चीन आणि रशियाचे वाढते आव्हान लक्षात घेऊन अमेरिका लवकरच संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत परिपूर्ण स्पेस फोर्सची स्थापना करणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२० नॅशनल डिफेन्स ऑथोरायझेशन अॅक्टवर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे अमेरिकेचे स्वप्न लवकरच वास्तवात उतरणार आहे. पेंटागॉनसाठी विशेष निधीची तरतूद करण्यात येईल.

या कायद्यावर स्वाक्षरी करताना लष्कराच्या अधिकाऱ्यांसमोर बोलताना ट्रम्प म्हणाले की, “अवकाशात बरेच काही घडणार आहे. कारण अवकाश हे जगाचे नवीन युद्धक्षेत्र असेल.” गुप्त माहिती मिळवणे तसेच टेहळणीच्या दृष्टीने रशिया आणि चीनने मजबूत, सक्षम अवकाश सेवा विकसित केली आहे असा डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीच्या अहवालात इशारा देण्यात आला होता.

अवकाशात अमेरिकेला आव्हान देण्याच्या दृष्टीने चीन आणि रशिया तयारी करत असल्याचे या अहवालात म्हटले होते. ऊर्जा शस्त्र, उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र आणि अवकाशात जॅमिंगचे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांची तयारी सुरु असल्याचे अमेरिकेच्या अहवालात म्हटले होते. इराण आणि उत्तर कोरिया सुद्धा अवकाशात आव्हान निर्माण करु शकतात.

बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान, जॅमिंग असे वेगवेगळे पर्याय त्यात आहेत. त्यामुळे अमेरिकेने आपल्या अवकाश संपत्तीच्या रक्षणासाठी आता स्पेस फोर्सची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. मरीन फोर्स ज्याप्रमाणे अमेरिकन नौदलाच्या अंतर्गत काम करते तसेच स्पेस फोर्स अमेरिकन एअर फोर्सच्या नियंत्रणाखाली काम करेल. अवकाशात अनेक उपग्रह असून अमेरिका त्यावर मोठया प्रमाणात अवलंबून आहे. स्पेस फोर्स ही लष्कर, एअर फोर्स, नौदल, मरीन आणि तटरक्षक दलानंतर अमेरिकन सहावी अधिकृत फोर्स असेल.