उत्तर प्रदेशमधील आठ पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गुंड विकास दुबेला आज उत्तर प्रदेश पोलिसांनी १० जुलै रोजी एन्काउंटरमध्ये ठार केलं. य़ा घटनेला जवळजवळ दोन आठवडे होत आले असतानाच आता विकास दुबेची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये दुबे एका व्यक्तीशी बोलताना पोलिसांना धमकी देत आहे. कानपूरच्या हद्दीत दुबे एन्काउंटरमध्ये मारला गेल्यानंतर ही क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये दुबे ज्या व्यक्तीशी बोलत आहे ती व्यक्ती हवालदार राजीव चौधरी असल्याची चर्चा आहे.

चौबेपुर पोलीस स्थानकाती हवालदार चौधरीला पोलिसांवर झालेल्या हल्ल्यानंतर निलंबित करण्यात आलं होतं. २ आणि ३ जुलैच्या रात्री बिकरु गावामध्ये पोलीसांचा ताफा दुबेला अटक करण्यासाठी गेला असता दुबेने आठ पोलिसांची हत्या केली होती. त्याच घटनेआधी दुबेने पोलिसांना धमकी देणारा हा कॉल केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फोनवर बोलणारी व्यक्ती ही दुबेच असून तो आपल्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सांगत असताना ऐकू येत आहे. या ऑडिओ क्लिपची सत्यता अद्याप कोणत्याही सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून पडताळून पाहण्यात आलेली नाही.

नक्की पाहा >> हैदराबाद ते कानपूर: फिल्मी स्टाइल एन्काउंटरची खरीखुरी उदाहरणे

दुबेनेच पोलिसांना धमकी देण्यासाठी हा फोन केला होता. “एवढा मोठा कांड करेन ना मी की त्यानंतर तुम्हाला कळेल की तुमची गाठ कोणाशी पडली आहे… जीपमधल्या सर्वांना ठार करेन… आयुष्यभर तुरुंगात जाईल एवढ्या हत्या करेन मी… आता विकास दुबेची शिकार होणार याबद्दल चर्चा जरी झाली तर… जोपर्यंत मारणार नाही तोपर्यंत घरी परत जाणार नाही…”, अशी वाक्य या क्लिपमध्ये दुबे बोलताना ऐकू येत आहे.

व्हायरल झालेल्या या ऑडिओमध्ये दुबे नक्की कोणाशी बोलत होता?, बोलणारा दुबेच होता का?, दुबे पोलिसांना अशी धकमी देत असल्याचे पोलिसांना ठाऊक होतं का?, यासारखे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र ही क्लिप व्हायरल होताना दिसत आहे.