भाजपाचे नेते सत्य राजन बोहरा यांनी आसाममधील प्राणीसंग्रहालयाबाहेर आंदोलन करत संग्रहालयातील मांसाहारी प्राण्यांना बीफ म्हणजेच गोमांस देऊ नये या मागणीसाठी सोमवारी आंदोलन केलं. त्यानंतर दुसऱ्या म्हणजेच मंगळवारी राज्याचे वनमंत्री परिमल शुक्लबाडिया यांनी या विषयावर गोंधळ घालून काहीही होणार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी या विषयासंदर्भात आपण काही वैज्ञानिकांशी चर्चा केली असून गोमांसाऐवजी प्राण्यांना काय खाद्य देता येईल यावर विचार सुरु असल्याचे परिमल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं आहे.

“मी काही वैज्ञानिकांशी यासंदर्भात चर्चा केली आहे. प्राण्यांना गोमांसाऐवजी मटण दिल्यास काय परिणाम होईल याबद्दल आम्ही बोललो. या विषयावरुन वाद निर्माण करण्याची गरज नाहीय. संग्रहालयातील प्राणी केवळ मटण किंवा पोर्क (डुक्कराचे मांस) यावर जिवंत राहू शकत नाहीत. त्यांना म्हशीचे मांस देता येईल. मात्र आसाममध्ये म्हशी फारश्या नाहीत. आम्ही लवकरच बीफ, म्हशीचे मांस, मटण आणि पोर्कचा पुरवठा करण्यासंदर्भात निविदा काढणार आहोत,” असं परिमल म्हणाले.

राज्यातील पाळीव प्राण्यांची संख्या वाढवणे गरजेचे असल्याचे मतही यावेळेस वनमंत्र्यांनी व्यक्त केलं. “आपल्याकडील पाळीव पाण्यांची संख्या वाढली पाहिजे ही मागणी योग्य आहे. मात्र त्याचबरोबर आपल्याकडील जंगली प्राण्यांची संख्या आणि आरोग्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांच्या गरजेनुसार आम्ही त्यांना आहार देत राहणार आहोत,” असं वनमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

भाजपा नेते राजन बोहरा यांनी आपल्या ३० कार्यकर्त्यांसहीत प्राणीसंग्रहालयासमोर आंदोलन केलं होतं. यावेळी त्यांनी प्राणीसंग्रहालयामध्ये गोमांस घेऊन जाणारा ट्र्क आडवला. तसेच गोमांस देणं बंद केलं नाही तर प्राणीसंग्रहालय आणि आसाम सरकारला याचे परिणाम सहन करावे लागतील असा इशाराही भाजपा नेत्याने दिला. वाघांना आम्ही त्यांच्या आहाराच्या सवयीनुसार खाद्य देतो. जर केंद्रीय प्राणीसंग्रहालय व्यवस्थापनाने नियम बदलले तर त्या पद्धतीचा आहार आम्ही वाघांना देऊन, असं संग्रहालयातील अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.