अतियश वेगाने वाढणाऱ्या फूड इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच वर्षांपासून एका व्यक्तीचा पगडा पाहायला मिळाला. भारतीय पदार्थांना वेगळा टच देत आणि या क्षेत्रामध्ये भारताचं प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या त्या व्यक्तीचं नाव म्हणजे शेफ संजीव कपूर. ‘खाना खजाना’च्या निमित्ताने प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या या शेफच्या लोकप्रियतेविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. सध्या हा स्टार शेफ चर्चेत आला आहे, ते म्हणजे त्याच्या एका चुकीमुळे. ती चूक ज्यामुळे त्याला सोशल मीडिया ट्रोलिंग शिकार व्हावं लागलं.

संजीवने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन ‘मलबार पनीर’ या रेसिपीचा एक व्हिडिओ पोस्ट केला. पण, ही रेसिपी शेअर करणं त्याला चांगलच महागात पडलं. केरळच्या मलबार भागाचा संदर्भ देत त्याने ही रेसिपी शेअर केली खरी. पण, नेटकऱ्यांच्या जीभेवर मात्र त्याच्या या रेसिपीची चव रेंगाळली नाही हेच खरं.

केरळच्या मलबार भागातील खाद्यपदार्थ उदाहरणार्थ मलबार पराठा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. इथे मांसाहाराची जास्त चंगळ पाहायला मिळते. त्याशिवाय वेगळी चव, मसाल्यांचा वापर आणि सुगंध या गोष्टींसाठीसुद्धा मलबारचे खाद्यपदार्थ ओळखले जातात. बीफ किंवा इतर मांसाहाराचा येथील खाण्यात जास्त वापर असून, पनीरचा दूरदूरपर्यंत संबंधही येत नाही. पण, संजीवने मात्र रेसिपीच्या नावापासूनच घोळ घातल्यामुळे अनेकांनाकाच ही बाब खटकली आहे.

मलबार हा शब्द जोडल्याने कोणत्याही पदार्थामध्ये त्या ठिकाणची चव येत नाही, असं एका नेटकऱ्याने म्हटलं. तर काहींनी या रेसिपीच्या व्हिडिओवर उपरोधिक टीका केल्याचं पाहायला मिळालं. मलबार पनीर वगैरे असा कोणता पदार्थ अस्तित्वातच नाही. मलबार चिकन हा पदार्थ प्रचलित आहे, असं एका युजरने संजीवच्या लक्षात आणून दिलं. तर काहींनी तर मलबारच्या कोणत्याच पदार्थामध्ये तुम्हाला पनीरचा वापर दिसणार नाही, हे थेट पैज लावूनच संजीवला सांगितलं. मलबार पनीर या एका रेसिपीमुळे सर्वकाही नीट असूनही संजीवचा प्रयत्न फसला, असंच म्हणावं लागेल.

वाचा : मित्राच्या ‘त्या’ एका वाक्यामुळे सचिन मुंबईच्या रस्त्यावर खेळला क्रिकेट