चोरांच्या बावळटपणाचे अनेक किस्से बातम्यांमधून वाचायला तर सीसीटीव्हीमधून पहायला मिळतात. चोरी करतानाही डोकं वापरावं लागतं हे अशा चोरांना पाहिल्यावर लक्षात येतं. चोरांना कधी त्यांचा बावळटपणा तर कधी त्यांची एक छोटीशी चूक पकडून देते. असंच काहीसं झालं अमेरिकेमधील एका चोराबरोबर. पोलिसांपासून लपलेला असताना अचानक पोटाने दगा दिला अन् पादण्याचा आवाज आल्याने पोलिसांना त्याचा ठाव ठिकाणा लागला.

खरं तर अमेरिकेमध्ये चोराच्या शरीराच्या वासावरुन त्याला पकडण्यासाठी केनाईन या यंत्राचा वापर केला जातो. मात्र मिसूरी येथील पोलीस खात्याला एका चोराला शोधताना या यंत्राची गरजच पडली नाही. झालं असं की लिबर्टी पोलीस स्थानकाच्या अंतर्गत येणाऱ्या परिसरामधील एका व्यक्तीविरोधात अटक वॉरंट जारी झाले. चोरी आणि बंदी असणारे पदार्थ बाळगल्याप्रकरणी हे अटक वॉरंट जारी झाले होते. तो मागील अनेक दिवसांपासून पोलिसांपासून लपत होता. मात्र नुकतेच पोलीस त्याला ताब्यात घेण्यासाठी तो राहत असलेल्या परिसरात गेले असता तो जागेवर नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घराच्या आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध सुरु केला. पोलीस येण्याआधीच लपून बसलेल्या या व्यक्तीच्या बुद्धीने त्याला साथ दिली मात्र शरीराने मौक्याच्या क्षणी धोका दिला. पोलीस शोध घेत असतानाच पोटातून आवाज येऊ लागले अन् हा व्यक्ती जोरात पादला. त्यामुळे इतका मोठा आवाज झाला की पोलिसांना तो कुठे लपून बसला आहे हे लगेच समजले अन् त्याला अटक करण्यात आली. मिसूरी पोलिसांनी स्वत:च्या फेसबुक पेजवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.

चोरांनी अशाप्रकारे बावळटपणा करण्याची ही काही पहिली वेळ नाही. तीन वर्षांपूर्वी २०१६ साली आसाममधील काही चोरांनी एटीएममध्ये घुसखोरी करुन पैसे मिळवण्यासाठी मशीन चोरले. मात्र नंतर ते नोटा ठेवतात ते एटीएम मशीन नसून पासबुक प्रिटींगचे मशीन असल्याचे लक्षात आले.