पाच जून २००६ रोजी पतीच्या स्मरणार्थ त्यांनी घराजवळ एक छोटेसे रोपटे लावले. आज या रोपटयाने वृक्षाचे रुप धारण केले आहे. पर्यावरण रक्षणासाठी जानेत यग्नेश्वरन यांनी त्यावेळी उचललेले हे छोटेसे पाऊल आज एका मिशनमध्ये बदलले आहे. जानेत यांनी आतापर्यंत बंगळुरु आणि कर्नाटकाच्या वेगवेगळया भागात ७३ हजार रोपटी लावली आहेत. बंगळुरु मिररने हे वृत्त दिले आहे.

सर्व काही सुरळीत सुरु राहिले तर दक्षिण बंगळुरुत इजीपुरा येथे रहाणाऱ्या जानेत यग्नेश्वरन लवकरच ७५ हजार रोपटी लावण्याचा महत्वाचा टप्पा गाठतील. घराजवळ लावलेल्या छोटयाशा रोपटयाने वृक्षाचे रुप धारणे केले आहे ते पाहून अभिमान वाटतो असे जानेत यांनी सांगितले. पती यग्नेश्वरन यांच्या मृत्यूनंतर सप्टेंबर २००५ साली त्यांच्या झाडे लावण्याच्या मिशनला सुरुवात झाली.

त्यावर्षी बंगळुरुमध्ये विकासकामासाठी मोठया प्रमाणावर झाडे तोडण्यात आली होती. माझ्या जवळच्या काही मित्रांनी मला धरणे आंदोलन करण्याचा सल्ला दिला. पण मला काही तरी कृतीमधून चांगले करायचे होते. ज्यातून समाजाला काही तरी मिळेल. मी नवऱ्याच्या स्मरणार्थ राजानेत यग्नेश्वरन चॅरिटेबल ट्रस्ट सुरु केली. या ट्रस्टच्या माध्यमातून आसपासच्या भागात रोपे लावण्याचा कार्यक्रम आम्ही सुरु केला.

झाडे लावण्याचे हे कार्य मोठया प्रमाणावर करायचे असेल तर स्वत:च्या बगीच्यापुरता रोपटी लावून चालणार नाही हे जानेत यांना माहित होते. रस्त्याच्या कडेला रोपटी लावताना त्या आसपास रहाणाऱ्या लोकांना तुम्ही याची काळजी घ्याल का ? अशी विचारणा करायच्या. पण लोकांचा प्रतिसाद फारसा उत्साहवर्धक नसायचा. काही लोक तयार व्हायचे. काहींचा नकार असायचा. पण मी हिम्मत सोडली नाही असे जानेत यांनी सांगितले. आज बंगळुरुमध्ये त्यांच्या संस्थेमार्फत लावण्यात आलेल्या रोपटयांनी मोठया झाडाचे रुप धारण केले आहे.