हा फोटो बघून तुम्हाला काही आठवलं का? नक्कीच आठवलं असेल. या फोटोतल्या नववधुला आपण विसरु तरी कसं शकतो, मे महिन्यात सोशल मीडियावर ती चांगलीच गाजली होती. सियाच्या ‘चिप थ्रिल्स’वर बिंधास्त नाचणाऱ्या या नवऱ्यामुलीच्या ‘बोल्ड आणि ब्युटीफुल’ अंदाजानं सगळ्यांना वेड करून सोडलं होतं. आता भारतीय नववधू म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर उभी राहते ती नखशिखान्त नटलेली, डोक्यावर पदर घेतलेली, थोडीशी लाजरी मुलगी. पण या नववधूने साऱ्या संकल्पनाच बदलल्या म्हणूनच की काय अनेकांना तिचा बोल्ड अंदाज जास्तच पसंतीस पडला, पण काहीजण असेही होते ज्यांना मात्र ती अजिबात आवडली नाही. तेव्हा ती जेवढी प्रसिद्ध झाली तेवढीच ती ट्रोल देखील झाली.

ब्लाऊज आणि त्यातून हॉट पँट घालून नाचणाऱ्या या नववधूचा बंडखोर स्वभाव अनेकांना रुचलाच नाही, तेव्हा अनेकांनी कमेंटच्या माध्यमातून तिच्यावर अत्यंत वाईट शब्दात तिच्यावर टीका केल्या. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी ती समोर आली. तेव्हा ही कोण आहे हे जाणून घेण्याची इच्छा तुम्हालाही असेल तर तिचं नाव आहे अमिशा भारद्वाज.

‘क्विंट’ला दिलेल्या मुलाखतीत तिला दोन महिन्यात जे काही ऐकावं लागलं त्यावर ती उघडपणे बोलली. ती संस्कारी नाही, भारतीय संस्कृतीचं नाव तिनं बदनाम केलं, कुटुंबियांची अब्रू घालवली अशाप्रकारच्या टीका तिच्यावर करण्यात आल्या. इतकंच कशाला तिच्या सासूनं हे सारं खपवून तरी कसं घेतलं? अशा अनेक कमेंट तिच्या व्हिडिओवर आल्या. अर्थात याचा सुरूवातीला तिला त्रासही झाला पण या सगळ्यात अमिशाची सासू तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली. ‘माझ्या सूनेनं असा अशा प्रकारे डान्स केला तर मला यात काहीच गैर वाटलं नाही. जर असंच माझ्या मुलीनं केलं असतं तर मी तिला हटके काहीतरी करायला परवानगी दिलीच असती मग सूनेला तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी परवानी का नाकारावी? तिच्यावर काहीजणांनी टीका केली पण अनेकांना हा व्हिडिओ आवडला देखील. तेव्हा लोकांना काय वाटतं याचा विचार आम्ही का करत बसावा ‘ असं तिची सासू क्विंटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

‘हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं कारण होतं ते काही लोकांची संकुचित मानसिकता. भारतीय वधू असे कपडे घालून कशी नाचू शकते असं त्यांना वाटलं म्हणूनच अशा लोकांनी हा व्हिडिओ जास्त व्हायरल करायला सुरूवात केली. पण मला अशा लोकांना एकच सांगावसं वाटतं की ते माझं लग्न होतं, तेव्हा माझ्या लग्नात मी काय करावं, काय घालावं हा सर्वस्वी माझा निर्यण होता त्यावर इतरांनी आक्षेप घेण्याचं कारण काय?, प्रत्येकाला आपल्यापरिनं आपलं लग्न एन्जॉय करण्याचा हक्क आहे. ते मीही केलं त्यावर ट्रोल करण्याची काहीच गरज नाही असंही सडेतोड उत्तर तिनं दिलं. मे महिन्यात युट्यूबवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ आतापर्यंत ८८ लाख लोकांनी पाहिला.