महानायक अमिताभ बच्चन यांच्यासंदर्भात नानावटी रुग्णालयाने अमिताभ यांच्या प्रकृतीसंदर्भातील माहिती दिली आहे. रुग्णालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार अमिताभ बच्चन यांच्यामध्ये करोनाचा हलकी लक्षणं दिसत असून त्यांना रुग्णालयातील आयसोलेशन युनिटमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे अमिताभ स्वत: ट्विवटवरुन आपल्या आरोग्यासंदर्भात माहिती देत राहतील असं त्यांनी सांगितल्याचे रुग्णालाने स्पष्ट केलं आहे. सीएनबीसीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. अमिताभ मुलगा अभिषेक बच्चन यांना दोघांनाही करोनाची लागण झाल्याचे शनिवारी रात्री उशीरा स्पष्ट झालं. दोघांनाही आपआपल्या ट्विटर हॅण्डलवरुन यासंदर्भातील माहिती दिली. यानंतर ट्विटवर अमिताभ यांना या आजारामधून लवकर बरं होण्यासाठी अनेकांनी प्रार्थना केली असून अमिताभ आणि अभिषेकला गेट वेल सूनच्या शुभेच्छा दिल्या आहेत. असं असतानाच अमिताभ यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये ते नानावटी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धन्यवाद देताना दिसत आहेत.

अमिताभ आणि अभिषेक यांना ज्या नानावटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे त्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी अमिताभ यांनी २० मे रोजी एक आभार मानणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये अमिताभ यांनी नानावटी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी करोनाविरोधात यशस्वीपणे लढा देत असल्याचं सांगत त्यांचं कौतुक केलं. मी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसमोर त्यांच्या सेवेसाठी नतमस्तक होतो असंही या व्हिडिओमध्ये अमिताभ यांनी म्हटलं आहे.

पाहा फोटो >> BMC च्या कर्मचाऱ्यांनी हाती घेतलं ‘जलसा’च्या सॅनिटायझेशनचं काम

सध्याचा काळ हा थोडा निराशाजनक आहे. अशा काळात रुग्णालयांमध्ये काम करणारे लोकं हे देवाचे रुप आहे असंही अमिताभ यांनी या व्हिडिओत म्हटलं आहे. याच व्हिडिओत अमिताभ यांनी गुजरातमधील एका फलकाचा फोटो शेअर केल्याचीही आठवण करुन दिली. “मी काही दिवसांपूर्वी गुजरातमधील एक सूरत येथील एक बिलबोर्ड शेअर केला होता. त्यावर लिहिलं होतं की तुम्हाला ठाऊक आहे मंदीर का बंद आहेत. कारण देव पांढरा कोट चढवून रुग्णालयामध्ये काम करत आहे,” असं अमिताभ या फलकाबद्दल बोलताना म्हणाले होते.

“मी सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसमोर नतमस्तक होतो कारण तुम्ही नसता तर माणुसकी कुठे गेली असती,” असं म्हणत अमिताभ यांनी सर्व डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केलं होतं. अमिताभ यांनी या व्हिडिओमध्ये नानावटी रुग्णालयामध्ये मी उपचारासाठी जातो तेव्हा मला योग्य प्रकारे उपचार मिळतात असं म्हटलं होतं.

अमिताभ यांनी गेल्या काही दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना करोनाची चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे. कुटुंबीय आणि कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली असल्याचं अमिताभ यांनी सांगितलं आहे. अमिताभ यांनी स्वत:च त्यांच्या आरोग्यासंदर्भात चाहत्यांना माहिती देण्याचा निर्णय घेतल्याने त्यासंदर्भात रुग्णालयाने माहिती जारी केली नसल्याचे रुग्णालयातील एका डॉक्टरने स्पष्ट केलं आहे.