रस्त्याकिनारी पुस्तकं विकणाऱ्या एका फेरीवाल्याचा व्हिडिओ लेखक चेतन भगतने शेअर केला आहे. ‘फाइव्ह पॉइंट सम वन’ आणि ‘द 3 मिस्टेक्स ऑफ माय लाइफ’ अशा लोकप्रिय पुस्तकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या चेतन भगतने काही दिवसांपूर्वी पुस्तकं विकणाऱ्या एका फेरीवाल्याला बघितलं आणि स्वतःबाबत विचारण्याचं ठरवलं.

1.09 मिनिटांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये चेतन भगत फेरीवाल्याला ‘लेखक चांगला आहे का’? असं विचारतो. त्यावर फेरीवाला ‘पुस्तकं चांगली आहेत’ असं उत्तर देतो. ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये “आज मी या मुलाला भेटलो, त्याने चेतन भगत चांगला नाहीये हे मान्य करण्यास नकार दिला. मी जे काही आहे ते फक्त अशा लोकांमुळेच आहे. त्यांच्या मेहनतीची आणि मार्केटिंगची मी नेहमीच प्रशंसा करतो”, असं ट्विट चेतनने केलं आहे. फेरीवाल्याकडून पुस्तक खरेदी केल्यानंतर अखेर चेतन भगत त्या फेरीवाल्या मुलाला स्वतःची ओळख सांगतो आणि त्याच्यासोबत एक सेल्फीही घेतो.
चेतन भगतने शेअर केल्यापासून या व्हिडिओला एक लाखापेक्षा जास्त जणांनी पाहिलं असून नेटकऱ्यांकडून व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही नेटकरी या व्हिडिओखाली प्रतिक्रिया देताना चेतन भगतचं कौतुक करतायेत. तर, काहीजण चेतनवर टीकाही करत आहेत. एका युजरने तर, ‘चेतन भगत तुम्ही गेल्या वर्षीही असाच व्हिडिओ शेअर केला होता, अशा घटना तुमच्यासोबत वारंवार घडत असतात का’ असं म्हणत मला या व्हिडिओच्या सत्यतेवर विश्वास नाही असं ट्विट केलंय.

बघा व्हिडिओ आणि नेटकऱ्यांच्या काही प्रतिक्रिया :-


दरम्यान, टट्विटरवर चेतन भगतने शेअर केलेला हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.