वातावरणातील बदलाचे परिणाम जगभरामध्ये दिसू लागले आहेत. अंटार्क्टिकामधील बर्फांच्या पांढऱ्या डोंगरांवर हिरवा बर्फ पडल्याचे वृत्त समोर आलेलं असतानाच आता इटलीमधील आलप्स पर्वतांवरील काही भागांमध्ये गुलाबी रंगाचा बर्फ आढळून आला आहे. वैज्ञानिकांच्या सांगण्यानुसार एका विशिष्ट प्रकारच्या शेवाळामुळे बर्फाला गुलाबी रंग आला आहे. मात्र हे शेवाळ इटलीमध्ये कसं आलं यासंदर्भात कोणतीही ठोस माहिती सध्या उपलब्ध नाही. वैज्ञानिकांनी व्यक्त केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार वातावरणातील बदलांमुळे बर्फाचा रंग गुलाबी होत आहे. या बर्फाचा रंग गुलाबी का पडला आहे यासंदर्भातील तपास करण्याचे आदेश इटली सरकारने दिल्याचे वृत्त एएफपी या वृत्त संस्थेने दिलं आहे.

बर्फ गुलाबी होण्यासंदर्भातील संशोधन करण्याचा इटलीमधील यंत्रणेचा प्रमुख उद्देश नसून ज्या शेवाळामुळे बर्फ गुलाबी पडत आहे ते शेवाळ इटलीमध्ये कसं आणि कुठून आलं यासंदर्भातील माहिती गोळा करण्यात येत आहेत. हे शेवाळ यापूर्वी इटलीमध्ये कधीच आढळून आलेलं नाही. तसेच हे इटलीमध्ये आढळून येणं ही आश्चर्याची गोष्ट असल्याचे देशातील राष्ट्रीय संशोधन संस्थेनं म्हटलं आहे. संशोधक बियाजियो दी मौरो यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेसेना ग्लेशियरच्या अनेक भागांमधील बर्फ गुलाबी पडला आहे. हे शेवाळ ग्रीनलॅण्डमध्ये सापडते. मात्र हे इटलीमध्ये कसं आलं हे सध्या सांगणं कठीण आणि तितकचं आश्चर्यचकित करणारं आहे, असं मौरो म्हणाले. या शेवाळामुळे कोणताही धोका नाहीय. मात्र या शेवाळामुळे बर्फ वितळण्याचा कालावधी कमी होऊन तो लवकर वितळू लागेल असा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. सामान्यपणे पांढऱ्या बर्फावरुन सुर्याची किरणे परावर्तित होतात. मात्र रंग बदलल्यानंतर बर्फ सुर्याची किरणे शोषून घेतो. त्यामुळे शेवाळ असल्यास बर्फ वेगाने वितळतो. या शेवाळाचे नाव अॅनक्लोनेमा नॉर्डेन्सीओयडली (Ancylonema nordenskioeldii) असं आहे.

अंटार्क्टिकात आढळला होता हिरवा बर्फ

अंटार्क्टिकामध्ये काही दिवसांपूर्वी अनेक ठिकाणी हिरवा बर्फ आढळून आला होता. अनेक वैज्ञानिकांनी यासाठी शेवाळ जबाबदार असल्याचे म्हटलं होतं. अंटार्क्टिकामध्ये बऱ्याच काळापासून हे शेवाळ आढळून येत आहे. मागील काही वर्षांमध्ये या शेवाळाचे प्रमाण वाढल्याचं वैज्ञानिक सांगतात. त्यामुळेच डोंगरांवरील बर्फाचा रंग बदलून हिरवा होत असल्याचं सांगण्यात येत आहे.

रॉयटर्सच्या एका वृत्तानुसार वैज्ञानिक सध्या या शेवाळाचे प्रमाण का वाढत आहे यामागील कारणांचा तपास करत आहे. हे शेवाळ भविष्यात वेगाने वाढण्याची शक्यता असल्याने त्याच्या उत्पत्तीसंदर्भात जास्तीत जास्त माहिती गोळा करण्याचे काम वैज्ञानिकांनी सुरु केलं आहे. हे शेवाळ हवेतील कार्बनडाय ऑक्साइड शोषून घेते. केवळ हिरव्याच नाही तर लाल आणि नारंगी रंगाच्या शेवाळासंदर्भातही संशोधन सुरु आहे.