भारतीय क्रिकेट संघाने जबरदस्त कामगिरी करत ब्रिस्बेन येथील चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत इतिहास रचला आणि भारतीयांकडून सेलिब्रेशनला सुरुवात झाली. भारतीय संघाने तीन गडी राखत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि २-१ ने मालिका खिशात घातली. गाबाच्या मैदानावर १९८८ नंतर पहिल्यांदाचा ऑस्ट्रेलिया संघाला पराभवाचा सामना करावा लागला. एकीकडे मैदानात भारतीय क्रिकेट संघ आनंद साजरा करत असताना स्टेडिअममध्ये उपस्थित भारतीय प्रेक्षक ‘भारत माता की जय’ची घोषणा देत होते. विशेष म्हणजे यामध्ये ऑस्ट्रेलियाचा चाहतादेखील होता.

Ind vs Aus: ऐतिहासिक विजयावर अजिंक्य रहाणे आणि रवी शास्त्रींचं मराठीतून उत्तर
विराटनं रचला पाया, अजिंक्यनं चढवला कळस – रवी शास्त्री
ऑस्ट्रेलियावरील ऐतिहासिक विजयानंतर ऋषभ पंतची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…

३२७ धावांचा पाठलाग करताना ऋषभ पंतने विजयी फटका मारला आणि मैदानात एकच जल्लोष सुरु झाला. मैदानात उपस्थित भारतीय प्रेक्षकांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी पराभव झालेला असतानाही ऑस्ट्रेलियाचा एक प्रेक्षक भारतीयांच्या जल्लोषात सहभागी झाला आणि ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’ घोषणा देऊ लागला. त्याचा हा उत्साह पाहून भारतीय प्रेक्षकदेखील त्याला प्रतिसाद देत होते. खेळभावना दाखवणारा ऑस्ट्रेलियन चाहत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या आणि भारताने प्रत्युत्तरात ३३६ धावा केल्या होत्या. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान दिलं होतं. भारतीय संघानं शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या फलंदाजीच्या जोरावर ३२८ धावांचं कठीण आव्हान पार करत ऐतिहासिक विजय मिळवला.

माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण – ऋषभ पंत
“हा माझ्या आयुष्यातील अनेक मोठ्या क्षणांपैकी एक आहे. मी खेळत नसतानाही सपोर्ट स्टाफ आणि सहकाऱ्यांना मला पाठिंबा दिल्याचा आनंद आहे,” असं ऋषभ पंतने म्हटलं आहे. “ही एक ड्रीम सीरिज होती. संघ व्यवस्थापनाने मला नेहमी पाठिंबा दिला आणि तू एक मॅचविनर असल्याचं सांगत राहिले. मैदानात जाऊन तुला संघासाठी सामना जिंकायचा आहे असं ते वारंवार सांगत होते. प्रत्येक दिवशी भारताला सामने जिंकून देण्याचा विचार करत असतो आणि आज मी ते करुन दाखवलं,” अशा शब्दांत ऋषभ पंतने आनंद व्यक्त केला आहे. “खेळाचा पाचवा दिवस होता आणि बॉल थोड्या प्रमाणात वळत होता. त्यामुळे मी फटका मारताना शिस्तीने मारण्याचा विचार केला,” असं ऋषभ पंतने सांगितलं.

अश्रूंची चव एकदमच गोड होती – रहाणे
विजयानंतर अजिंक्य रहाणे आणि रवी शास्त्री यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी त्यांना मराठीत प्रश्न विचारत प्रतिक्रिया विचारली. यावर बोलताना अजिंक्य रहाणेने सांगितलं की, “आजच्या अश्रूंची चव एकदमच गोड होती. फारत बरं वाटलं. स्वत:वर कसं नियंत्रण ठेवू हेच कळत नव्हतं. जे झालं आहे त्यावर विश्वासच बसत नाही, यासाठी कदाचित थोडा वेळ लागेल”.

“सर्वांनीच खूप चांगली कामगिरी केली. खासकरुन पदार्पण करणाऱ्यांनी खूप चांगली खेळी केली. शार्दुलची दुसरी मॅच होती, सिराज आणि सैनाचीही दुसरी-तिसरी मॅच होती. ज्याप्रकारे मैदानात उतरून आपल्या देशासाठी सामना जिंकण्याच्या हेतून खेळले त्यातून त्यांनी यासाठी तुम्ही ५०, ६०, १०० सामने खेळण्याची गरज नाही, १-२ सामने खेळला असाल आणि तुमच्यात जिद्द असेल तर तुम्ही काहीही करु शकता दे दाखवून दिलं. त्यामुळे या खेळाडूंसाठी मी फार खूश आहे,” अशा शब्दांत अजिंक्य रहाणेने कौतुक केलं.

पुजाराच्या खेळीवर बोलताना अजिंक्य रहाणेने सांगितलं की, “पुजारा ज्या पद्धतीने खेळला त्याने दाखवून दिलं. अनेक बाऊन्सर त्याच्या अंगाला, हेल्मेटला लागले, पण काही फरक पडला नाही. मला विकेटवर उभं राहायचं आहे हे त्याने ठरवलं होतं. यामुळे पंतला खेळणं सोपं झालं. तो मोकळेपणाने खेळू शकला. पुजारा बाद झाल्यानंतर वॉशिंग्टनने चांगल्या पद्दतीने बॅटिंग केली. विजयाचं श्रेय सर्वांनाच जातं. पुजारा आणि आणि पंतला खासकरुन जास्त श्रेय जातं,” असं अजिंक्य रहाणेने सांगितलं. रवी शास्त्री यांनी यावेळी पुजारा आमच्या संघाचा लढवय्या खेळाडू आहे अशा शब्दांत त्याचं कौतुक केलं.