सोशल नेटवर्किंगवर सध्या एका अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका बाईकवरील तरुण अपघातामधून अगदी थोडक्यात कसा बचावतो हे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून आता हाच व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओवर महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे. या अपघातात एक जेसीबी आणि एका बोलेरो गाडीची धडक होत असल्याने महिंद्रा यांनी गाडीसंदर्भात टीप्पणी करताना या व्हिडिओवर प्रतिक्रिया नोंदवली आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जेसीबी मशीन आणि बुलेरोचा अपघात झाल्याचे दृश्य दिसत आहे. महामार्गावरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या जेसीबी चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि तो विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये आला. तितक्यात समोर येणारी बोलेरो गाडी या जेसीबीला धडकली. बोलेरोचा वेग तसा बऱ्यापैकी असल्याने गाडी काही जेसीबीला आदळल्यानंतर मागे फेकली गेली. मात्र ही बोलेरोमध्ये आल्यानेच रस्त्याच्या पलिकडे उभा असणाऱ्या दुचाकीस्वाराचा जीव वाचल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला बाईकजवळ उभा असलेल्या तरुण कोणाची तरी वाट बघताना दिसत आहे. इतक्यात जेसीबी त्याच्या दिशेने येऊ लागतो. तो तरुण बाईकवरुन उतरण्याच्या तयारीत असतानाच समोरुन बोलेरो येते आणि जेसीबीला धडकते. त्यामुळे जेबीसी  बाईककडे येण्याऐवजी उजवीकडे वळतो. या बोलेरोची हलकीशी धडक लागल्याने तरुण बाईकसहीत खाली पडतो. मात्र  किरकोळ जखम झाल्यासारखा तो उठून पॅण्ट झटकतो आणि चालू लागतो.

महिंद्रा म्हणतात…

या व्हायरल व्हिडिओमध्ये बोलेरोमुळे तरुणाचे प्राण वाचल्याचे दिसत असल्याने महिंद्रांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. “बोलेरोकडे बघून असं वाटतं आहे की जणू ती एखाद्या जिवंत गोष्टीप्रमाणे वागली. मोटरसायकलवरील व्यक्तीला वाचवणे हाच बोलेरोचा उद्देश असल्यासारखं वाटत आहे,” असं ट्विट महिंद्रा यांनी केलं

महिंद्रांनी ट्विट केल्यानंतर अवघ्या दीड तासात या व्हिडिओ अडीच हजारहून अधिक जणांनी रिट्विट केलं असून २० हजार जणांनी ट्विट लाइक केलं आहे.