दिवसभराची भटकंती करत नांदुरीत आलो. नांदुरीतून सापुताऱ्याला जाणारा फाटा आहे. या फाटय़ावरून वळालो की पाच- सात किलोमीटरनंतर एक छोटा चढ आहे. या चढाच्या शेवटी उजवीकडचा रस्ता अभोणा तर डावीकडचा मोहनदरी गावात गेला आहे. याच फाटय़ावरून डावीकडे मोहनदरी गावाकडे वळताना एका झाडाखाली शेंदूर लावलेल्या काही वीरगळ दिसतात. पुढे डावीकडे खालच्या बाजूला गेलेला रस्ता मोहनदरी गावात तर उजवीकडचा रस्ता मोहनदरच्या आश्रमशाळेपाशी जाऊन थांबतो. मोहनदरी किल्लय़ाची चढण या आश्रमशाळेपासूनच होते. आश्रमशाळेत पोहचलो तेव्हा रात्रीचे पावणेबारा वाजले होते. आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्याने आम्हाला व्हरांडय़ात जागा करून दिली आणि सकाळच्या चहाचं आमंत्रण देऊन निघून गेला. अंथरूणाला पाठ टेकताक्षणीच आजचा दिवस एखाद्या ‘कॅलिडोस्कोप’ सारखा आठवू लागलो. आकाराने छोटा असूनही अनेक अप्रतिम वास्तुशिल्प उराशी जपलेला हा गड. अचला किल्लय़ावरून तौला शिखराचं दिसणारं रौद्रसुंदर रूप. कण्हेरगडावर साक्षात भेटलेला रामाजी पांगेरा आणि सप्तश्रुंगी देवीचं अनपेक्षित पण अविस्मरणीय दर्शन! ..सह्याद्रीच्या कुशीतला एक दिवस सत्कारणी लागला होता.
दिवस उजाडला. काल रात्री धुक्यात पूर्णपणे बुडालेला मोहनदरी किल्ला सकाळच्या कोवळ्या उन्हात लख्ख चमकत होता. त्याचं ते भलंमोठं नेढंही आता जागं झालं होतं. अप्रतिम चवीचा चहा घेऊन साडेसहा वाजता मोहनदरीची पायवाट तुडवू लागलो. नेढय़ाच्या डावी-उजवी दोन्हीकडे कातळकडा आहे. उजव्या कातळकडय़ावर पाण्याची टाकी असून डावीकडच्या कातळकडय़ावर कसलेही अवशेष नाहीत. गावातून निघालो की आधी पाण्याची टाकी बघून आपण नेढय़ाकडे जाऊ शकतो. मोहनदरी गावातून थेट नेढय़ात जायचं असेल तर एक तासभर पुरे. नेढय़ात जाण्यासाठी मळलेली अशी पाऊलवाट नसून तिथपर्यंत जाणाऱ्या चढावर अनेक ढोरवाटा फुटल्या आहेत. त्यामुळे त्यातली एखादी योग्य वाट निवडायची आणि नेढं गाठायचं.
मोहनदरीच्या या नेढयाची जागा मात्र लाजवाब आहे. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून उन्मत्तपणे आणि बेभान होऊ न वाहणारा वारा इथे बसूनच अनुभवावा! कधीच विसरता न येणारा अनुभव म्हणजे तुम्ही या नेढय़ात घालवलेले काही क्षण. नेढय़ात पोचण्यासाठी दहा बारा फुटांचा एक किंचित अवघड असा ‘पॅच’ आहे. तसंच नेढय़ाच्या वरच्या बाजूला मधमाश्यांची पोळी असल्याने इथे योग्य ती खबरदारी घेणं आवश्यकच आहे. मोहनदरी गावातून किल्लय़ाचं नेढं आणि त्यावरचा झेंडा दिसत असतो. नेढय़ात पोहोचल्यावर बाहेरचा दिलखुलास देखावा दिसू लागतो. धुक्यात बुडालेला सप्तश्रुंग आणि पायथ्याला मोहनदरी गाव सुरेख दिसत होते.
नेढयापासून किल्लय़ाच्या माथ्यावर जायचं असेल तर त्याच्या पायथ्यापासून गडाकडे गेलेल्या वाटेला जाऊन मिळायचे. मोहनदरीच्या माथ्यावरून दिसणाऱ्या बागलाण प्रदेशाचं दृश्य मात्र केवळ अवर्णनीय आहे. पलीकडच्या गावांमधील शेतं, त्यांची कौलारू घरं, चणकापूर धरण हा नजारा अप्रतिम! भान विसरून कितीतरी वेळ आम्ही ते दृश्य बघत होतो. मोहनदरी किल्लय़ाचा कातळकडाही या पठारावरून सुरेख दिसत होता. नशीब चांगलं असेल तर साल्हेर-सालोटया पर्यंतचा मुलुख दिसू शकतो. अवशेषांच्या आणि पुरेशा पुराव्यांच्या अभावामुळे मोहनदरीच्या या डोंगराला किल्ला म्हणावं की नाही याबाबतीत अभ्यासकांमध्ये अजूनही संभ्रम आहे. पण सह्य़ाद्रीच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या रांगांचं कमालीचं सुंदर दृश्य पेश करणारा ‘मोहनदरी’ मात्र आयुष्यात एकदा तरी अनुभवावा हे निश्चितच.
संपूर्ण ब्लॉगपोस्टसाठी – http://www.onkaroak.com/2013/06/blog-post_24.html

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: Mohandari fort in maharashtra
First published on: 10-12-2014 at 07:22 IST