गर्भश्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या मोक्षेश शेठ स्वत: चार्टर्ड अकांऊटंट आहे. संपत्ती त्याच्या पायाशी लोळण घेते पण ती केवळ मोह-माया आहे. जे सुख, जे समाधान मी शोधत आहे ते या संपत्तीत नाही असं मोक्षेशचं ठाम मत आहे म्हणूनच या २४ वर्षांच्या तरुणानं संपत्तीचा, वडिलोपार्जित व्यवसायाचा त्याग करून संन्यासाच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतल्या धनाढ्य कुटुंबात मोक्षेशचा जन्म झाला. या कुटुंबाचा जेके कॉर्पोरेशन ही कंपनी असून हिरेव्यापार, साखर तसेच धातूंच्या क्षेत्रात त्यांचे उद्योग आहेत. मुळचं गुजरातमधलं हे कुटुंब गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ मुंबईत राहत आहे. मुंबईतल्या प्रतिष्ठित महाविद्यालयातून त्यानं आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर वडिलांच्या सांगलीतील व्यवसायात मोक्षेश मदत करत होता. वयाच्या १५ व्या वर्षी दीक्षा घेण्याचा विचार त्यानं बोलून दाखवला होता. पण कुटुंबानं मात्र शिकून जगाचा अनुभव घेण्याचा सल्ला त्याला दिला.

मोक्षेश अभ्यासात हुशार आहे. त्यामुळे तो सीएची परीक्षा उत्तीर्ण झाला. वडिलांना व्यवसायात मदत करून लागला पण, व्यवसाय, संपत्ती यात त्याचं मन कधीच रमलं नाही. अखेर वयाच्या 24 व्या वर्षी त्यानं दीक्षा घेतली, मी या निर्णयानं खूश आहे. मला मोह- माया त्यागायची होती अशी प्रतिक्रिया त्यानं ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना दिली. मोक्षेशच्या कुटुंबात दीक्षा घेणारा तो पहिलाच पुरुष आहे. याआधी त्याच्या घरातील पाच महिलांनी दीक्षा घेतली होती.

– गेल्यावर्षी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुजरातमधल्या वर्शील शाहनंदेखील दीक्षा घेतली होती. वर्शीलला बारावीत ९९% टक्के गुण मिळाले होते. ‘बारावीत ९९ टक्के मिळवूनही मला आनंद झाला नाही पण अध्यात्मचा मार्ग मला आनंद मिळवून देईल’ अशी भावना व्यक्त करत संन्यासी होण्याचा धाडसी निर्णय १७ वर्षांच्या मुलानं घेतला होता.

– सुरतमधल्या हिरे व्यापाराचा १२ वर्षीय मुलगा भाव्या शाहनं देखील या आठवड्यात दीक्षा घेतली.‘देवानं दाखवलेल्या सत्याच्या मार्गावर चालण्याचा निर्णय मी घेतला आहे’, अशी प्रतिक्रिया भाव्यानं एएनआयला बोलताना दिली.

– सप्टेंबर २०१७ मध्ये सूरतमधल्या गर्भश्रीमंत सुमीत आणि अनामिका रोठोडनं कोट्यवधीची संपत्ती त्यागून दीक्षा स्वीकारली होती. त्यांना ३ वर्षांची मुलगी देखील आहे तिचा सांभाळ आता त्यांचे कुटुंबिय करत आहे.

– जानेवारी २०१८ मध्ये आयआयटी बॉम्बेमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या आणि १२ लाख वार्षिक पगार असलेल्या संकेत पारेख यानंदेखील दीक्षा घेतली होती.