाण्यासाठी आणखीही तीन प्रवेशमार्ग आहेत, पैकी दोन तळातील माचीकडून तर एक उत्तरेकडील कोर्लई गावातून थेट बालेकिल्ल्यात येतो. दीपस्तंभाकडून आलेल्या वाटेने पंधरा-वीस मिनिटांत आपण गडाच्या मधल्या भागात पोहोचतो. हा किल्ला म्हणजे एखादी अरुंद सरळसोट माचीच आहे. जवळपास किलोमीटरभर लांबी आणि अवघी २७ मीटरची रुंदी असलेला हा आयताकृती पट्टा. पश्चिमेकडे समुद्रात शिरलेल्या एका टोकापासून ते पूर्वेकडे उंच होत गेलेल्या पर्वतापर्यंत कोर्लईचा हा गड वर चढत गेलेला आहे. या आडव्या भागात पुन्हा काही ठरावीक टप्प्यावर आडव्या भिंती-दरवाजे घालत या किल्ल्याचे तब्बल नऊ भाग केले आहेत. यातील पहिले तीन-चार भाग म्हणजे गडाच्या माचीचाच भाग, तर उर्वरित बालेकिल्ला म्हणावा लागेल. अगदी तळातील भागापासून कोर्लईचे हे दर्शन सुरू होते. गडाचा हा समुद्राकडील तळाचा भाग समुद्राचे पाणी पित बसलेला असतो. काठावरच्या चार दिशांना बांधलेल्या चार बुरुजांनी जणू वरून धावत आलेल्या या तटाला वेसण घातली आहे. या माची-धक्क्यावरच कोर्लई किल्ल्याची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. या पर्वताला पूर्वी ‘चौलचा खडक’ असे म्हणत. चौल-रेवदंडय़ात राज्य करणाऱ्या पोर्तुगीजांना आपले राज्य सुरक्षित करण्यासाठी या पर्वतावर गड बांधण्याची गरज निर्माण झाली. त्यासाठी इसवी सन १५२९ मध्ये त्यांचे गव्हर्नर दि योगु लोपीश दि सिकैर याने तशी अहमदनगरच्या निजामशहाकडे परवानगी मागितली. यानुसार त्यांनी इथे ही माची, त्यावर त्यांच्या क्रुसाची बातेरी ऊर्फ सांताक्रुझची उभारणी केली. पण पुढे पोर्तुगीज आणि निजामशाहीचे बिनसले आणि किल्ल्याचे काम अर्धवट राहिले. पुढे पोर्तुगीजांचा वाढता धोका ओळखून निजामशहानेच १५९२ मध्ये इथे हा जलदुर्ग उभारला आणि त्याला ‘बुरहान दुर्ग’ असे नावही दिले. हे एवढय़ावरच थांबले नाही, तर १३ सप्टेंबर १५९४ रोजी या दुर्गावरूनच पोर्तुगीज आणि निजामशाहीत संघर्ष उडाला. यामध्ये निजामशाहीचा पराभव झाला आणि गडाचा ताबा  पोर्तुगीजांकडे आला. पोर्तुगीजांचा हा कालखंड प्रदीर्घ असल्यामुळे या दुर्गाच्या स्थापत्यावरही मग त्यांचा प्रभाव पडला. शिवकाळातही हा गड त्यांच्याकडेच होता. ऑगस्ट १६८३ मध्ये छत्रपती संभाजीमहाराजांनी एकदा हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला होता, पण तो अयशस्वी ठरला. पुढे मार्च १७३९ मध्ये चिमाजी अप्पांनी शेजारच्या तळगडाचा हवालदार सुभानजी माणकर यांच्या मदतीने कोर्लई मिळवला आणि मराठय़ांचा जरीपटका गडावर फडफडू लागला. यानंतर इंग्रजांबरोबरच्या शेवटच्या युद्धापर्यंत हा गड मराठय़ांकडेच होता.
कोर्लईची तळातील माची चार खणखणीत बुरूज बांधून बंदिस्त केलेली आहे. इथेच गडावर येण्यासाठी दोन दरवाजेही आहेत. सैनिकांच्या खोल्या, दारूगोळय़ाचे कोठार, तटावरील चार तोफा इथे दिसतात. यानंतर जसजसे वर जावे तसे गडाचे एकेक टप्पे उलगडत जातात. या प्रत्येक टप्प्याला विभागणारी एक अंतर्गत भिंत आणि दरवाजा आहे. यातील काही दरवाजांवर पोर्तुगीज भाषेतील शिलालेखही आहेत. या लेखांशिवाय, वेगवेगळय़ा आकारांतील तोफा, पाण्याचे हौद, टाक्या, कोठारे, चर्च, महादेवाचे मंदिर, चौथरे असे एकेक दुर्गावशेष दिसू लागतात. यातील आठव्या टप्प्यावरच गडाचा तो उत्तरेकडील दरवाजाही येऊन मिळतो. पोर्तुगीज बांधणीचे तट-बुरूज आणि त्यांच्या संस्कृतीतल्याच अन्य अवशेषांनी एका वेगळय़ा जगात जायला होते. एका परकीय साम्राज्याच्या या पाऊलखुणा पाहात शेवटच्या टोकावर आपण येतो. इथून तळात सुमद्रापर्यंत उतरलेला तो गड नजरेत येतो आणि मग त्याची व्याप्ती आणि धास्ती मनात ठसते. दो कु टो नावाच्या एका पोर्तुगीज माणसाने या किल्ल्याचे त्या वेळी लिहून ठेवलेले वर्णन आहे, ते असे,.. ‘हा किल्ला खूपच भव्य असून त्यावर फक्त जमिनीकडूनच हल्ला चढविणे शक्य आहे. समुद्र आणि खाडी यांच्यामध्ये एक खंदक असून, त्याच्यावरील पूल काढला की किल्ला अभेद्य होतो. या खंदकाच्या आत भक्कम कोट असून त्याच्या प्रवेशद्वारावर एक भलामोठा ब्राँझचा सिंह आहे. त्याच्या खाली ‘माझ्याशी लढल्याशिवाय आत प्रवेश नाही’ अशा आशयाचा लेख आहे. किल्ल्याच्या माथ्यावर त्याचा बालेकिल्ला असून, त्याच्या शिखरावर एक गरुड पक्षी असून तेथेही ‘माझ्या तावडीतून उडणाऱ्या माश्यांशिवाय कुणाचीही सुटका नाही ’ असे दपरेक्तियुक्त वचन कोरलेले आहे.’
..आज शेकडो वर्षे उलटली, पण कोर्लईच्या या टोकावर उभे राहिले की या वर्णनातील धाक आजही अंगावर काटा उभा करतो.
abhijit.belhekar@expressindia.com

Rainy Weather, unseasonal rain, Delights Wildlife, Tadoba Andhari Tiger Project, Bears Spotted Carrying Cubs, Bears Spotted Carrying Cubs on Their Backs, marathi news, tadoba news, andhari news, viral video,
VIDEO: अस्वलाने पिल्लाला बसवले पाठीवर आणि घडवली जंगलाची सैर…हृदयस्पर्शी व्हिडीओ एकदा बघाच….
Dubai Floods Tesla boat-mode? Dubai hit by two years' worth of rain in a single day
Dubai Flood: दुबईच्या महापुरातही टेस्ला गाडीनं केली कमाल; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?