महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी जावाच्या ग्राहकाच्या ट्विटला रीट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. एकेकाळी भारतीयांना वेड लावणारी जावा कंपनी बंद पडली.नंतर महिंद्रांनी जावाचे भारतात विक्रीचे हक्क विकत घेतले व बाईकवेड्यांच्या आनंदात भर टाकत ही बाईक पुन्हा भारतात लाँच केली. भरींदर राजू तरीमाना या ग्राहकाने हैद्राबादमध्ये जावाचा ताबा घेतला असून कदाचित ही हैद्राबादमध्ये विकलेली पहिलीच मोटरसायकल आहे. भरींदरनं आपलं स्वप्न पूर्ण झाल्याचं सांगत ट्विटरच्या माध्यमातून आनंद महिंद्रांचे आभार मानले. ट्विटरवर अॅक्टिव असलेल्या व सर्वसामान्यांशी संवाद साधणाऱ्या आनंद महिंद्रांनीही तात्काळ या ट्विटची दखल घेत त्याला अनोख्या शुभेच्छा दिल्या. “तुला रस्त्यांमध्ये यश प्राप्त होऊ दे” असं सांगत त्यांनी भरींदरला शुभेच्छा दिल्या आहेत.

क्लासिक लिजंड या महेंद्रच्या मालकीच्या कंपनीने मोटारसायकलच्या विक्रीसाठी भारतात लागणारे परवाने घेतले होते. महिंद्रा कंपनीच्या पुढाकाराने अखेर अत्यंत मनाची आणि प्रतिष्ठेची मनाली जाणारी जावा मोटारसायकल भारतात आली. एकेकाळी भारतात लोकप्रिय असणारी आणि भारताच्या रस्त्यांवर अधिराज्य गाजवलेली जावा मोटारसायकल आजही प्रत्येक बाइकवेड्या तरुणाचं स्वप्न आहे. कंपनीनं सध्या तीन मॉडेल भारतात लाँच केली असून काही दर्दींनी अन्य काही मॉडेल्सची उदाहरणं देत ही मॉडेलदेखील लाँच करा अशी गळ ट्विटरवर महिंद्रा यांनी घातली आहे.

अभिजात दर्जा लाभलेली आणि आपल्या भारदस्त रूपाने सगळ्यांना भुलवणारी जावाची मोटारसायकल आपल्याकडे असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. हैद्राबादमधील भरींदरनं असे म्हटले आहे की,”ही बाईक घेणं हे माझं स्वप्न होतं. ही बाईक पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल मी आनंद महिंद्रांचे खूप आभार मानतो. नुकतीच मी माझी बाईक ताब्यात घेतली आहे. कदाचित ही पहिलीच असावी.” या सोबतच क्लासिक लिजेंड्सचे सह संस्थापक अनुपम थरेजांबद्दलही या ग्राहकाने प्रेम व्यक्त केले आहे.

या ट्विटवर प्रतिक्रिया देतांना आनंद महिंद्रांनी आयर्लंडमधील एका जुन्या प्रार्थनेचा संदर्भ दिला आहे. “तुमच्या ध्येयाला गाठण्याचा रस्ता मिळाल्यानंतर ‘त्या रस्त्यावर तुम्हांला यश प्राप्त होऊ दे’ हीच प्रार्थना या प्रसंगी योग्य आहे.” असं म्हणत त्यांनी जावा ग्राहकांना सदिच्छा दिला आहेत.