सोन्याचा हव्यास कुणाला नसतो. प्रत्येकालाच आपल्याकडं सोनं असावं असं वाटत असतं आणि आपल्या ऐपतीप्रमाणे लोक सोनं घेतात. पण, सगळ्यात कठीण असतं सोनं जपणं. म्हणूनच एखाद्या गोष्टीच्या सुरक्षेचा विषय येतो तेव्हा ‘हे म्हणजे सोन्याचा दागिणा जपण्यासारखं आहे.’ असं म्हटलं जातं. मात्र, एखाद्यावेळी झालेल्या दुर्लक्ष झाल्यामुळं सोनं गमावलं तर झोप उडाली म्हणूनच समजा. अशीच एक घटना समोर आली आहे. एका महिलेनं घरातील कचऱ्यासोबत ३ तोळे सोनं फेकून दिलं. शोधाशोध घेतली तर सोनं सापडलं बैलाच्या पोटात.

हरियाणा राज्यातील वालांवाली येथील एका महिलेने आपले ३ तोळ्यांचे सोन्याचे दागिने भाजीच्या पिशवीत ठेवले होते. परंतु तिचे दागिने रातोरात गायब झाले. प्रचंड शोधाशोध करुनही दागिने सापडले नाहीत. अखेर त्या महिलेने याबाबत पोलिस तक्रार केली. पोलिस चौकशीदरम्यान हे दागिने चक्क बैलाच्या पोटात सापडले.

बैलाच्या पोटात दागिने गेले कसे?

तक्रार करणाऱ्या महिलेने आपले दागिने भाजीच्या पिशवीत ठेवले होते. ही पिशवी तिने चुकून कचऱ्यात फेकून दिली. कचरा फेकत असताना तिथे एक भटका बैल होता. त्याने कचरा म्हणून फेकलेली भाजी खाण्यास सुरुवात केली. त्यावेळी भाजीबरोबर त्याने सोन्याचे दागिने देखील गिळून टाकले. पोलिसांनी चौकशीदरम्यान सर्वात प्रथम तेथील सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यावेळी घडलेला सर्व प्रकार समजला. त्यानंतर या महिलेच्या कुटुंबीयांनी त्या भटक्या बैलाला शोधून काढले. मोठ्या प्रयत्नांनंतर हा बैल हाती लागला. परंतु आता त्याच्या पोटातून सोने बाहेर काढणार कसे हा सर्वात मोठा पेचप्रसंग गावकऱ्यांना पडला आहे.