‘खरेमास्तर’ या विभावरी शिरूरकरांच्या पुस्तकातले खरेमास्तर मला फार भावतात. मुली शिकत नसत त्या काळात, घोडनदीसारख्या ठिकाणी आपल्या मुलींना मुलांच्या शाळेत घालणारे. शिकून शहाणं होणं म्हणजे केवळ लिहायला-वाचायला येणं, इतकीच मर्यादित शिकण्याची व्याख्या न ठेवता मुलींच्या सर्वागीण विकासावर भर देणारे. त्यासाठी मुलींना दररोज धावायला नेणारे. मुलीला सायकल शिकवणारे खरेमास्तर. सुमारे शंभर वर्षांपूर्वीच्या या चित्रापासून आता आपण खूप खूप पुढे आलो आहोत. एखादी गोष्ट केवळ मुलीने केली, म्हणून त्याचं कौतुक करण्याच्या पलिकडे आलो आहोत. कारण आता मुलगी म्हणून असलेली कोणतीही मर्यादा मुलींना काहीही करायला रोखू शकत नाही. साहसी क्रीडा प्रकारांमध्ये गेल्या काही वर्षांत पुढे आलेल्या मुलींची यादी बघितली, तर याची खात्री पटते. पॅरा जिम्पगमध्ये नवनवीन उच्चांक प्रस्थापित करणारी दोन ध्रुवांची राणी शीतल महाजन असेल, एव्हरेस्टकन्या कृष्णा पाटील असेल, आयर्न मॅन पाठोपाठ अल्ट्रामॅन सारखी रेस पूर्ण करणारी एकमेव आशियाई खेळाडू ठरलेली अनु वैद्यनाथन असेल, अवघी १७ वर्षांची ग्रीनलँडमध्ये स्कीइंग करणारी, जगातली सर्वात तरुण स्कीअर दीया बजाज असेल, सर्वाच्या परिचयाची सागरकन्या रूपाली रेपाळे असेल.. अशी कित्येक नावं सांगता येतील. या सर्व मुली जगभरातले तयारीचे साहसी खेळाडू, ट्रेकर्स, गिर्यारोहक, ट्रायथलीट्स यांच्या समोर मदानात ताकदीने केवळ उतरल्याच नाहीत, तर त्यांनी नवीन विक्रमही प्रस्थापित केलेत. या क्षेत्रात मुलींनी यावं की नाही या अगदी प्राथमिक प्रश्नाला या सर्वच मुलींनी अगदी चोख उत्तर दिलेलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं पाहाता, साहसी क्रीडा प्रकार किंवा एन्ड्युरन्स स्पोर्ट या क्षेत्रांचा विचार केला, तर त्यासाठी आवश्यक असणारी अनेक कौशल्य आणि स्वभावविशेष मुलींकडे असतात. त्यामुळे या क्षेत्रामध्ये मुली ताकदीने पाय रोवू शकतात. ही गोष्ट मला अनुभवावरून सांगता येईल. मुळात, या सर्व क्रीडा प्रकारांकरिता शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त असणं जितकं गरजेचं आहे, तेवढंच किंबहुना काही वेळा त्याहून अधिक गरजेचं आहे, मानसिकदृष्टय़ा तंदुरुस्त असणं. अनेक दिवस चालणाऱ्या मोहिमा असतील, किंवा आयर्न मॅनसारख्या मोठय़ा पल्ल्याच्या शर्यती असतील किंवा विमानामधून मारण्याची उडी असेल. मनाची तयारी सर्वाधिक महत्त्वाची. मी केलेल्या काही मोहिमांमध्ये अनेक वेळा केवळ या मनाच्या तयारीच्या जोरावर आणि अंगी असलेल्या चिवटपणाच्या जोरावर मुलींना यश मिळवताना पाहिलं आहे.
साहसी खेळ हे केवळ ‘थ्रिल’ नव्हे. रोजच्या जगण्यात क्षणा-क्षणाला कामी येणारे अनेक धडे शिकवारे हे एक विद्यापीठ आहे. एव्हरेस्ट सर केल्यावर कृष्णा पाटीलच्या मनात दाटलेल्या भावना, दक्षिण ध्रुवावर पहिली उडी मारल्यानंतर शीतलला आलेला अनुभव किंवा गोबीच्या वाळवंटाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचल्यानंतर माझ्या मनात गर्दी केलेल्या भावनांप्रमाणेच! खरेमास्तरांची मथु १०० वर्षांपूर्वी सायकल चालवायला लागली, तेव्हा तिच्या मनात आलेल्या भावनासुद्धा अशाच असणार. कदाचित म्हणूनच, असं असाध्य भासणारं काही कवेत आल्यानंतर या मुलींना कोणी थांबवू शकत नाही. कारण ते एकदा करून बघितल्यावर आलेला अनुभव पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटतोच. आयुष्यातलं कोणतंही आव्हान स्वीकारण्यासाठी एक कमालीचा आत्मविश्वास यामधून येतो.
मॅरेथॉन्समध्ये धावणाऱ्या बिपाशा बासू आणि गुल पनांगबद्दल अनेक वेळा बोललं जातं. आपल्या व्यस्त आयुष्यातून स्वतसाठी वेळ काढून, स्वतची आवड जोपासल्याबद्दल, त्यांच्या क्षमतेबद्दल त्यांचं कौतुक होतं. पण माझ्या आजूबाजूला मी हल्ली अशा अनेक मुलीं बघते. पुणे विद्यापीठाच्या आवारात दर रविवारी सकाळी आपापल्यासाठी एक टारगेट ठरवून मॅरेथॉनची तयारी करणाऱ्या, एन्डय़ुरो ३ सारख्या शर्यतीची तयारी करणाऱ्या कित्येक मुली दिसतात. मला हे चित्र खूप सकारात्मक वाटतं. मुलींच्या अंगी असलेल्या अंगभूत मानसिक चिवटपणाला आणि कष्ट घेण्याच्या तयारीला पूरक अशा या खेळांमध्ये जाण्यासाठी आता अनेक मुली तयार होताहेत. गरज आहे ती आता पालक आणि समाजाने सकारात्मक होण्याची!

मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi womens outstanding achievements in adventures sports
First published on: 05-03-2015 at 07:18 IST