अनेकदा कर्मचारी ऑफिसमध्ये ओव्हरटाइम करत आपल्या बॉसला खूश करण्याचा प्रयत्न करत असतात. अनेकजण तर या नादात आपल्या सुट्ट्यांचाही बळी देऊन टाकतात. अनेक छोटे व्यवसायिक तसंच व्यापारी जास्तीत जास्त नफा मिळावा यासाठी आठवड्याचे सातही दिवस काम करत असतात. पण फ्रान्समध्ये आठवड्यातील एकही दिवस सुट्टी न घेता काम केल्यामुळे एका बेकरी व्यवसायिकाला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. फ्रान्समध्ये सुट्टी न घेता काम करणे कायद्याने गुन्हा आहे, त्यामुळेच हा दंड ठोठावण्यात आला आहे. फ्रान्समध्ये तुमता स्वत:चा व्यवसाय असो किंवा कोणतंही काम करत असा तुम्ही आठवड्यातून एक सुट्टी घेणं अनिवार्य आहे.

सेड्रिक वेवर असं या व्यक्तीचं नाव असून त्यांची लेक बेकी नावाच्या पर्यटन स्थळाजवळ बेकरी आहे. ग्राहकांकडून येणा-या मोठ्या मागणीमुळे सेड्रिक यांनी सातही दिवस आपली बेकरी चालू ठेवली होती. प्रशासनाने हे स्थानिक कामदार कायद्याचं उल्लंघन असल्याचं सांगत सेड्रिक यांना तीन हजार युरो म्हणजे जवळपास २ लाख ४० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

प्रशासनाकडून करण्यात आलेल्या या कारवाईचा अनेक व्यापा-यांनी विरोध केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या छोट्या पर्यटनस्थळांवर जास्त स्पर्धा नसते. अशा परिस्थितीत इतक्या कडक नियमांची काही गरज नाही. अनेक स्थानिक व्यवसायिक आपल्या उदरनिर्वाहासाठी पर्यटकांवर अवलंबून आहेत.