महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे कायमच चर्चेत असतात. आता ते पुन्हा चर्चेत आले आहेत त्यांनी व्यक्त केलेल्या एका आगळ्या वेगळ्या इच्छेमुळे. त्यांनी एका ३९ वर्षीय व्यक्तीला गाडी भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कारण या व्यक्तीने केलेले काम महिंद्रा यांना इतके भावले आहे की त्यांनी ट्विट करुन ‘मला या व्यक्तीला एक गाडी भेट द्यायची आहे,’ असं म्हटलं आहे.

महिंद्रा यांनी गाडी भेट देऊ केलेल्या व्यक्तीचे नाव आहे डी. कृष्णा कुमार. कुमार हे मूळचे मैसूरचे आहे. चार वर्षापूर्वी कुमार यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर २०१८ साली कुमार यांनी आपल्या आईला भारताच्या दौऱ्यावर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. लग्न झाल्यापासून गृहिणी असणाऱ्या आईला कधीच बाहेर भटकंती करता आली नाही त्यामुळेच त्यांनी आपल्या आईला भारतातील वेगवेगळ्या जागा दाखवण्यासाठी भारत भ्रमंती सुरु केली. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या आईबरोबरचा हा भारत दौरा २० वर्ष जुन्या बजाज चेतक या स्कुटरवरुन सुरु केला. यासंदर्भातील बातमी वेगवेगळ्या वेबसाईटवर झळकल्यानंतर ती महिंद्रांपर्यंत पोहचली.

महिंद्रा यांचे मित्र मनोज कुमार यांनी एक ट्विट करुन ही बातमी शेअर केली. “मलाही अशी एक वर्षाची सुट्टी मिळायला हवी, दक्षिणमुर्ती कृष्णा कुमार हे मूळचे मैसुरचे आहेत. त्यांनी आपल्या आईबरोबर स्कुटरवरुन भटकण्यासाठी बँकींग क्षेत्रातील नोकरी सोडली. त्यांनी आतापर्यंत ४८ हजार १०० किलोमीटरचा प्रवास केला आहे. हे करण्यामागील कारण काय तर त्यांच्या आईने कधीच आपल्या घराबाहेर पाऊल ठेवलं नव्हतं त्यामुळे त्यांना तिला भारत दाखवायचा होता,” असं ट्विट कुमार यांनी केलं.

मनोज कुमार यांचे हे ट्विट आनंद महिंद्रा यांनी पाहिले आणि ते रिट्विट करताना या दोघांना भारतात भटकण्यासाठी गाडी भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. “छान आहे हे. यामधून केवळ आईबद्दलचेच नाही तर देशाबद्दलचेही प्रेम दिसून येते. हे शेअर करण्यासाठी मनोज तुझे आभार. तू मला त्यांच्याशी संपर्क करण्यात मदत केलीस तर मी त्यांना स्वत: महिंद्रा केयुव्ही १०० एएक्सटी भेट म्हणून देऊ इच्छितो. म्हणजे ते पुढील भटकंतीसाठी त्यांच्या आईला या गाडीमधून घेऊन जातील,” असं ट्विट महिंद्रा यांनी केलं आहे.

आनंद महिंद्रांनी देऊ केलेली महिंद्रा केयुव्ही १०० एएक्सटी या गाडीची किंमत पाच लाख रुपये आहे.