News Flash

‘या’ कुटुंबातील पुरुषांना फिंगर प्रिंटच नाही; सरकारी अधिकारीही चक्रावले

या एका कारणामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामाना करावा लागतो

प्रातिनिधिक फोटो (मूळ फोटो रॉयटर्सवरुन साभार)

बांगलादेशमधील एका कुटुंबातील पुरुषांच्या हाताचे ठसे म्हणजेच फिंगर प्रिंट्सच उपलब्ध नसल्याची चमत्कारिक माहिती समोर आली आहे. अप्पू सरकार आणि त्याच्या कुटुंबातील पुरुषासंदर्भातील हा विचित्र प्रकार समोर आल्यानंतर सर्वचजण गोंधळात पडले आहेत. बांगलादेशच्या उत्तरेकडील राजशाही जिल्ह्यात सरकार कुटुंब राहतं. अप्पू आणि त्याच्या कुटुंबातील पुरुषांना जेनेटिक म्यूटेशनचा त्रास असल्याने त्यांच्या हातांचे ठसे उमटत नाहीत असं सांगण्यात आलं आहे. अशाप्रकारचे जेनेटिक म्यूटेशन जगभरातील अगदीच मोजक्या व्यक्तींमध्ये दिसून येतं. मात्र आता फिंगर प्रिंटच उपलब्ध नसल्याने अप्पू आणि त्याच्या कुटुंबातील पुरुषांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागत आहे.

आपल्या पूर्वजांपासून पुरुषांच्या हातांच्या ठशांची समस्या असल्याचे अप्पू सांगतो. त्यावेळी हातांचे ठसे नसले तरी फारशी कामं अडायची नाही. मात्र आता आधुनिक काळात फिंगर प्रिंटचे महत्व वाढले आहे. बोटांवर चालणाऱ्या या स्मार्ट जगात बायोमेट्रीक डेटा जाम केला जातो. आज याच बायोमेट्रीक गोष्टी आता व्यक्तींची ओळख असते. अगदी विमानतळापासून ते ओळखपत्रांपर्यंत आणि सर्वच डिजीटल कामांमध्ये सध्या फिंगर प्रिंट वापरले जातात. बांगलादेशमध्ये सन २००८ साली सर्व वयस्कर व्यक्तींसाठी राष्ट्रीय ओळखपत्र देण्याची मोहीम सुरु करण्यात आली. या ओळखपत्रासाठी डेटा बेस म्हणून नागरिकांच्या आंगठ्याचे ठसे घेण्यात आली. मात्र त्यावेळीही अप्पूच्या अंगठ्याचा ठसा घेताच आला नाही. त्याच्या वडीलांबरोबर म्हणजेच अमल सरकार यांच्यासोबतही हीच अडचण येत होती. त्यामुळे केंद्रावरील कर्मचाऱ्यांना अप्पू आणि त्याच्या वडीलांना ओळखपत्र कसं द्यायचं हा प्रश्न प़डला. अखेर अप्पू आणि त्याच्या वडीलांना नो फिंगप्रिंटचा स्टॅम्प मारुन ओळखपत्र बनून देण्यात आली, असं बीबीसीने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.

नक्की काय आहे हा आजार आणि ते कशामुळं होतं?

हाताचे ठसे न उमटणे हा एक आजार असून यासंदर्भात सर्वात आधी २००७ साली माहिती समोर आली. पीटर इटिन नावाच्या त्वाचारोगतज्ज्ञाला एका महिलेने तिला येणाऱ्या समस्येबद्दल सांगितलं. आपल्या बोटांचे ठसे विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांना घेता येत नसल्याने आपल्याला अमेरिकेत जाता येत नाहीय असं या महिलेने पीटर यांना सांगितलं. पीटर यांनी यासंदर्भात तपासणी केली असता या महिलेच्या फ्लॅट फिंगर पॅड म्हणजे बोटाची टोक आणि तळहातावर घाम येणाऱ्या छिद्रांची संख्या कमी असल्याचं दिसून आलं. या महिलेच्या कुटुंबातील १६ सदस्यांपैकी सात जणांचे फिंगर प्रिंट मिळत होते. मात्र या महिलेप्रमाणे बोटाचे ठसेच न उमटणाऱ्या कुटुंब सदस्यांची संख्या तब्बल ९ इतकी होती.

आजाराचं नाव काय?

या आजाराला डर्मेटोग्लाइफ असं नाव देण्यात आलं होतं. मात्र यासंदर्भात सर्वात आधी संशोधन करणाऱ्या पीटर यांच्याकडे आलेल्या महिलेला इमीग्रेशनमध्ये अडचणी येत असल्याने या आजाराबद्दल समजल्याने या आझाराला इमीग्रेशन डिले डिसीज असं नाव देण्यात आलं. अप्पूचे काक गोपेश यांचेही फिंगर प्रिंट येत नसल्याने त्यांना पासपोर्टसाठी तब्बल दोन वर्ष वाट पहावी लागली. गोपेश यांच्या कार्यालयामध्ये फिंगर प्रिंटवर आधारित हजेरीची व्यवस्था करण्यात आली तेव्हा त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना या आजाराबद्दल सांगून जुन्या पद्धतीनेच हजेरी लावण्याची विनंती करावी लागली.

विशेष प्रमाणपत्र

अमल आणि अप्पू यांच्या आजाराबद्दल माहिती समोर आल्यानंतर बंगलादेश सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या एका विशेष वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना नवीन राष्ट्रीय ओळखपत्र देण्यात आलं. या कार्डामध्ये रेटिना स्कॅन आणि चेहऱ्याशी संबंधित ओळख आहे. मात्र त्यांना अगदी सीम कार्ड घेण्यापासून ते पासपोर्ट तयार करण्यापर्यंत अनेक कामांसाठी इतरांपेक्षा जास्त वेळ खर्च करुन त्रासही सहन करावा लागतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 2:37 pm

Web Title: apu sarker the family with no fingerprints scsg 91
Next Stories
1 पंजाब : आंदोलक शेतकऱ्यांनी तोडला १,३०० जिओ टॉवर्सचा वीजपुरवठा
2 महाराष्ट्राच्या मंत्र्याने पत्नीसोबत धरला ठेका; Video व्हायरल
3 दुचाकीच्या धडकेत हत्तीचं पिल्लू झालं गंभीर जखमी; २६ वर्षीय तरुणाने अशापद्धतीने वाचवले प्राण, पाहा Viral Video
Just Now!
X