एका अ‍ॅपल वॉच युजरने त्याच्या वडिलांचे प्राण वाचवल्याबद्दल अ‍ॅपल कंपनीचे आभार मानले आहेत. अ‍ॅपल स्मार्टवॉचने त्याच्या वडिलांचे प्राण वाचवले असा दावा करणाऱ्या या व्यक्तिचे नाव ‘गेड ब्रूडेट’ असे असुन त्याने एका फेसबुक पोस्टव्दारे याबाबत माहिती दिली आहे. या कौतुकास्पद पोस्टला अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे.

अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे राहणारा गेड ब्रूडेट माउंटेन बाइकिंग करत असताना रिव्हरसाइड स्टेट पार्क येथे ठरलेल्या ठिकाणी वडिलांची वाट बघत होता. त्याचवेळी त्याला वडिलांच्या अ‍ॅपल वॉचवरून ‘हार्ड फॉल’ असे लिहिलेला एक मेसेज आला. तसेच या मेसेजमध्ये वडिलांचे लोकेशन देखील पाठवले गेले होते. या मेसेजमुळे वडिल कुठल्यातरी संकटात अडकले असल्याची चाहूल त्याला लागली. त्यानंतर त्वरीत गुगल मॅपच्या मदतीने तो वॉचमधून निर्देशित केलेल्या स्थळी पोहोचला. तेथे पोहोचल्यानंतर त्याला आणखी एक मेसेज आला. या मेसेजमुळे त्याच्या वडिलांना ‘सेक्रेड हर्ट मेडिकल सेंटर’मध्ये नेण्यात आल्याचे अपडेट त्याला मिळाले. या मेसेजमुळे अखेर त्याचा जीव भांड्यात पडला.

ब्रूडेटच्या वडिलांचा अपघात झाला आहे, हे लक्षात येताच अ‍ॅपल वॉचने एमर्जेन्सी नंबर ९११ वर मेसेज पाठवला, यानंतर ३० मिनिटांमध्ये रूग्णवाहिका ग्रेडच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी आली. परिणामी त्याच्या वडिलांचे प्राण वाचले. “अ‍ॅपल कंपनीकडे कमालीचे तंत्रज्ञान आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनेच माझ्या वडिलांचे प्राण वाचले.” अशा शब्दात ब्रूडेटने अ‍ॅपल कंपनीचे आभार मानले.