सोशल नेटवर्कींगवर सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या भारतीयांपैकी एक नाव म्हणजे महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा. फोटोंना कॅप्शन देण्याचे आवाहन करण्यापासून ते क्रिकेटच्या समान्यांबद्दल आणि व्हॉट्सअपवरील मेसेजपासून ते मदतची घोषणा करण्यापर्यंत अनेक गोष्टी आनंद महिंद्रा ट्विटरवरुन करतात. अनेकदा त्यांनी मांडलेल्या मतांवरुन सोशल नेटवर्किंगवर चर्चा रंगताना दिसते. कधीतरी ते नेटकऱ्यांसाठी भन्नाट कॅप्शन द्यासारख्या छोट्या स्पर्धा भरवून मिनिएचर कार्स भेट देतात तर कधी एखाद्या गोष्टीसंदर्भात ते नेटकऱ्यांकडून मदत मागतात. अशीच एक मदत त्यांनी नुकतीच नेटकऱ्यांकडून मागितली आहे.

महिंद्रा यांनी एक फोटो शेअर करुन नेटकऱ्यांकडे मदत मागितली आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी हा फोटो मला बहिणीने पाठवला असल्याचे म्हटले आहे. ” याला पुरवा म्हणा किंवा अनपेक्षित भेट देणाऱ्या पाहुण्याचे निशाण म्हणा पण हा फोटो मला माझ्या बहिणीने पाठवला आहे. (कर्नाटकमधील) कोडागू येथील कुट्टामध्ये असणाऱ्या आमच्या कुटुंबाच्या मालकीच्या कॉफीच्या शेताजवळ हे दिसून आले. वाघीण माझ्या नातेवाईकांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला आली होती असं दिसत आहे. इथे कोणी पंजाचे ठसे ओळखणारे तज्ज्ञ आहेत का?,” असं आनंद महिद्रांनी ट्विट केलं आहे. या ट्विटबरोबर त्यांनी चिखलामध्ये एका प्राण्याच्या पंजाचा ठसा असणारा फोटो शेअर केला आहे.

नेहमीप्रमाणे महिंद्रांच्या चाहत्यांनी यावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी हा पंजा वाघिणीचा असल्याचे म्हटले आहे.

तर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये काम करणारे आणि ट्विटरवर सक्रीय असणाऱ्या सुशांत नंदा यांनी हा पंजा बिबट्याचा असल्याचे मत व्यक्त केलं आहे.

यापैकी एक ट्विट रिट्विट करुन आनंद महिंद्रांनी यावरुन हे ठसे वाघिणीचे असल्याचे दिसत आहे असंही म्हटलं आहे.

आता महिंद्रांच्या या ट्विटवरुन त्यांच्या शेतात आलेला प्राणी नक्की कोणता होता याचा अंदाज बांधत आहेत. महिंद्रा यासंदर्भात नंतर अपडेट कळवतील असंही काहींनी या फोटोवर कमेंट करताना म्हटलं आहे.